घरफिचर्सबीडच्या रेंचोची स्मार्ट डोकॅलिटी!

बीडच्या रेंचोची स्मार्ट डोकॅलिटी!

Subscribe

‘आई’ या छोट्या शब्दात संपूर्ण जग, सृष्टी सामावली आहे. मातृप्रेमाला कसलीच उपमा देता येत नाही. किंबहुना ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ एवढे सर्वोच्च स्थान आईला कुटुंब व्यवस्थेत देण्यात आले आहे. याचीच प्रचिती मराठवाड्यात घडली आहे. बीड तालुक्यातील कुर्ला जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीत शिकणार्‍या बालवैज्ञानिक ओंकार अनिल शिंदे याने डोळ्यात पाणी न येता कांदा कापता यावा यासाठी संशोधन करून स्मार्ट नाईफची निर्मिती केली आहे. त्याच्या या संशोधनाची दखल केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने घेतली आहे. त्याचे हे संशोधन दिल्ली येथे होणार्‍या राष्ट्रीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे.

ओंकार अनिल शिंदे या शालेय विद्यार्थ्याला कांदा कापताना आईच्या डोळ्यातून येणार्‍या पाण्याने अस्वस्थ केले आणि त्या जाणिवेतून एक अफलातून संशोधन त्याच्या हातून घडले. त्याने एक असा ‘स्मार्ट चाकू’ बनवला की, जेणेकरून आपल्या आईच्या डोळ्यातून कांदा कापताना पाणी येऊ नये. या अस्वस्थतेतूनच त्याने ‘स्मार्ट चाकू’ बनवला. जर कांदा कापताना बाहेर पडणारा गॅस डोळ्यांपर्यंत पोहचलाच नाही तर ? डोळ्यातून पाणी येणार नाही, असे ओंकारला वाटले. नंतर त्याने चाकूच्या मुठीवर ड्रोन मोटर बसवून त्याला छोटा फॅन जोडला आणि बॅटरीच्या साह्याने ऑपरेट करून कांदा कापताना बाहेर पडणारा गॅस विरुद्ध दिशेने ढकलण्याची व्यवस्था केली. परिणामी गॅस आणि डोळ्याचा संपर्क येत नसल्यामुळे डोळ्याला पाणी न येता आता सराईतपणे स्मार्ट नाईफच्या साह्याने कांदा कापता येतो.

चार्जिंग युनिट आणि कांदा कापणारी पाती वेगवेगळी करता येत असल्यामुळे कांदा कापल्यानंतर स्मार्ट नाईफची पाती धुणे सुलभ आहे. मोबाईल चार्जरच्या साह्याने तसेच सौर ऊर्जेवरही स्मार्ट नाईफ चार्ज करता येईल. स्मार्ट नाईफमध्ये छोटी किंवा मोठी अशा वेगळ्या आकाराची पाती वापरता येतात. हाय स्पीड ड्रोन मोटरचा यात वापर केला आहे. गृहिणींसाठी तसेच कांदा पोहे करणारे स्टॉल,भेळ गाडी,मोठे हॉटेल इत्यादी ठिकाणी हा स्मार्ट नाईफ अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.
खरे तर कांदे चिरताना गृहिणींच्या डोळ्यातून येणारे अश्रू ही एक सामान्य गोष्ट. घरोघरी रोज घडणारी, पण सातवीत शिकणार्‍या ओंकारला त्याच्या आईच्या अश्रूंनी अस्वस्थ केले. आजच्या काळात आई आणि मुले यांच्यातील पवित्र नात्याला काळिमा फासणार्‍या घटना घडत आहेत. कुठे आईलाच ‘माता न तू वैरिणी’ बोलण्याची वेळ येत आहे, तर कुठे मुले आईच्या जिवावर उठत आहेत. त्यातही मातृप्रेमाची फेड अपकाराने, हिंसक कृत्याने करणार्‍या मुलांची संख्या जास्तच वाढू लागली आहे अशातच बीड तालुक्यातील कुर्ला शाळेत शिकणारा ओंकार शिंदे हा जेमतेम सातवीतील चिमुरडा कांदा कापताना आईच्या डोळ्यातून येणार्‍या अश्रूंनी अस्वस्थ होतो आणि ते येऊ नये म्हणून ‘स्मार्ट चाकू’ बनवतो. हे दुसरे काही नसून आईच्या अश्रूंची ही ताकद आहे.

- Advertisement -

बीड तालुक्यातील कुर्ला इथल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिकणारा हा विद्यार्थी आहे. या ओमकारची चर्चा संपूर्ण राज्यभर होऊ लागली आहे. ओमकार शिंदे यांचे आई-वडील हे दोघेही शेतमजुरी करून कुटुंब चालवतात. आपल्याला शिकता आलं नाही म्हणून, हे दोघेही जण दिवसरात्रं शेतात राबून ओमकारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. अखेर मुलाची होणारी चर्चा पाहून त्यांचा उर अभिमानाने भरून आला आहे. यासाठी ओमकारला त्याच्या शिक्षकाकडून प्रेरणा मिळाली. शाळेतील शिक्षक भाऊसाहेब राणे त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. यापूर्वी देखील त्यांनी विद्यार्थ्यांकडून असे प्रयोग करून घेतले होते. मात्र ओमकारच्या या प्रयोगामुळे त्यांची देखील चर्चा होऊ लागली आहे.

आई आणि मुलाचं नातं कसं असतं खरंतर हे नव्याने सांगण्याची गरज नसते. आपल्या लेकाला जीवापाड जपणारी माऊली, त्याला कुठलीही इजा होऊ नये, दु:ख होऊ नये यासाठी कायम धडपडत असते, काळजी घेत असते. हे आपण नेहमी पहातो मात्र, आपल्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबवण्यासाठी आणि तिच्या डोळ्यात अश्रू येऊ नये म्हणून या विद्यार्थ्याने त्याच्या बुद्धी कौशल्याच्या बळावर एक अनोखा प्रयोग करून, आईचे अश्रू पुसण्याचाच एकप्रकारे प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.त्याच्या या कौशल्याचे सगळीकडून कौतुक केले जात आहे.

- Advertisement -

लेखक – राकेश बोरा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -