घरफिचर्ससारांशअंतर्मनाला प्रेमाची साद घालणारा ‘वेड’

अंतर्मनाला प्रेमाची साद घालणारा ‘वेड’

Subscribe

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं,’ या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या ओळी जितक्या आपल्याला समर्पक वाटतात तितक्याच ताकदीने रितेश विलासराव देखमुख दिग्दर्शित ‘वेड’ नावाचा सिनेमा आपल्या अंतर्मनाला साद घालणारा आहे. हा सिनेमा बघून ‘प्रेम म्हणजे ‘वेड’ असतं,’ असंच म्हणावं लागेल.

– आशिष निनगुरकर

प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याने गेल्या वर्षभरापूर्वी पहिला सिनेमा दिग्दर्शित करणार असे जाहीर केले होते आणि त्याचा हा पहिला सिनेमा मराठी असेल हे ऐकून भारी वाटले होते. त्याने दिग्दर्शित केलेला पहिलावहिला मराठी चित्रपट ‘वेड’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा आहे.

- Advertisement -

सिनेमाचे कथानक काळजाला स्पर्श करणारे आहे. ही गोष्ट आहे सत्याची. सत्या (रितेश देशमुख) याला दोन गोष्टींचं वेड आहे. एक आहे क्रिकेट आणि दुसरं आहे त्याचं प्रेम निशा (जिया शंकर). सत्याइतकंच निशाचंसुद्धा सत्यावर जीवापाड प्रेम असतं, पण नियतीला हे मंजूर नसतं. घटनाक्रम असा काही घडतो की निशा सत्यापासून दुरावते आणि तिच्या आठवणीत सत्या दारूच्या आहारी जातो. वर्षामागून वर्षे जातात, पण सत्या काही केल्या निशाच्या आठवणीतून बाहेर येत नसतो आणि त्याचे व्यसनही वाढत जाते. अशा वेळी सत्याच्या आयुष्यात येते श्रावणी (जेनेलिया देशमुख). ज्याप्रमाणे सत्याला निशाचे वेड असते त्याचप्रमाणे श्रावणीला सत्याचे. सत्याच्या शेजारी राहणार्‍या श्रावणीला सत्या आणि निशाबद्दल सर्व काही माहीत असूनही ती सत्याशी लग्न करते.

श्रावणी रेल्वे विभागात कामाला असते. सत्याचे दारूचे व्यसन आणि या दोघांचा संसार हा श्रावणीच्या कमाईतून चालू असतो. सत्याचे पूर्वीचे क्रिकेट कोच त्याला दिल्ली येथे अंडर-१४ च्या टीमच्या ट्रेनिंगसाठी खूप दिवसांपासून बोलावत असतात. एके दिवशी अचानक सत्या दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतो, पण दिल्लीत पोहचल्यावर त्याच्यासमोर एक धक्कादायक वास्तव उभे राहते. ते काय? आणि या सर्व परिस्थितीतून सत्या बाहेर कसा येतो हा पुढील कथाभाग.

- Advertisement -

चित्रपटाची बांधणी सरळ नसून भूतकाळ आणि वर्तमान यांना बांधणारी आहे. रितेशने रंगवलेला सत्या मनाला भिडतो. त्याच्यावर आलेली परिस्थिती, त्याला धड क्रिकेटमध्ये जम बसवता येत नाही आणि प्रेयसीदेखील मिळत नाही. या दुःखातून मार्ग शोधण्यासाठी तो व्यसनांकडे वळतो. हे त्याने त्याच्या भूमिकेतून उत्तमरीत्या वठवले आहे. अशातच मग पुढे येते ती श्रावणी जी या परिस्थितीतदेखील त्याच्याशी लग्न करते आणि मग सुरू होतो त्यांचा प्रवास. सत्याचे वडील, श्रवणीचे आईवडील सत्याच्या अशा अवस्थेमुळे चिंतेत असतात. अशातच एक दिवस सत्याला प्रशिक्षकाच्या नोकरीची संधी येते आणि तो दिल्लीला जातो आणि इथून पुढे कथानक वेगळ्या वळणावर जाते. सत्या आणि श्रावणी शेवटी एकत्र येतात का? त्यांचा एकमेकांच्या प्रेमासाठीचा संघर्ष संपतो का? यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल.

क्रिकेट खेळण्यात पटाईत असणारा सत्या आणि त्याच्या खर्‍या प्रेमाची ही गोष्ट आहे. शेखरअण्णा नावाचा गुंड सत्याचा पक्का वैरी आहे. तो का आणि कसा याची कथा चित्रपट पाहिल्यावरच समजेल. सत्याचं श्रावणीसोबत लग्न झालेलं आहे. लग्नाला सात वर्षे होऊन दोघांमध्ये एक दरी आहे. बेकार असलेला सत्या कायम दारू आणि सिगारेटच्या नशेत असतो. रेल्वेत काम करणारी श्रावणी त्याला दारूसाठी पैसे देते. सासरे काही बोलले तरी पतीच्या बाजूने बोलते. पतीसाठी वडिलांसोबतही भांडते. असं असूनही सत्या आणि श्रावणीमध्ये दुरावा का याची उत्तरं १२ वर्षांपूर्वीच्या फ्लॅशबॅकमध्ये मिळतात, जे थिएटरमध्ये पाहायला मजा येईल.

हा चित्रपट मूळ ‘मजिली’ या दाक्षिणात्य चित्रपटावर बेतला आहे. रितेशने पहिल्यांदाच दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. त्यामुळे चित्रपटात काही त्रुटी जाणवतात तसेच चित्रपटात त्याने अभिनयदेखील केला आहे. सत्या त्याने उत्तम वठवला आहे. निशाच्या भूमिकेत असणारी जिया शंकर शोभून दिसते. जेनेलियाने खंबीर तितकीच हळवी अशी श्रावणी उत्तम साकारली आहे. तिचा हा पहिला मराठी चित्रपट. मराठी भाषा बोलताना हे जाणवते, पण तिने तिच्या भूमिकेतून निभावून नेले आहे. सत्याच्या वडिलांच्या भूमिकेत अशोक मामा भाव खाऊन जातात. श्रावणीच्या वडिलांची भूमिका करणारे विद्याधर जोशी यांची भूमिकादेखील मस्त झाली आहे. सत्याच्या मित्राची भूमिका करणारा शुभंकर तावडे लक्षात राहतो. सिनेमाच्या सुरुवातीला जितेंद्र जोशी व सिद्धार्थ जाधव यांचे दर्शन घडते.

मार्मिक संवादातून विनोद करीत त्यांनी मजा आणली आहे. इतर कलाकारांचे अभिनय चोख आहेत. चित्रपटातील उत्तम बाजू म्हणजे छायाचित्रण आणि संगीत, दोन्ही गोष्टी उत्तम जमून आल्या आहेत. चित्रपटाची सर्वात उजवी अथवा जमेची बाजू आहे अजय-अतुल यांचे बहारदार संगीत जे की प्रदर्शनाच्या आधीच हिट झालंय. ‘वेड लागलंय’ आणि ‘वेड तुझा विरह वणवा’ ही दोन्ही शीर्षक गीते अफलातून जमून आली आहेत. शिवाय ‘बेसुरी मी’ आणि ‘सुख कळले’ ही गाणीसुद्धा तितकीच श्रवणीय आहेत. पार्श्वसंगीत, छायांकन, अ‍ॅक्शन दृश्ये याबाबतसुद्धा चित्रपट उजवा आहे. मध्यंतरापूर्वी आणि नंतर कुठेही चित्रपटाची गती फारशी मंदावत नाही. पटकथा आणि संवादसुद्धा प्रभावी आहेत. रितेश, जेनेलिया आणि जिया शंकर या तिघांनी छान काम केले आहे. रितेशने पहिल्या चित्रपटाच्या मानाने उत्तम दिग्दर्शन केलंय आणि संदीप पाटील व ऋषिकेश तुरई यांच्यासोबत लिहिलेल्या पटकथेमध्ये मराठी पार्श्वभूमी देत केलेले बदलसुद्धा छान आहेत. रिमेक असल्यामुळे कथेत नावीन्य आहे असे नाही म्हणता येणार, पण हो, मराठी प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून चित्रपटाची निर्मिती मूल्ये चांगली असल्याने तांत्रिकदृष्ठ्यासुद्धा चित्रपटाची प्रत्येक फ्रेम भव्य आणि कलरफुल आहे.रितेशनं प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचं चित्रपट पाहिल्यावर जाणवतं. दोन्ही नायिकांसोबतची रितेशची अफलातून केमिस्ट्री सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे.

प्रेम तूही केलंस आणि मीही… प्रेम तुझ्यातही आहे आणि माझ्यातही… ज्याचं आपल्यावर प्रेमच नाही त्याच्यावर प्रेम करायचं दुखणं तुम्हाला नाही कळणार… हे आणि असे बरेच प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेले अर्थपूर्ण संवाद चित्रपट संपल्यानंतरही मनात रुंजी घालतात. प्रेमाच्या लढाईत क्रिकेट आणि त्यातलं राजकारणही असलं तरी प्रेमावर फोकस करण्यात आला आहे. मुख्य भूमिका आणि दिग्दर्शनातील ताळमेळ रितेशनं अचूकपणे साधला आहे. अशोक सराफ यांनी आपल्या मजेदार शैलीद्वारे चित्रपटात ह्युमर आणला आहे. विद्याधर जोशींसोबतची त्यांची जुगलबंदी पाहण्याजोगी आहे. अजय-अतुल आणि गुरू ठाकूर यांनी कथेच्या प्रवाहाशी एकरूप होणारं गीतलेखन केलं असून अजय-अतुलनं आपल्या अनोख्या शैलीत श्रवणीय संगीत दिलं आहे. कला दिग्दर्शनात बर्‍याच उणिवा राहिल्या आहेत. एक-दोन दृश्यांमध्ये मोबाईल आणि स्कूटरवरील नंबर प्लेट पाहिल्यावर नेमका कोणता काळ दाखवण्याचा प्रयत्न केला ते समजत नाही. डॉल्बी अ‍ॅटमॉसमध्ये साऊंड इफेक्टसचा अनुभव घेताना पैसे वसूल होतात. कॅमेरा आणि सिनेमॅटोग्राफी सुपर आहे. पार्श्वसंगीत, संकलन, फाईट सिक्वेन्स, लोकेशन्स परफेक्ट आहेत.

‘प्रेमाचा त्रिकोण’ भारतीय चित्रपटसृष्टीतील हा विषय म्हणजे हुकूमाचा एक्का. प्रेम म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, हक्क गाजवतो तसंच त्यानेदेखील आपल्यावर प्रेम करावं ही सर्वसामान्य अपेक्षा व्यक्ती ठेवत असतात, मात्र त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम नसूनदेखील त्याच्यावर प्रेम करावं ते इतकं की त्या व्यक्तीच्या वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करत फक्त प्रेम करावं, हीच गोष्ट घेऊन आले आहेत.

अवश्य पाहावा, जरूर पाहावा आणि हो सिनेमागृहात जाऊन पाहावा. खूप दिवसांनी क्लास आणि मास अशा दोन्ही प्रेक्षकांना आनंद देणारा मराठी सिनेमा आलाय. वर्षाच्या अखेरीस आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला मराठी सिनेसृष्टीसाठी आलेली ही आनंदाची आणि खूप मोठा दिलासा देणारी घटना आहे. त्याला उत्तम प्रतिसाद देणे आता आपले काम आहे. सध्या ऐतिहासिक, बायोपिक अशा धाटणीच्या चित्रपटांची चर्चा सुरू असताना एक वेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. प्रेम माणसाला काय देतं, असं म्हणतात. प्रेमात माणसं पडतात, पण ती पडत नसतात, तर ती उभी राहतात. प्रेम माणसाला चालायला, वागायला, लढायला आणि मुळात जगायला शिकवतं. जे लोक प्रेमात वेडे आहेत आणि जे लोक वेड्यासारखे प्रेम करतात अशांसाठी हा चित्रपट नक्कीच पर्वणी ठरेल.

आशिष निनगुरकर
९०२२८७९९०४
[email protected]

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -