घरफिचर्समायमहानगर ब्लॉगशरद पवारांची प्रतिष्ठा ठरतेय उजवी

शरद पवारांची प्रतिष्ठा ठरतेय उजवी

Subscribe

शरद पवार हे सध्या राज्यव्यापी दौर्‍यावर आहेत. राज्यात ज्या ज्या ठिकाणी पक्षातून गळती झाली, त्या त्या ठिकाणी शरद पवार स्वतः भेट देऊन कार्यकर्ता आणि संघटनेमधील मरगळ झटकून टाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या दौर्‍यात त्यांनी पक्षातील पहिल्या फळीतील नेत्यांना सोबत न घेता ‘एकला चलो रे’चा मार्ग अवलंबला. 50 वर्षांहून अधिक काळ राजकारणात असलेले शरद पवार आपल्या ‘पवार ब्रँड’चा हुकमी एक्क्यासारखा वापर करताना दिसत आहेत.

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक युतीच्या बाजूने एकतर्फी होईल, अशी परिस्थिती काही दिवसांपूर्वी होती. केंद्रात भाजपची सत्ता, संविधानातील कलम 370 हटविल्यानंतर भाजपला वाढता जनाधार, मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसे अक्षरशः बॅकफूटवर गेले होते. मुख्यमंत्र्यांनी तर वंचित बहुजन आघाडीच आमचा प्रमुख विरोधक असल्याचे सांगून टाकले. तसेच विधानसभेत वंचितचाच विरोधी पक्षनेता असेल असेही जाहीर केले. राष्ट्रवादीने निदान शिवस्वराज्य यात्रा काढून फायटिंग स्पिरीट दाखवले. यात काँग्रेस कुठेही दिसत नाही. मात्र, राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवारांचे नाव घेतले आणि एका दिवसात परिस्थिती पालटली. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर पक्षाची बदनामी होईल किंवा आरोपांमुळे प्रचारात राष्ट्रवादीची पिछेहाट होईल, अशी अटकळ बांधली जात होती. पवारांनी मात्र ईडीला अंगावर घेतलं. नोटीस येण्याआधीच स्वतःहून चौकशीला जातो आणि त्यांचा काय असेल तो पाहुणचार घेतो, असे सांगताच राज्यभरातील कार्यकर्त्यांना चांगलेच स्फुरण चढले. राष्ट्रवादीतर्फे ठिकठिकाणी बंद, आंदोलन पुकारण्यात आली. संघटनेला आलेली मरगळ झटकून देण्यात ईडीने राष्ट्रवादीला एकप्रकारे मदतच केली, असे दिसते.

शरद पवार हे सध्या राज्यव्यापी दौर्‍यावर आहेत. राज्यात ज्या ज्या ठिकाणी पक्षातून गळती झाली, त्या त्या ठिकाणी शरद पवार स्वतः भेट देऊन कार्यकर्ता आणि संघटनेमधील मरगळ झटकून टाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या दौर्‍यात त्यांनी पक्षातील पहिल्या फळीतील नेत्यांना सोबत न घेता ‘एकला चलो रे’चा मार्ग अवलंबला. 50 वर्षांहून अधिक काळ राजकारणात असलेले शरद पवार आपल्या पवार ब्रँडचा हुकमी एक्क्यासारखा वापर करताना दिसत आहेत. ‘मी बरा, वाईट कसाही असेल, पण तुरुंगात कधीच गेलो नाही’ असा अमित शहांना टोमणा मारत, स्वतःच्या क्लीन इमेजचा वापर देखील ते प्रचारासाठी करत आहेत. पवारांनी आतापर्यंत नाशिक, सोलापूर, परभणी, उस्मानाबाद, सातारा, हिंगोली, अहमदनगर, नांदेड, बीड, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्या. सर्वच ठिकाणी पवारांना तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आज पवार ईडीच्या कार्यालयात स्वतःहून चौकशीसाठी जाणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा दौर्‍यासाठी बाहेर पडतील. तेव्हा त्यांची आक्रमकता आणखी वाढलेली असेल.

- Advertisement -

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासहीत सर्वपक्षीय 70 संचालकांवर आर्थिक गुन्हे विभागाने आधीच गुन्हा दाखल केला होता. मात्र, तोपर्यंत शरद पवार यांचे नाव घेतले गेलेले नव्हते. पवार कधीही संचालक मंडळावर नव्हते. तरीही त्यांचे नाव या प्रकरणात गोवले गेले, अशी भावना आता मूळ धरत आहे. त्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि आजवर पवारांचे कट्टर विरोधक मानले जाणार्‍या अण्णा हजारेंनीही त्यांना क्लीन चिट देऊन टाकली. ‘मी दिलेल्या पुराव्यामध्ये पवारांचे नाव नाही. त्यांचे नाव विनाकारण घेतले गेले असेल तर त्याची चौकशी व्हावी’, अशी मागणी अण्णांनी केली आहे. भाजप वगळता इतर पक्ष, राजकीय नेते शरद पवारांची उघड बाजू घेत आहेत. ईडी या अस्त्राचा सामना कसा करायचा हा प्रश्न विरोधकांना पडला असताना पवारांनी मात्र हे अस्त्र बोथट केले. आता पुढील प्रचारात देखील पवार ईडीचा मोठ्या खुबीने स्वतःच्या प्रचारासाठी निश्चितच वापर करून घेतील.

तत्पूर्वी सत्ताधार्‍यांनी विरोधकांना चांगलेच जेरीस आणले होते. शिवसेना-भाजपने दोन्ही काँग्रेसमधून जोरदार इनकमिंग सुरू केले. काही ठिकाणी धाक दाखवून तर काहींना सत्तेचे आमिष दाखवून स्वतःकडे वळविण्याचा प्रयत्न केला. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, शिवसेना-भाजपने राष्ट्रवादीतल्या या बालेकिल्ल्यातील अनेक सरदार स्वतःच्या ताफ्यात घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीने आता मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. पवारांनी पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये जोरदार प्रचार केला. विशेषतः उस्मानाबादमध्ये त्यांनी थेट राणाजगजितसिंह पाटील यांच्यावरच हल्लाबोल केला, तर सोलापूरमध्ये ‘मी त्या नेत्यांना बघायला आलोय’ असा सज्जड दम देणारी भाषा वापरली. राष्ट्रवादीतील तरुणांना सोडून गेलेल्यांवर जहाल टीका करणारा नेता हवा होता, पवारांनी ती कमतरता भरून काढली.

- Advertisement -

सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी संवाद यात्रा काढली होती. मात्र, या संवादातून कार्यकर्त्यांना कितपत उभारी मिळाली यावर प्रश्नचिन्ह आहे. अजित पवार यांच्यावर सहकारी बँक कर्ज वाटप घोटाळ्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि इतर स्थानिक नेते हे शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरताना दिसले. शिवस्वराज्य यात्रेच्या बातम्या होण्यापलीकडे मतदारांमध्ये कितपत जागृती झाली, याबाबतही अंदाज आताच बांधणे शक्य नाही. मात्र, शरद पवारांचा दौरा पक्षातील इतर नेत्यांच्या दौर्‍यामध्ये उजवा ठरताना दिसला. सातारा येथे जमलेली गर्दी याचे समर्पक उदाहरण आहे. सुप्रिया सुळे यांना सध्या डेंग्यूची लागण झाली असल्याने त्यांनी प्रचारातून काही काळापुरती माघार घेतली. अजित पवारांची चौकशी सुरू झाल्यास त्यांच्याही प्रचाराला ब्रेक लागू शकतो. अशा परिस्थितीत शरद पवार एकट्याने किल्ला लढवतील, असे दिसते.

राष्ट्रवादी काँग्रेसने 2014 साली स्वबळावर निवडणूक लढवत 41 आमदार निवडून आणले. शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीनेही स्वबळाचा नारा दिलार, पण नुकसान आघाडीचेच जास्त झाले. 2009 साली राष्ट्रवादीने काँग्रेससोबत जाऊन स्वतःचे 62 आमदार निवडून आणले होते. 2014 साली ही संख्या 41 वर येऊन ठेपली. आता 2019 ची निवडणूक सुरू होण्यापूर्वीच राष्ट्रवादीकडे तांत्रिकदृष्ठ्या केवळ 30 आमदार आहेत. विद्यमान 9 आमदारांनी राष्ट्रवादीमधून सत्ताधारी पक्षांमध्ये पक्षांतर केले आहे. सोलापूरमधील मोहोळ मतदारसंघाचे आमदार रमेश कदम हे चार वर्षांपासून तुरुंगात आहेत, तर सोलापूरमधीलच माळशिरसचे आमदार हनुमंत डोळस यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. या दोन्ही जागा सध्या राष्ट्रवादीकडे असल्यातरी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या जाण्याने तिथे काय होईल, हे आताच सांगता येत नाही. त्यामुळे उरलेल्या जागा कशा टिकवायच्या? तसेच नवीन जागा निवडून आणण्याचे आव्हान सध्या राष्ट्रवादीसमोर आहे. शरद पवारांनी आपला ज्येष्ठत्वाचा ब्रँड या निवडणुकीत पणाला लावलेला दिसतोय.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -