घरफिचर्ससारांशमानवापेक्षा बुद्धिमान गॅजेट्सचं युग

मानवापेक्षा बुद्धिमान गॅजेट्सचं युग

Subscribe

अलेक्सा, सिरी, कोर्टेना आणि गुगल असिस्टंट एवढे प्रगत झालेत की ते तुमची बोलीभाषाही अत्यंत चांगल्या पद्धतीने समजू लागलेत. घरातले गॅजेट्स एकमेकांशी परस्पर संवाद साधत त्याचे अपडेट्स तुमच्या स्क्रिनवर पाठवू लागलेत. विचार करण्याची दैवी देणगी मानवनिर्मित कृत्रिम बुद्धिमत्तेला मिळालीय. याच बदलामुळे डिजिटल युग आलंय.

अलेक्सा, सिरी, कोर्टेना आणि गुगल असिस्टंट एवढे प्रगत झालेत की ते तुमची बोलीभाषाही अत्यंत चांगल्या पद्धतीने समजू लागलेत. घरातले गॅजेट्स एकमेकांशी परस्पर संवाद साधत त्याचे अपडेट्स तुमच्या स्क्रिनवर पाठवू लागलेत. विचार करण्याची दैवी देणगी मानवनिर्मित कृत्रिम बुद्धिमत्तेला मिळालीय. याच बदलामुळे डिजिटल युग आलंय. छतावर अँटेना, डिश किंवा केबल कनेक्शन नसतानाही आपण टीव्ही चॅनेल्स पाहू शकतो याचा विचारही गेल्या दशकात कुणी केला नसावा, मात्र अफाट वेगाने तंत्रज्ञानात होत असलेली क्रांती, वेगवान इंटरनेट आणि काळाची गरज पाहता हे युग मानवापेक्षाही बुद्धिमान गॅजेट्सचं असेल आणि प्रत्येक क्षेत्र या बदलाने व्यापून गेलेलं असेल. अशा या बदलत्या तंत्रज्ञानाचा घेतलेला हा वेध.

महत्त्वाच्या कामांसाठी वापरला जाणारा एखाद्-दुसरा कॉम्प्युटर, कॅसेट प्लेयर, टीव्ही आणि वायरविना चालणारा रेडिओ ही तीन साधनच कधीकाळी विज्ञानाचा आविष्कार होती. ट्रान्सिस्टरपाठोपाठ इंटरनेटचा उदय झाला आणि हीच साधनं आधुनिक स्वरूपात एकविसाव्या शतकाची गरज बनली. दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती होऊन पेजरपाठोपाठ मोबाईल दिसू लागले. पुढे स्क्रिन मोठी आणि इंटरॅक्टिव (टचस्क्रिन) बनली. वेगवान इंटरनेटमुळे ऑडिओ-व्हिडीओचं रिअल टाईम स्ट्रीमिंग शक्य झालं. मोबाईलवरच क्षणार्धात अपडेट्स मिळत असल्याने टीव्हीसमोर बसून घडामोडी पाहण्याचे दिवस आता इतिहासजमा झालेत. दुसरीकडे प्रकाशाच्या वेगाने संदेशवहनाचे माध्यम असलेल्या ऑप्टिकल फायबर केबल्सचं जाळं देशभरात विणलं गेल्याने इंटरनेट, टीव्ही आणि फोन या तीन वेगवेगळ्या सेवा एकाच केबलमधून मिळणं शक्य झालंय. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे तुम्हाला वाटेल तेव्हा तुमची आवडती सीरियल, त्याचा एखादा भाग, चित्रपट, वेबसीरिज किंवा आवडीची गाणी तुम्ही बघू शकता.

- Advertisement -

अलेक्सा या कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल, स्मार्ट वॉच आणि स्मार्ट डिव्हाईसेसमुळे तर तुमच्या दिमतीला ‘अलादिन का जीन’ उभा असतो, जो तुमच्या प्रत्येक आदेशाला (व्हॉईस कमांड) हजरजबाबी उत्तर देतो, तुमचं ऐकतो, अगदी तुम्हाला जोकही ऐकवतो. अ‍ॅपलची सिरी, गुगलची असिस्टंट, मायक्रोसॉफ्टची कोर्टेना हेदेखील अलेक्सासारखेच व्हॉईस बेस्ड सॉफ्टवेअर्स आहेत. रिमाईंडर सेट करणं, गाणी ऐकवणं, फोन कॉल्स लावणं, घरातील उपकरणं नियंत्रित करणं अशी कितीतरी कामं या तंत्रज्ञानामुळे शक्य झालीत.

पुढच्या काही वर्षांत तंत्रज्ञान आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार करण्याच्या तयारीत आहे. त्यात स्वयंचलित कार, स्वनियंत्रित गॅझेट्स, आभासी अनुभूती (व्हर्च्युअल रियालिटी), फोल्डेबल स्क्रिन, स्मार्ट इअर बड्स अशा अनेक बाबींचा समावेश असेल. गुगलने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानावर आधारित सेल्फ ड्रायव्हिंग कार रस्त्यावर उतरवल्यानंतर आता इतरही अनेक कंपन्यांनी अशाच तंत्रज्ञानावर आधारित वाहने बाजारात दाखल केलीत. केवळ कारच नव्हे तर आगामी कालावधीत स्मार्ट होमची संकल्पनाही प्रत्यक्षात साकारली जाईल, जेणेकरून आपण कुठेही असलो तरीही स्मार्ट फोनद्वारे घरातल्या फ्रीज, लाईट्स, ओव्हन, फॅन, एसी, सीसीटीव्ही, स्मार्टस्क्रीन अशा गॅझेट्स नियंत्रण करणं शक्य होईल किंवा घरातले गॅझेट्स एकमेकांशी समन्वय ठेवत कार्य करतील. त्यामुळे विजेचीही मोठी बचत होईल. हे तंत्रज्ञान केवळ घरातच नव्हे तर कृषी, सुरक्षा, दळणवळण, बांधकाम, भारतीय भूदल, उद्योग, वैद्यकीय क्षेत्र, ऊर्जा व्यवस्थापन, पर्यावरण संतुलन अशा प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त ठरेल.

- Advertisement -

बदलत्या तंत्रज्ञानाची आणखी एक महत्त्वाची देणगी म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) अर्थात मशीन लर्निंग. यात गॅझेट्स हे माणसासारखे विचार करू शकतात आणि त्यांच्याकडे संकलित असलेल्या डेटावर प्रोसेस करून त्यांच्या परीने उत्तर शोधून देतात. एखाद्या चमत्कारासारखे वाटणार्‍या या तंत्रज्ञानावर अनेक दिग्गज संस्था काम करताहेत. या ‘एआय’मुळे ज्या ठिकाणी हे तंत्रज्ञान वापरले जातेय त्यातला दोष हेरून तो दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करणे किंवा त्याची माहिती त्याच्या नियंत्रकापर्यंत पोहचविणे शक्य होणार आहे. सीमा सुरक्षा, शिक्षण, औद्योगिक क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांसाठी हे तंत्र उपयुक्त ठरणार आहे.

थिंक टँक आणि बिग डेटा

माहितीचे आदान-प्रदान ज्या वेगाने होतेय त्याच वेगाने ही माहिती साठवून तिचे वर्गीकरण करणेही काळाची गरज बनलेय. अर्थात दररोज काही हजारो जीबी (गिगाबाईट्स) माहितीची निर्मिती होते आणि ती स्टोअरही होत असते. यातली बरीचशी माहिती ही क्लाऊड स्टोअरेजला सेव्ह होते. त्यामुळे माहितीची साठवण, गरज असेल तेव्हा कमीत कमी वेळेत प्रोसेस होऊन अचूक माहिती मिळविण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत आहे. विशेषतः गुगल, फेसबुक, अमेझॉन यांसारख्या कंपन्या बिग डेटासाठी काम करत आहेत. एखाद्या व्यक्तीच्या आवडीनिवडी काय, तो कुठे जातो, काय खातो अशी बारीकसारीक माहिती स्टोअर केली जात असल्याने याचा उपयोग मार्केटिंग कंपन्यांनाही होतो. यामागे डेटा अ‍ॅनालिसीसचा मोठा हात आहे.

बसल्या जागी जगाची सफर

कॉम्प्युटर गेम्स, पीएसपी, प्लेस्टेशन यापाठोपाठ व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी अर्थात तुम्हाला आभासी विश्वात घेऊन जाणारे तंत्रज्ञान स्क्रिन बघण्याचा दृष्टिकोनच बदलणार आहे. म्हणजे गेम खेळताना तुम्हाला प्रत्यक्ष युद्धभूमीवर असल्याचा थरार अनुभवता येईल. घरात बसून हवाई सफर करता येईल. एवढंच नव्हे तर एखाद्या पर्यटनस्थळी प्रत्यक्ष न जाताही तिथली अगदी जशीच्या तशी अनुभूतीदेखील घेता येईल. गुगल स्ट्रीट व्ह्यू किंवा थ्रीडी इमेजिंग हे याचं प्राथमिक उदाहरण ठरेल. या तंत्रज्ञानात वास्तविक जग आणि इंटरनेट एकमेकांना संलग्न केलं जाईल. त्यात जीपीएसचाही वापर केलेला असेल. हेच तंत्रज्ञान वैमानिकांना प्रत्यक्ष उड्डाणापूर्वी दिल्या जाणार्‍या प्रशिक्षणासाठी (सिम्युलेटर) अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. आजही अनेक अ‍ॅप्समध्ये तुमच्या चेहर्‍याला कोणत्या प्रकारचा गॉगल चांगला दिसतो, घरात एखादी वस्तू कशी दिसेल हे बघता येते. त्यापुढील पायरी या तंत्रज्ञानामुळे गाठता येईल.

(लेखक आपलं महानगरच्या नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक आहेत)

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -