घरफिचर्ससचिन पायलटांच्या निमित्ताने...

सचिन पायलटांच्या निमित्ताने…

Subscribe

भाजपला सत्तेचा भस्म्या झाला आहे. भाजपला लोकशाहीमधील विरोधी पक्षाचे अस्तित्व मान्य नाही. भाजप लोकशाहीविरोधी पक्ष असून नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात आणिबाणी सदृश परिस्थिती आली आहे. मोदी व भाजप हे फॅसिस्ट वृत्तीचे पक्ष आहेत. या पक्षांना विरोधी पक्षांचे अस्तित्व संपवून देशात हुकुमशाही आणायची आहे, असे सर्व आरोप करून विरोधी पक्ष विशेषत: काँग्रेसला आपल्या समस्येचे कारण देता येऊ शकते. काँग्रेस व एकूणच भाजपविरोधी पक्षांच्या दृष्टीकोनातून विचार केला तर वरील सर्व आरोपांमध्ये तथ्य असल्याचे युक्तिवाद आणि उदाहरणेही सादर करता येतील. मात्र, त्यामुळे काँग्रेसचा प्रश्न सुटणार आहे का? काँग्रेसमधील तरुण नेते पक्ष सोडून जात आहेत. ते जाण्यामागे केवळ सत्ता हेच एकमेव कारण आहे का, याचा विचार करण्याची वेळ काँग्रेसच्या धुरिणांवर आली आहे. काँग्रेस हा १३५ वर्षांपेक्षा जुना पक्ष असून स्वातंत्र्य लढ्यातील अनेक प्रवाहांमधील एक प्रमुख प्रवाह म्हणूनही काँग्रेसची ओळख आहे. महात्मा गांधी ज्या पक्षाचे चार आणा सदस्यही नव्हते; पण ज्या काँग्रेसवर त्यांचा मोठा प्रभाव होता, अशी काँग्रेस स्वातंत्र्योत्तर काळात अनेक चढउतार बघत आली आहे. काँग्रेस सत्ताभ्रष्ट होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

काँग्रेसने अनेक संकटांचा सामना करीत आपली वाटचाल सुरूच ठेवली असून आजही अनेक पीडित, पतीत आणि दुर्बल घटकांना काँग्रेस हा आधार वाटत आहे. १९९६ ते २००४ या आठ वर्षांच्या काळात सत्तेबाहेर राहूनही काँग्रेसने भरारी घेत पुन्हा सलग दहा वर्षे देशात सत्ता चालवली होती. त्यामुळे सहा वर्षांपासून काँग्रेस सत्तेबाहेर आहे. म्हणजे काँग्रेस संपली असे म्हणण्याला काही आधार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळ ते स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस विचार हाच भारताचा मुख्य प्रवाहातील विचार राहिल्याने काँग्रेसच्या प्रभावाशिवाय या देशातील एकही संस्था नाही, अशी स्थिती असलेल्या काँग्रेसची सध्या स्वबळावर केवळ राजस्थान, छत्तीसगड आणि केरळ या तीन राज्यांमध्ये सत्ता असून सलग दोन वेळा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेता पद मिळवण्यासाठीचा आकडा गाठण्यात अपयश आले आहे. यामुळे काँग्रेससमोरील सध्याचे आव्हान हे २००४ च्या आव्हानापेक्षा किती मोठे आहे, याचा अंदाज येतो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधीच स्वांतत्र्योत्तर काळात मोदी हे काँग्रेससमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचा इशारा पक्षनेतृत्वाला दिला होता.

- Advertisement -

मात्र, तेव्हा काँग्रेसनेते मोदींना हिणवून काँग्रेसच्या अधिवेशनात चहाचा स्टॉल टाकायचा असेल तर आम्ही जागा देऊ शकतो,अशी दर्पोक्ती करणार्‍यांना महत्त्व देत होते. त्यानंतर सहा वर्षांनी काँग्रेसची सर्व आघाड्यांवर पिछेहाट सुरू असून जेथे काँग्रेसने निवडणुकीतून सत्ता मिळवली त्या मध्य प्रदेशातील सत्ता नुकतीच गमावली आहे. सत्ता गमावण्यापेक्षाही काँग्रेसमधील ज्योतिरादित्य शिंदे या युवा नेत्याला त्यांनी गळाशी लावले आहे. त्यानंतर चार महिन्यातच काँग्रेसमधील दुसरे लोकप्रिय युवा नेते सचिन पायलट यांनीही काँग्रेसशी काडीमोड घेतला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे कुठलेही पद नव्हते. त्यामुळे ते सत्तेसाठी भाजपमध्ये गेले या काँग्रेसच्या म्हणण्यालाही काही अर्थ आहे; पण राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष या दोन पदांवर असलेले सचिन पायलट यांनी काँग्रेस का सोडली असावी? राजस्थानमध्ये सध्या काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ असून भाजपासाठी मध्य प्रदेशपेक्षा येथे फारच वेगळी परिस्थिती आहे. मध्य प्रदेशात भाजप व कॉग्रेसमधील तफावत अगदीच थोडी होती. राजस्थानमध्ये परिस्थिती वेगळी असूनही उपमुख्यमंत्री पद पणाला लावून सचिन पायलट यांनी केलेले बंड म्हणूनच काँग्रेससाठी चिंतेचा विषय आहे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या अगदी तरुण वयात पक्षाकडून चांगली संधी देऊनही त्या व्यक्तीची तेथे घुसमट होत असेल तर त्याची काँग्रेसने चिंता केली पाहिजे.

मात्र, काँग्रेसचे शीर्ष नेतृत्व व इतर ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांच्यावर तडकाफडकी कारवाई करून पक्षशिस्तीबाबत आपण किती कठोर आहोत, हे दाखवण्यात दंग आहेत. सचिन पायलट यांनी भाजपशी संगनमत करून काँग्रेसविरोधात कटकारस्थान केल्याचा आरोप करणे सोपे आहे; पण विधानसभेत बहुमत नसलेला भाजप पायलट यांना त्यांच्याकडे असलेल्या पदांपेक्षा काय अधिक देऊ शकणार आहे, याचा कुणीही विचार करीत नाही. राजस्थानचे मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्या हकालपट्टीनंतर त्यांच्या पक्षविरोधी कारवाया सहा महिन्यांपासून सुरू असल्याचे म्हटले आहे. म्हणजे सहा महिन्यांपासून पायलट यांच्या कारवायांची जाणीव असतानाही पक्ष नेतृत्वाने त्यांना आणखी कारवाया करण्यासाठी सहा महिन्यांची मोकळीक देऊन एक प्रकारे पक्षाबाहेर जाण्याचा मार्गच मोकळा करून दिला, असाही त्याचा अर्थ होतो. आपला माणूस चुकत असेल तर त्याला चुका टाळण्यासाठी सावध केले जाते व शत्रू चुकत असेल तर त्याला चुकण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते, असे म्हणतात. या दृष्टीकोनातून या वक्तव्यातून बघितल्यास पायलट यांच्याविषयी काँग्रेसच्या वयोवृद्ध नेत्यांचे काय धोरण होते, हे लक्षात येते.

- Advertisement -

आता महत्त्वाच्या पदांवरून काढून टाकल्याने पायलट यांची कोंडी होईल आणि आपला विजय झाला, या भ्रमात काँग्रेस आणि त्यांचे ज्येष्ठ नेते वावरत आहेत; पण गांधी घराण्यातील तीन प्रमुख व्यक्तींपैकी दोन जण तरुण असलेल्या काँग्रेसमधील दोन तरुण नेते काही महिन्यांच्या अंतराने पक्ष का सोडून जात आहेत, याचा विचार करण्यास कुणालाही वेळ नाही. काँग्रेसमध्ये राहुल गांधी व प्रियांका गांधी या बहीण-भावाशिवाय कुणीही तरुण नेता नाही. या दोघांशिवाय इतर सर्व बुजूर्ग मंडळी महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियांमध्ये सहभागी असतात. राजकारण हे भविष्यावर नजर ठेवून वर्तमानात राहून करायचे असते. त्यामुळे ते अधिक व्यवहारी होत असते. मात्र, काँग्रेसमध्ये केवळ बुजूर्गांच्या भरवशावर घेतलेले निर्णय भविष्यकाळासाठी कितपत उपयोगी ठरतील किंवा पक्षाकडे युवा नेतृत्वाची फळी नसेल तर मतदारांकडे कसे आकृष्ट करणार? केवळ गांधी आडनावावर सत्ता मिळवण्याचे दिवस आता गेले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रीय मुद्यांबरोबरच स्थानिक नेतृत्वही महत्त्वाचे असते, असे मतदारांनी अनेकदा दाखवून दिले आहे. किंबहुना मतदारांच्या याच मानसिकतेमुळे लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी झालेल्या मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसचे हे दोन तरुण चेहरे बघूनच मतदान केले. एवढेच नाही तर काँग्रेसनेही सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे हेच आपले मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असल्याचा आभास निर्माण केला होता.

प्रत्यक्ष निवडणुकीनंतर आपल्या दरबारी राजकारणाला साजेशे वर्तन करीत काँग्रेसने पद्धतशीरपणे या दोघांना खड्यासारखे बाजूला केले. त्यानंतरही या दोन नेत्यांनी काँग्रेसशी निष्ठावान राहून पक्ष देईल त्या तुकड्यावर गुजरान करावी, अशी पक्षनेतृत्वाची अपेक्षा असेल तर काँग्रेस अजूनही आपले पतन झाले आहे, हे वास्तव स्वीकारण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. काँग्रेस आता संकटात असून या क्षणी पक्षाला उभारी देऊ शकणार्‍या, जनमतावर स्वार होऊ शकणार्‍या जननेत्याला प्रोत्साहन देऊन प्रत्येक राज्यात आपला पक्ष वाढवणे याला काँग्रेसने प्राधान्य देणे गरजेचे आहे. कारण भाजपची ताकद त्याच्या राष्ट्रीय नेतृत्वात असेल तर काँग्रेसने प्रादेशिक व स्थानिक नेतृत्वाला शक्य ते सर्व अधिकार देऊन प्रदेशस्तरावर पक्षाची ताकद वाढवण्यावर भर देण्याची व्यूहनीती आखली पाहिजे. उलट गांधी परिवार आजही इंदिरा गांधी यांच्या एक खांबी नेतृत्वाची नक्कल करून त्या पद्धतीने पक्ष चालवत आहे. यामुळे कर्तृत्ववान नेतृत्वाला तेथे संधी मिळत नाही. या आधीही काँग्रेसने आसाममधील काँग्रेसच्या तरुण नेतृत्वाची अशीच हेटाळणी केली आणि त्यांनी आसाममधून काँग्रेस संपवण्याची प्रतिज्ञा करून ती पूर्ण केली. म्हणजे हा केवळ सत्तापदे मिळवण्यापुरता प्रश्न नाही, तर तरुणांच्या कर्तृत्वाला काही संधी मिळणार आहे किंवा नाही हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोरचा मुख्य प्रश्न आहे. स्वतःचे कर्तृत्व नसणे आणि पक्षश्रेष्ठी देतील तो सत्तेचा तुकडा चघळत बसणे ही काँग्रेस निष्ठेची व्याख्या झाली आहे.

या व्याख्येत चपखल बसणारे काँग्रेसमध्ये खूश आहेत; पण आपले कर्तृत्व गाजवून राजकारणात मुलुख गाजवण्याची महत्त्वाकांक्षा असणार्‍याचे काय? त्यांचा येथे कोंडमारा होत असेल तर ते तशी संधी देऊ शकणार्‍या वातावरणाचा शोध घेणार हे अगदी नैसर्गिक आहे. राजकारण म्हटल्यानंतर तेथे शह काटशह आणि धोबीपछाड देणे या गोष्टी घडणे सहज आहे. अशा स्थितीत आपले घर सांभाळता न आलेल्यांनी केवळ दुसर्‍यांकडे बोट दाखवून आपला नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न अधिक दिनवाना दिसतो आणि जनसामान्यांंपर्यंत त्याचा चुकीचा संदेश जात असतो. त्यामुळे अशा रडक्या पक्षाचे अधिक नुकसान होत असते. त्यामुळे काँग्रेस टिकणे महत्त्वाचे आहे की गांधी घराण्याचे महत्त्व याचा निर्णय घेण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. तो निर्णय घेतला नाही तर प्रत्येक वेळी भाजपला शिव्या देण्याचा नेहमीचा उपक्रम राबवण्याशिवाय पर्याय उरणार नाही एवढेच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -