घरफिचर्ससारांशएकांताचा आवाज हरपला

एकांताचा आवाज हरपला

Subscribe

भारतात असे काही गायक आहेत ज्यांचा आवाज त्यांची ओळख होती. किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश, सोनू निगम, कुमार सानू, रुपकुमार राठोड, विनोद राठोड ही त्यापैकी काही नावं म्हणून जेव्हा कधी यांची गाणी सिनेमाच्या पडद्यावर यायची तेव्हा नायक कोणीही असला तरी चेहरा मात्र त्या गायकाचाच समोर यायचा, पण केकेच्या बाबतीत असं आढळत नाही. त्याने गायलेली गाणी लक्षात राहतात, त्यावर ओठ हलवणारा इम्रान, सलमान, शाहरुख लक्षात राहतो, पण ती गाणी गाणारा केके आहे हे अनेकांना माहिती नसतं. तो गेल्यानंतर कळाल की, अरेच्चा हे गाणंसुद्धा केकेने गायलंय, एकदा गाणं गायलं की, ते चाहत्यांसाठी सोडून द्यायचं आणि पुन्हा नवीन गाणं गायचं, हीच त्याची खासियत... &.................

आता काय उरलंय आयुष्यात, असा विचार करत जेव्हा कधी शांत आकाशाखाली कानात इयरफोन घालून बसतो, तेव्हा त्याचीच साथ असायची. कधी जन्मोजन्मीच्या साथीची वचनं देणारी माणसं याच जन्मात आपल्याला बाजूला करतात, तेव्हासुद्धा त्याचाच आधार असायचा. शाळेतल्या मित्रांची आठवण आली की, तो आणि एखादा दिवस वाईट गेला तरी तोच.. का कुणास ठाऊक, पण त्याच्या आवाजात एक आपलेपणा होता. आवाजाचा जादूगार, सुरांचा बादशाह हे शब्द त्याच्यासाठी कधीच नव्हते, तो तर फक्त साथीदार होता, प्रत्येक एकाकी पडलेल्या व्यक्तीचा…. त्याची कारकीर्द आणि चाहते यात वैविध्य आढळेल, वयाच्या तिशीतले असो किंवा विशीतले प्रत्येक वयोगटात त्याचे चाहते मिळतात.

त्याचं जाणं अनेकांना धक्का देणारं आहे, पण या काळातही त्याचीच गाणी त्याच्या सर्व चाहत्यांसाठी आधार होता. कृष्णकुमार कुन्नथ हे त्याचं मूळनाव अनेकांना कदाचित माहीतही नसेल, पण त्याची गाणी आजही अनेकांच्या ओठांवर कायम आहेत. केकेच्या आवाजात एक भावना होती, आजही कदाचित त्याच्यापेक्षा उत्तम गाणारे काही गायक असतील, पण त्यांच्या आवाजात ती भावना त्या प्रमाणात मिळणार नाही. भारतात असे काही गायक आहेत ज्यांचा आवाज त्यांची ओळख होती. किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश, सोनू निगम, कुमार सानू, रुपकुमार राठोड, विनोद राठोड ही त्यापैकी काही नावं म्हणून जेव्हा कधी यांची गाणी सिनेमाच्या पडद्यावर यायची तेव्हा नायक कोणीही असला तरी चेहरा मात्र त्या गायकाचाच समोर यायचा, पण केकेच्या बाबतीत असं आढळत नाही.

- Advertisement -

त्याने गायलेली गाणी लक्षात राहतात, त्यावर ओठ हलवणारा इम्रान, सलमान, शाहरुख लक्षात राहतो, पण ती गाणी गाणारा केके आहे हे अनेकांना माहिती नसतं. तो गेल्यानंतर कळाल की, अरेच्चा हे गाणंसुद्धा केकेने गायलंय, एकदा गाणं गायलं की, ते चाहत्यांसाठी सोडून द्यायचं आणि पुन्हा नवीन गाणं गायचं, हीच त्याची खासियत… साडेतीन हजारांवर जिंगल्स गायल्यानंतर सिनेमात गाण्यासाठी मिळालेली एक संधी आणि त्यानंतर आजपर्यंतचा अविरत प्रवास हा एकट्या केकेचा प्रवास नव्हता, तर त्याच्यासोबत मोठ्या होणार्‍या एका पिढीचा, त्या पिढीच्या प्रेमाचा,आठवणींचा, दुःखाचा आणि जल्लोषाचा प्रवास होता, त्याच प्रवासाचा एक भाग म्हणून त्यावर लिहिण्याचा हा प्रयत्न.

दिल्लीतील मल्याळी कुटुंबात जन्मलेल्या केकेला गायनाचे धडे मिळाले ते त्याच्या आईकडून, गाणं ऐकायचं आणि गायचं हेच काय त्याच प्रशिक्षण… त्याने गायनाचं कुठलंही शास्त्रीय असं प्रशिक्षण घेतलं नव्हतं, घरी लोक आले, त्याने गाणं म्हटलं लोकांना आवडलं, नंतर शाळेच्या कार्यक्रमात गाणं म्हणू लागला तिथं बाकी लोकांना गाणं आवडू लागलं, गाण्याप्रती आवड निर्माण झाली ती अशाच काही प्रसंगातून…. किशोर कुमार, मोहम्मद रफीपासून ब्रायन ऍडम्स आणि बिली किंगपर्यंत जे ऐकायला मिळायचं तो ऐकायचा आणि त्यातूनच त्याला गायनाचे धडे मिळाले असं म्हणायला हरकत नाही. पण गाणं हा केकेसाठी कधीच करियर ऑप्शन नव्हता, एरव्ही ही मोठे होऊन आपल्याला काय करायचं आहे? हे फार कमी लोकांना माहिती असतं, अगदी तसंच केकेच्या बाबतीत घडलं.

- Advertisement -

बीकॉमची पदवी घेऊन हॉटेलमध्ये मार्केटिंगच काम करू लागला, पण नंतर लक्षात आलं की, हे काम आपल्यासाठी नाहीये, गाण्याची आवड होतीच म्हणून मग कामाच्या शोधात जिंगल्स गाऊ लागला. अनेकांना विश्वास बसणार नाही, पण आज १२ हून अधिक भाषांमध्ये केकेने साडेतीन हजारांवर जिंगल्स गायल्या आहेत. अजूनही टीव्हीवर लागणारी ती नेरोलॅकची जिंगल आठवतीये ना ? जब घर की रौनक बढ़ानी हो, दीवारों को जब सजाना हो, नेरोलैक नेरोलैक…पहिल्यांदा ही जिंगल केकेनेच गायली होती. पेप्सी , हिरोपासून ते अनेक लोकल ब्रॅण्ड्ससाठी त्याने जिंगल्स गायल्या होत्या, दिल्लीतच जिंगल्सच्या कामात त्याची ओळख विशाल भारद्वाजसोबत झाली आणि १९९४ च्या दरम्यान तो मुंबईत आला. गुलजार साहेबांच्या ‘माचीस’ सिनेमात एका गाण्यासाठी विशालने केकेला बोलावलं होतं आणि तिथंच त्याची इंडस्ट्रीतील दिग्गज लोकांसोबत भेट झाली. गुलजार, हरिहरन, सुरेश वाडकर आणि विशाल भारद्वाज यांसारख्या लोकांना भेटल्यानंतर, त्यांचं काम पहिल्यांनंतर त्याने या इंडस्ट्रीत काम करण्याचा निर्णय घेतला.

केकेचा सिनेमांमध्ये डेब्यू तसा पाहिला तर १९९५ सालीच झाला, असं म्हणायला हरकत नाही, कारण माचीसनंतर त्याला काही तामिळ सिनेमासाठी गाणी गाण्याची संधी मिळाली होती. दरम्यानच्या काळातच केकेने काही सिरियल्सचे टायटल साँगदेखील गायले, जादुई पेन्सिलवाली शकालाका बूमबूम मालिका आठवतीये का ? त्या मालिकेचं टायटल साँगदेखील केकेनेच गायलं होतं. १९९५ ते १९९९ पर्यंत केकेने अनेक सिनेमांसाठी गाणी गायली पण तितकीशी प्रसिद्धी त्याला मिळत नव्हती, त्यांनी गाणी गायलेले काही सिनेमे तर रिलीजदेखील झाले नव्हते. १९९९ साली संजय लीला भन्साळीच्या हम दिल दे चुके सनम सिनेमात केकेला गाण्याची संधी मिळाली आणि त्याने गायलेलं तड्प तड्प के इस दिल से गाणं अजरामर झालं. आजही अनेक प्रेमात हरलेल्या वीरांसाठी हे गाणं संजीवनी वाटतं, त्याच वर्षी त्याचा अलबम पल रिलीज झाला आणि तो प्रसिद्धीच्या एका शिखरावर पोहचला.

अल्बममधील यारो आणि पल ही दोन गाणी प्रचंड लोकप्रिय बनली, आजही त्याच यारों हे गाणं प्रत्येक फेयरवेल पार्टीची जान आहे. संजय लीला भन्साळी, इलिया राजा आणि अनु मलिक प्रीतमसह सर्वच संगीतकारांच्या पसंतीचा गायक म्हणून केके उदयाला आला, अनु मलिकने तर तब्बल २५ चित्रपटात त्याच्याकडून गाणी गाऊन घेतली, प्रीतमसोबत त्याची जोडीदेखील सुपरहिट ठरली. केकेच प्रत्येक गाणं खास होतं, ‘ओम शांती ओम’मधलं आँखो से तेरी असो किंवा बजरंगी भाईजानमधलं तू जो मिला, त्याच्या गाण्यात आणि आवाजात एक ग्रेस होता जो फार कमी गायकांमध्ये दिसतो. केकेची गाणी प्रत्येक नायकाला शोभायची खरी पण जी मजा इम्रान हाश्मीला केकेच्या आवाजात ऐकण्याला होती, ती इतर कोणात तितकी आली नाही. केके हा जल्लोषाचा आणि प्रेमाचा गायक होता, पण त्याहून अधिक तो एकटेपणाचा आवाज होता. मन उदास झालं, जीवनात रस उरला नाही असं जेव्हा जेव्हा वाटतं, त्याक्षणाचा आधार म्हणजे त्याचा आवाज… अगदी कधी वाद झाले, राग आला, कधी रात्री झोप लागत नाही म्हटलं तरी केकेचा हा आवाज औषधाचं काम करायचा. कुणास ठाऊक का? पण केके आपला वाटायचा आणि हेच त्याचं मोठेपण होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -