घरफिचर्ससारांशअब्रूची लक्तरे आणि विश्वगुरू होण्याचे वेध!

अब्रूची लक्तरे आणि विश्वगुरू होण्याचे वेध!

Subscribe

शत्रूला हरविण्यासाठी त्याच्या स्त्रियांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगून त्याला नामोहरम करण्याची परंपराच आहे. कारण स्त्रियांच्या अब्रूचा थेट संबंध त्या घराण्याच्या आणि समाजाच्या मर्दुमकीवर, आत्मसन्मानावर आघात मानला जातो. म्हणूनच आपल्या देशात सहजतेने निष्पाप महिलांना नागडं करीत तिची अब्रू लुटून आपला वचक दर्शविला जातो. मणिपूरमध्ये जे झालं तो असाच प्रकार आहे. खरंतर महिला आमदार, खासदारांनी पक्षभेद बाजूला ठेवून अशा अन्यायाविरोधात एकजूट व्हायला हवे. तसे त्या करीत नाहीत हे दुर्दैव आहे. हातात दारू, सिगारेट, पुरुषी कपडे, डोईवर फेटे आणि अस्खलित इंग्रजीत स्त्रीवादावर गप्पा मारणारा स्त्रियांचा एक वर्ग आहे. सोशल स्टेटससाठी फेमिनिस्ट म्हणून मिरवण्यात त्या धन्यता मानतात. भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी जगभर दौरे करणार्‍या आपल्या पंतप्रधानांना आपल्या पायाखाली पाय जळत आहे ते पाहण्यास वेळ नाही, याला काय म्हणावे?

– प्रतीक्षा पाटील

मणिपूरमध्ये घडलेल्या लिंगपिसाट, श्वापदांच्या नागव्या प्रदर्शनाचा व्हिडीओ पाहताना अंतर्बाह्य हादरून गेले. आजवर वाटली नाही इतकी भीती वाटत होती. सतत त्या निष्पाप महिलांच्या जागी आधी घरातील बायकांचा आणि नंतर माझा चेहरा दिसत होता. भारतीय म्हणवून घेण्याची लाज वाटावी की स्त्री देहात जन्माला आले हा अपराध झाला आणि त्याचे प्रायश्चित्त म्हणून देशातल्या सर्वच महिलांनी मिळून सामूहिक आत्मदहन करावे, हा विचार कित्येकदा मनात तरळून गेला. कमालीची अस्वस्थता निर्माण करणारी, आपले अस्तित्व फक्त योनीपुरते ही जाणीव करून देणारी ही घटना देवी म्हणून स्त्रीचे गोडवे गात तिच्या अब्रूचे धिंडवडे काढणार्‍या या देशाच्या धर्मांध, मनुवादी आणि पुरुषसत्ताक हिंस्र समाजाचे नागडे सत्य समोर आणणारी आहे.

- Advertisement -

मणिपूर राज्यातील मैतेई आणि कुकी व नागा या जमातींमधील संघर्ष कित्येक वर्षांपासून सुरू असल्याचे सर्वश्रुत आहे. १९ एप्रिल २०२३ रोजी मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मैतेई जमातीला अनुसूचीत जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीवर आपल्या शिफारसी सादर करण्याचे निर्देश दिले आणि या संघर्षाने पेट घेतला. अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळापासून मणिपूर जळत असताना राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही बघ्याच्या भूमिकेत होते. कित्येक निष्पाप जीव गेले, घरे जाळली, स्थलांतर झाले, शस्त्रास्त्रे लुटली गेली. प्रशासकीय अधिकारी असो, पोलीस अधिकारी यातही मैतेई आणि कुकी अशी फूट पडून आपापल्या समाजातील बांधवांच्या मदतीसाठी सज्ज झाले आणि वाद अधिक वाढला. या संपूर्ण घटनाक्रमात मुख्यमंत्री बिरेन सिंह मात्र कोणतीही ठोस कारवाई करताना दिसले नाहीत. यावरून मणिपूरमधील वादाला ठिणगी कुणी आणि कशासाठी दिली हे स्पष्ट होते.

रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता तसे मणिपूर जळत असताना आपले पंतप्रधान परदेशवार्‍या करून स्वत:ची जाहिरात करीत होते. स्त्रियांना विवस्त्र करून धिंड काढतानाचा व्हिडीओ सोशल माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळत असताना अडीच महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराबाबत मौन व्रत बाळगून झालेले सो कॉल्ड विश्वगौरव पंतप्रधान औपचारिकता म्हणून दोषींवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात बोलले. यानंतर एकदम सर्व यंत्रणा कामाला लागली आणि एका दोषीला अटकही झाली, जो मुस्लीम समाजाचा असल्याचे सांगितले जात आहे. एखाद्या घटनेला धार्मिक रंग देऊन राजकारण कसे करावे हे भाजपकडून शिकले पाहिजे.

- Advertisement -

४ मे रोजी घडलेली अमानवी घटना १९ जुलैला उघड होते, तोवर या घटनेबाबत स्थानिक प्रशासन, सुरक्षा यंत्रणा, माध्यमे कुणालाच गंध नसावा हे पटण्याजोगे आहे? आदिवासी समाजाच्या मतांसाठी या समाजातील महिलेला राष्ट्रपतीपदी बसविणे आणि आदिवासी महिलांच्या सन्मानासाठी लढणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. यंदा भाजपने विविध राज्यांत आदिवासी गौरव यात्रा काढून या समाजातील भोळ्या भाबड्या जनतेला सन्मानाच्या जगण्याचं, मुख्य प्रवाहात आणण्याचं गाजर दाखवलं खरं, मात्र तो केवळ प्रचाराचा भाग होता हे या घटनेने सिद्ध झाले आहे. यात केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारपेक्षाही जास्त संताप येतो तो सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील महिला नेतृत्वाच्या थंड आणि कातडी बचाव वागण्याचा. महिला प्रतिनिधी असेल तर ती महिलांच्या समस्यांना चांगल्या पद्धतीने समजून घेत त्यांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे लढू शकते, न्याय्य बाजू मांडून त्यांचे प्रश्न मांडू शकते ही माफक अपेक्षा पूर्ण करण्याइतक्या सक्षम महिला प्रतिनिधी आपल्याला लाभू नयेत यापेक्षा दुर्दैव ते काय असेल?

आदिवासी महिला राष्ट्रपती असूनही कुकी जमातीतील महिलांवर झालेल्या अन्यायाबाबत चकार शब्दही बोलू शकल्या नाहीत. देशाच्या महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृतीताई तर भाजप विरुद्ध काँगे्रस ही तुलना करण्यात व्यग्र आहेत. थोडक्यात सर्व महिला प्रतिनिधी आपापल्या ठरलेल्या राजकीय चौकटीबाहेर जाऊन बायांनो हा संपूर्ण स्त्रीजातीच्या अस्मितेचा लढा आहे, आपल्या सन्मानासाठी, लेकी-बाळींच्या सुरक्षित भविष्यासाठी या नराधमांविरोधात एकत्र होऊन लढूया, हे बोलायलासुद्धा धजावत नाहीत. पुरुषप्रधान संस्कृतीच्या वाहक होऊन गलिच्छ राजकारणाला साथ देणार्‍यांना महिला प्रतिनिधी म्हणणे योग्य आहे का? हा झाला राजकीय महिलांचा मुद्दा. सोयीचं राजकारण हा तर यांचा पिंडच आहे, परंतु समाजमाध्यमांवरील सुशिक्षित, उच्चभ्रू वर्गातील महिलादेखील निष्क्रिय आणि असंवेदनशील भूमिका घेतात याला काय म्हणावे? बर्‍याच लोकांनी मणिपूरच्या घटनेवर बोलताय तर गुजरात दंगलीत झालेल्या असंख्य बलात्कारांवर का बोलला नाहीत, हा प्रश्न उपस्थित केला.

संपूर्ण देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणार्‍या या निर्घृण गुन्ह्याची तुलना तरी कशी होऊ शकते? तेव्हा जे बोलले नाहीत ते आता बोलत आहेत, अन्यायाविरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवत आहेत हे गरजेचे असताना जुनी मढी उकरून घटनेचं गांभीर्य दुर्लक्षित करणं कोणत्या माणूसपणाचं लक्षण आहे. नऊवारी साडी नेसून नटून मुरडून बाईपण भारी म्हणतं ते साजरा करण्यासाठी ज्या एकजुटीने पुढे आलात, तीच एकता बाईपणाला जपण्यासाठी का पुढे येत नाही. आज जे कुकी जमातीच्या मुलींसोबत घडलं ते सर्रासपणे आपल्याही लेकीसोबत घडू शकतं ही साधी बाब लक्षात येऊ नये इतके रमलोय का आपण पुरुषप्रधान संस्कृतीने ठरवून दिलेलं बाईपण मिरवण्यात? या घटनेवर विरोधक आक्रमक होतील, राजकारण होईल, मतांसाठी कदाचित काही आरोपींना अटकही होईल, पण अशी घटना पुन्हा घडणार नाही याची खात्री आहे का?

ज्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवी मानलं गेलं, त्याच संस्कृतीने तिला दुबळी व्हायलाही शिकवलं आणि म्हणूनच आज महिला महिलांसाठीच उभ्या राहायला धजावत नाहीत. उदाहरण घ्यायचे झाल्यास आपल्या गरोदर पत्नीला संशय घेऊन घराबाहेर काढणारा राम आपण मर्यादापुरुषोत्तम म्हणून पुजतो. एका स्त्रीने आपलं प्रेम व्यक्त केलं म्हणून तिला विद्रूप करणारा लक्ष्मण आपल्याला महान वाटतो. द्रौपदीला भिक्षेसारखं वाटून तिला पणाला लावणारे पांडव आपल्याला धर्माचे रक्षण करणारे वाटतात. शील, चरित्र हेच स्त्रीचे सर्वस्व आहे. वेळ आल्यावर तिने जीव द्यावा, पण आपले शील राखावे, ही शिकवण देणारा आपला इतिहास आहे. आत्महत्या करण्यापेक्षा जीव घ्या हे आपल्याला नाही शिकवले गेले.

पद्मावती राणी असंख्य स्त्रियांसह आत्मदहन करून अमर झाली, पण हीच राणी त्याच असंख्य स्त्रियांसह एकत्र येऊन शत्रूविरोधात लढून मेली असती तर आपल्या रक्षणासाठी जीव देऊ नका, तर जीव घ्या हे उदाहरण कदाचित आज कित्येक मुलींना बळ देणारं ठरलं असतं. शत्रूला हरविण्यासाठी त्याच्या स्त्रियांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगून त्याला नामोहरम करण्याची परंपराच आहे. कारण स्त्रियांच्या अब्रूचा थेट संबंध त्या घराण्याच्या आणि समाजाच्या मर्दुमकीवर, आत्मसन्मानावर आघात मानला जातो. म्हणूनच आपल्या देशात सहजतेने निष्पाप महिलांना नागडं करीत, तिची अब्रू लुटून आपला वचक दर्शविला जातो. हातात दारू, सिगारेट, पुरुषी कपडे, डोईवर फेटे आणि अस्खलित इंग्रजीत स्त्रीवादावर गप्पा मारत सोशल स्टेटससाठी फेमिनिस्ट म्हणून मिरवणार्‍या निर्बुद्ध बायकांचा समूह खरा स्त्रीवाद घेऊन लढणार्‍या सक्षम महिला नेतृत्वाच्या संघर्षावर पाणी फिरवणारा आहे.

जातपात, धर्म, पंथ, भाषा यापलीकडे फक्त आपलं स्त्री असणं हेच आपल्याला एकमेकांच्या जवळ आणणारं आहे. कारण आता देशभरातील प्रत्येक स्त्रीला जोडणारा एक समान धागा आहे, तो म्हणजे वासनांध मानसिकतेने बरबटलेल्या नराधमांपासून सुरक्षित राहण्याच्या उद्देशाने पाऊलं उचलणं. त्यामुळे भगिनींनो बोला आपल्या बाईपणासाठी, पुढच्या पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि जिचा आपण भारतमाता म्हणून गौरव करतो त्या भारतभूमीच्या सन्मानासाठी एकजूट व्हा. कारण आपण अशा देशात राहतो ज्या ठिकाणी गायीपेक्षा बाईचं जगणं स्वस्त आहे. कारण आपलं सरकार फक्त खुर्ची राखण्यात व्यस्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -