घरफिचर्ससारांश२०२३ने ‘बाईपण भारी देवा’ दाखवून दिलं!

२०२३ने ‘बाईपण भारी देवा’ दाखवून दिलं!

Subscribe

कोरोना महामारीच्या संकटातून सुटका होत असताना सर्वात शेवटी जर कोणतं क्षेत्र सुरू झालं असेल तर ते होतं मनोरंजन क्षेत्र. त्यामुळे सुटका होताच मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाचा ओघ वाढला. २०२३ या वर्षात साधारणतः ५५ मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्याची नोंद मिळते. अर्थातच सिनेरसिकांचं मनोरंजन करण्याच्या चढाओढीत काही फसतात, काही तरतात आणि काही बाजी मारूनच जातात. सरत्या वर्षातही असंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आहे.

वर्षाच्या पहिल्याच पंधरवड्यात ओपनिंगलाच परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाने बाजी मारली. डार्क ह्युमरचं उत्तम उदाहरण म्हणजे वाळवी! सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते आणि शिवानी सुर्वे या कलाकारांनी दिग्दर्शीय कौशल्याला उत्तम साथ दिली. त्यात कॅमेर्‍याची सुबक हाताळणी आणि चपखल संवाद यालाही तेवढंच महत्त्व होतं. खुर्चीला खिळवून ठेवणार्‍या अशा कलाकृतीला सिनेरसिकांची दाद न मिळाल्यास आश्चर्य! जानेवारीतच प्रदर्शित झालेला नितीन सुपेकर दिग्दर्शित ‘सरला एक कोटी’सुद्धा एक चांगली कलाकृती होती. ओंकार भोजने, ईशा केसकर आणि छाया कदम यांनी वाट्याला आलेल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. मराठी चित्रपटांना पुरेशी चित्रपटगृहे न मिळणे या कारणास्तव या चित्रपटाची फसगत झाली. टी. महेश दिग्दर्शित ‘घोडा’ आणि भाऊराव कर्‍हाडे दिग्दर्शित ‘TDM’ या चित्रपटांचीही हीच शोकांतिका झाली.

मार्चमध्ये तीन चित्रपट चर्चेत होते, रौंदळ, सातारचा सलमान आणि फुलराणी. भाऊराव कर्‍हाडे आणि नागराज मंजुळेंच्या ग्रामीण बाज असलेल्या सिनेमाचीच री ओढत दिग्दर्शक गजानन पाडोळ यांनी ‘रौंदळ’ साकारला आहे. नायकाच्या भूमिकेतला भाऊसाहेब शिंदे याचं खास वैशिष्ठ्य होतं. शेतमालाला योग्य भाव न देता शेतकर्‍यांना पिळून काढणारे दलाल आणि व्यवस्था याची कथा म्हणजे रौंदळ. गजानन पाडोळ यांनी दिग्दर्शकीय पदार्पणातच सहज सुटसुटीतपणे कथेला पुढे नेलं आहे. प्रेक्षकांसाठी ‘रौंदळ’ एक वेगळा अनुभव ठरला. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ विनोदी शैलीचा असला तरी खूप काही ग्रेट कमाल बॉक्स ऑफीसवर करू शकला नाही.

- Advertisement -

दिग्दर्शक विश्वास जोशींचा ‘फुलराणी’ चर्चेत आला. त्याची अनेक कारणं होती. मराठीतली सुबोध भावेसारखी स्टारकास्ट, हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकरचं चित्रपटातील पदार्पण, दिग्दर्शक म्हणून विश्वास जोशींचा ‘व्हॉट्सअप लग्न’, ‘घे डबल’सारख्या चित्रपटांचा आणि रूपेरी पडद्यावरील ‘नटसम्राट’च्या निर्मितीचा अनुभव आणि सोबतच ‘जॉर्ज बर्नार्ड शॉ’ यांच्या ‘पिग्मॅलियन’ या नाटकाची पार्श्वभूमी, ज्यावर यापूर्वी पु. लं.सारख्या महान साहित्यकारांनी ‘ती फुलराणी’ यशस्वीरीत्या साकारली होती. ते ग्रेटनेस या फुलराणीत पेरण्यात दिग्दर्शक कुठेतरी कमी पडले. म्हणूनच बहुदा प्रेक्षकांनी फुलराणीला बॉक्स ऑफिसवर करिष्मा करू शकेल अशी साथ दिली नाही.

एप्रिल ते जूनच्या दरम्यान दखल घ्यावी अशा काही मराठी चित्रपटांनी पदार्पण केलं. त्यात घर, बंदूक, बिर्याणी, महाराष्ट्र शाहीर, TDM, तेंडल्या, रावरंभा, बटरफ्लाय आणि बाईपण भारी देवा असे चित्रपट आहेत. गेला बराच काळ शांत असलेल्या लेखक-दिग्दर्शक केदार शिंदेंनी यावर्षी धमाका केला. ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘बाईपण भारी देवा’ या त्यांच्या चित्रपटांनी बाजी मारली. बॉक्स ऑफिसवरील आकडे सांगताहेत की, शाहीर साबळेंवर आधारित महाराष्ट्र शाहिरने सात कोटींच्या आसपास गल्ला जमवला, तर सहा बहिणींच्या सहा वेगळ्या तर्‍हा आणि बुरसटलेल्या समाजाला लगावलेली चपराक असणार्‍या ‘बाईपण भारी देवा’ने ९० कोटींच्या आसपास गल्ला जमवून नंबर एकचं स्थान पटकावलं.

- Advertisement -

या दोन्ही चित्रपटांना रसिकांची आणि समीक्षकांचीही दाद मिळाली. नागराज मंजुळेंचं वलय असलेल्या हेमंत आवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिर्याणी’चा प्रभाव बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा पडलेला दिसत नाही, पण प्रेक्षकांनी किमान एवढी बिर्याणी चाखलीच की ज्यामुळे पहिल्या १० चित्रपटांच्या यादीत याची वर्णी लागली. अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ हा ऐतिहासिक चित्रपट आहे. तरीही सध्याच्या ऐतिहासिक सिनेमांच्या भडिमारात राव आणि त्याची प्रेयसी रंभाची प्रेमकहाणी असलेला हा सिनेमा थोडा वेगळा ठरला.

बहुदा म्हणूनच पहिल्या दहात याचाही नंबर लागला. दिग्दर्शक मीरा वेलणकरनं ‘बटरफ्लाय’ चित्रपटातून एका सर्वसामान्य गृहिणीची, तिच्या इच्छा-आकांक्षांची कथा अत्यंत साध्या पण रंजक पद्धतीनं मांडली आहे. दिग्दर्शक म्हणून पहिल्याच प्रयत्नात ती यशस्वी ठरली. याबरोबरच पाच राज्य आणि एक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला ‘तेंडल्या’ हा नेहमीच्या चाकोरीबाहेरचा चित्रपट आहे. सांगलीतील नवोदित तरुणांनी पैशांची जुळवाजुळव करून ‘तेंडल्या’ चित्रपटाची निर्मिती केली, पण मराठी चित्रपटांना स्क्रीन न मिळण्याच्या मारामारीचा फटका ‘बटरफ्लाय’ आणि ‘तेंडल्या’ला बसला.

वर्षाच्या दुसर्‍या टप्प्यात परितोष पेंटर दिग्दर्शित ‘अफलातून’, दिगपाल लांजेकरांचा ‘सुभेदार’, हेमंत ढोमेचा ‘झिम्मा २’ आणि हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरचा ‘एकदा येऊन तर बघा’ या निवडक चित्रपटांना व्यावसायिक यश मिळालं असं बॉक्स ऑफिसवरच्या आकड्यांवरून निदर्शनास येतं. ‘सुभेदार’ लांजेकरांच्या शिवराज अष्टकातील पाचवं पुष्प आहे. या ऐतिहासिक चित्रपटाला मैलाचा दगड निश्चितच म्हणता येणार नाही. चुका त्यातही आहेत, पण लांजेकरांना पुरेसं कलात्मक स्वातंत्र्य घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन आणि निर्मात्याची व्यावसायिक गणितं साधण्याचं कसब चांगलंच जमलंय.

त्यामुळे ‘सुभेदार’चा गल्ला १३ कोटींच्या आसपास गेला. परितोषने ‘अफलातून’मधून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारी तीन मित्रांची कथा उत्तम पद्धतीनं मांडली आहे. त्यात सिद्धार्थ जाधव, खुद्द परितोष पेंटर आणि जयेश ठक्करसोबतच भरत दाभोळकर, विजय पाटकर, जॉनी लिव्हर, रेशम टिपणीस, जेसी लिव्हर अशा चांगल्या कलाकारांची लाभलेली साथ कामी आली आणि ‘अफलातून’ने १० कोटी पार केले.

‘झिम्मा २’मध्ये सात जणींची कथा असूनही मानवी भावनांचे विविध कंगोरे यातून प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा हेमंत ढोमेचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. त्याचीच पोचपावती म्हणजे बॉक्स ऑफिसवरील त्याचं यश. ‘झिम्मा २’ आता १४ कोटींपर्यंत आणि ‘एकदा येऊन तर बघा’ पाच कोटी पार करून वर्षअखेरीस अजून तग धरून आहेत. काही चित्रपट कलाकृती म्हणून चांगले असतात, पण त्यांना व्यावसायिक यश लाभत नाही. अशा सिनेमांच्या यादीत ‘नाळ २’, ‘आत्मपॅम्प्लेट’ आणि ‘श्यामची आई’ यांचा उल्लेख करावाच लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -