आभाळागत माया तुझी … !

एका महाकादंबरीची नायिका म्हणजे माझी आजी मी घरातच पहात होतो. तिच्या अंगा-खांद्यावर वाढत होतो. इतरांच्या वाट्याला येते तसे स्त्रीशोषण तिच्या वाट्याला आले नसले तरी अगदी सामान्य स्त्रीच्या वाट्याला येते ते सहजीवनाचे सुख तिला लाभले नाही. हा अपवाद वगळला तर तिचे आयुष्य समृद्ध झाले ते फक्त एका घटनेने ते म्हणजे तिचे मातृत्व. माझ्या आईचा जन्म. ही एकच घटना तिच्या आयुष्याला समृद्ध करणारी ठरली. या एकमेव आधारावरच ती नव्वद वर्षे जगली. स्वत:च्या जीवनातील सगळी दु:खं बाजूला ठेवून तिने सगळ्यांवर माया केली. तिची माया आभाळागत होती.

आज्जी गेली, एकना एक दिवस ती जाणारच होती. आठ वर्षे मरणाच्या दारात झुंजून तिने अखेरचा श्वास घेतला. भारतीय स्त्रीचे शोषण, तिची घुसमट, पुरुषसत्ताक व्यवस्थेने आणि नियतीने तिच्या पदरात टाकलेले नाना परीचे दु:ख आपणास माहीत नाहीत असे नाही. हा विषय सनातन असाच. अशी हरतर्‍हेची दु:खं भोगलेल्या असंख्य स्त्रिया आपल्या अवतीभवती वावरत असतात. किंबहुना साहित्यातून अशा अभागी स्त्रियांची दु:खं, त्यांच्या शोकांतिका आपण पाहत, वाचतही आलेलो असतो. परंतु अशी स्त्री आपल्यात असेल तर? आपणास ते जाणवत नाही..‘वाडा चिरेबंदी’मधील दादी असो किंवा अरुण साधूंच्या ‘मुखवटा’मधील नानी. जयवंत दळवींच्या नाटकातील मावशी असो किंवा त्यांच्या ‘अंधाराच्या पारंब्या’तील नायिका.

या स्त्रिया पाहिल्या म्हणजे मला नेहमी आठवायची ती माझी आज्जी. तिचे जीवन यापेक्षा वेगळे नव्हतेच. या सर्व स्त्रिया कलात्मक पातळीवर उतरलेल्या मी पहात होतो, अनुभवत होतो. परंतु त्यापेक्षा वास्तवातील एका महाकादंबरीची नायिका मी घरातच पहात होतो. तिच्या अंगा-खांद्यावर वाढत होतो. इतरांच्या वाट्याला येतात तसे स्त्रीशोषण तिच्या वाट्याला आले नसले तरी अगदी सामान्य स्त्रीच्या वाट्याला येते ते सहजीवनाचे सुख तिला लाभले नाही. हा अपवाद वगळला तर तिचे आयुष्य समृद्ध झाले ते फक्त एका घटनेने ते म्हणजे तिचे मातृत्व. माझ्या आईचा जन्म. ही एकच घटना तिच्या आयुष्याला समृद्ध करणारी ठरली. या एकमेव आधारावरच ती नव्वद वर्षे जगली.

काकी याच नावाने ती ओळखली जायची. तीस-चाळीसच्या दशकात मराठवाड्यातील एका जमीनदार घराण्यात ती सून म्हणून आली. माहेर आणि सासर अशा दोन्ही घराण्याच्या समृद्ध वारसा तिला लाभलेला. लहानपणीच तिची आई वारलेली. आई वारली तरी तिच्या वडिलांनी दुसरा विवाह केला नाही. या बापानेच तिच्यासह चार भावंडाना लहानाचे मोठे केले. वयात आल्यावर जगरहाटीप्रमाणे तिचे लग्न जवळच्याच गावातीलच शिक्षक असणार्‍या माझ्या आजोबांशी लावले गेले. आता ती एका खटल्याच्या घरात सून म्हणून आली. मोठा बारदाना, इनामी जमीन, मोठी आमराई, दूध-दुभते असणार्‍या बीड जिल्ह्यातील देशपांडे पिंपरी या गावात ती सून म्हणून त्या घरात स्थिरावली.

माझी काकी डबल हाडाची, उंचपुरी, बघता क्षणी कुणीही प्रभावित होईल अशी भारदस्त. तिच्या या तेजाचे रहस्य मला शेवटपर्यंत समजले नाही. लहान वयातच आई गेल्याने समायोजनाची किमया साधलेल्या तिने सासरच्या लोकांना आपलेसे केले. संयुक्त कुटुंब असल्याने ही नवी सून काकी झाली. नव्या नवतीच्या या दिवसास सुरुवात होते ना होते तोच तिच्या पतीचे म्हणजेच माझ्या आजोबाचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेने आमची काकी लग्नानंतर दीडेक वर्षातच विधवा झालेली. त्यावेळी तिच्या पोटात होती ती माझी आई. लहानपणी तिची आई वारली, ती तिला आठवत नव्हती. आता बाप नसलेल्या लेकीचे आयुष्य उभे करण्यात ती गुंतून गेली. हे दु:ख कुण्या जन्माचे, असा प्रश्न तिला पडला नसला तरी या प्रश्नाने मला अनेकदा सतावलेय. पण या नियतीजन्य वेदनेला, दु:खाला काही उत्तर नसते. कोणत्याही तर्काच्या, उजेडात त्याला जोखता येत नाही. दैव असे म्हणून मोकळे होण्याशिवाय पराधीन माणूस दुसरे काय करू शकतो ?

तेव्हापासून बालविधवा म्हणूनच काकी त्या घरात वावरत होती.. शेतीची कामे असोत की घरकाम, याला तिने जुंपून घेतले. आपल्या लेकीत तिने पुढचे आयुष्य पाहिले. पुढे घरातील पुतण्या-लेकीबाळीची बाळंतपणे, वडीलधार्‍या आणि लहानग्यांचे भरणपोषण, त्यांचे संगोपन करण्यातच तिचा काळ व्यतीत झाला. यालाच तिने आपले सर्वस्व मानले. दिवसामागून दिवस सरत गेले आणि तिच्या लेकीचेही लग्न झाले. या काळात ती सर्व विसरली असेल का? घरात इतकी कामे असत की सकाळपासून अंथरुणाला पाठ टेकेपर्यंत हे विचार करण्यास तिला कधी वेळच मिळाला नाही. तिचे आयुष्य तिचे नव्हतेच मुळी. अखेरपर्यंत ती दुसर्‍याचाच विचार करत आली. दुसर्‍यांना चांगले खाऊ घालणे हीच तिची प्राथमिकता होती. अगदी तिच्या अखेरच्या क्षणी मी तिला भेटायला गेलो, तेव्हा तिचा आवाज क्षीण झालेला. त्या अवस्थेतही तिने मला ‘जेवलास का? जेवून घे’ अशी हाताने खूण केलेली. कोणताही माणूस तिने कधी उपाशी जाऊ दिला नाही. दुसर्‍यांच्या मदतीसाठी तिचा हात नेहमीच पुढे होता. तिच्या या प्रेमळ, निखळ स्वभावामुळेच तर ती गावची काकी झालेली. कुणाबद्दलचा द्वेष किंवा एवढे दु:ख पदरात पडूनही तिला रडताना मी कधीच पाहिले नाही. ती कधी निराश झाली नसेल का? की या सर्व मूक वेदना ती दाखवत नसेल? हे कळले नाही. समोर आलेल्या जीवनवास्तवाला निकराने झुंजण्याचे हे अजोड सामर्थ्य तिने कसे साधले असेल?..

तिचा मी सर्वात मोठा नातू असल्याने माझ्यावर तिचा अधिक जीव होता. अनेक स्थित्यंतरे तिने पाहिली.जमिनी विकल्या गेल्याने, कुळे लागल्याने आलेली विपन्नावस्थाही तिने अनुभवली. मागील शतकाच्या अखेरीस मी तिला माझ्याबरोबर नोकरीच्या गावी घेऊन आलो. ती इथेही सर्वांची काकी झाली. आम्हाला सर्वांनाच तिने मायेची उब दिली. तिचा आधार आश्वासक होता. तिच्यात एक अंगभूत शहाणपण होते. व्यावहारिक समज आणि खानदानी भारदस्तपणा हे तिचे विशेष होते. जगण्यावर प्रेम करायला तिनेच आम्हाला शिकवले. ठेविले अनंते तैसेची राहावे ! चित्ती असो द्यावे समाधान ! असेच तिचे जगणे होते. पण माणसांच्या मनावर होणारे आघात दिसत नसतात. काहीवेळा माणसांच्या वर्तनातून ते दिसतात. नवर्‍याच्या अकाली जाण्याचा धक्का ती विसरली नसेल. आम्ही कुणीही बाहेर गेलो की घरी येईपर्यंत ती अस्वस्थ असायची. अगदी माझी मुले शाळेतून यायच्या आधीच ती दारात जाऊन उभी राहिलेली दिसायची. हा तिच्या मनातील फोबिया होता का?

मध्यंतरी मी महिनाभराच्या कोर्ससाठी जयपूरला गेलेलो. परक्या मुलखात असे तिला सोडून इतके दिवस कधी बाहेर राहणे झाले नव्हते. तेव्हा तिने काय विचार केला माहीत नाही. मी परत आलो आणि त्यानंतर दीडेक महिन्यातच तिच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला. तिचे चालणे थांबले. ती अंथरुणाला खिळली. तरीही ती हरली नाही. जगण्याची असोशी संपली नाही. तिच्या जीवट वृत्तीने आठ वर्षे मरणाला दारातच थोपवले. ती जगण्याशी जशी झुंजली तशीच मरणाशीही. डॉक्टरांनी दिलेल्या अठ्ठेचाळीस तासांच्या मुदतीला तिने साफ खोटे ठरवले. आणि त्यानंतर आठ वर्षे ती जगली. शेवटी आठ दिवस खाणे-पिणे बंद करून ती अनंताच्या प्रवासाला निघून गेली. शेवटच्या सहा महिन्यात तिला तिची अखेर कळली होती. कधी नव्हे ते गावी घेऊन जाण्याचा लकडा तिने लावला होता. दिवाळीच्या पाडव्याला तिला गावी, घरी घेऊन गेलो आणि होळीच्या आधीच तिची चिता पेटवावी लागली आणि काकी गेली. आमच्या घरातील एका पर्वाचा, एका पिढीचा अस्त झाला.
ती जाणारच होती. पण असा आयुष्यभर मनाला चटका लावून जाईल असे वाटले नव्हते. तिचे दु:ख, तिचे आयुष्य, तिच्या अव्यक्त मूकवेदना आणि सुखाची अबोल स्वप्ने कधीच उजागर झाली नाहीत. संधी प्रकाशासारखी तिची अस्तित्वाची सावली ती मागे ठेवून गेली. तिचे दु:ख, तिचे जगणे आशयात मावणारे नव्हतेच मुळी …..

–डॉ.अशोक लिंबेकर