घर फिचर्स सारांश बॉलिवूडचा प्रोफेशनल गीतकार

बॉलिवूडचा प्रोफेशनल गीतकार

Subscribe

जयदीप साहनी हा प्रेमाची भाषा लिहितो, असं सुरुवातीला म्हंटल गेलं. कारण जेव्हा २००५ ला सलाम नमस्ते आला तेव्हा त्यातली दोन्ही गाणी तू जहाँ आणि माय दिल गोज ही चांगली चालली. पण मग आलं २००७ च वर्ष, जयदीप साहनीच्या करियर मधला सर्वोत्तम सिनेमा जो त्याने लिहिला आणि सर्वोत्तम गाणी जी त्याच्यामुळे इंडस्ट्रीला मिळाली. सिनेमाचं नाव होतं चक दे इंडिया आणि या सिनेमाचं टायटल ट्रॅक ऐकलं नसेल असा माणूस शोधूनही सापडणार नाही.

–अनिकेत म्हस्के

माणसाने लिहीत राहिलं की, त्याच्या लिखाणात सुधारणा होते, म्हणून एक उत्तम लेखक बनण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लिहीत राहणे. गुलजार यांना ज्यावेळी कुणीतरी चांगलं लेखक होण्यासाठी काय केलं पाहिजे, असा प्रश्न विचारला होता , तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. अनेकदा आपण ऐकत असतो की, कलाकार हा रोज त्याच्या कलेचा रियाज करत असतो आणि त्यातूनच तो एक उत्तम कलाकार बनतो, लिहिण्याच्या या कलेबद्दल देखील अगदी तसंच आहे. जो लिहीत जातो, लिहिताना सुधारणा करतो तोच एक उत्तम लेखक बनतो, आता हा लेखक गीत लिहितो, सिनेमाची कथा लिहितो किंवा एखाद्या वस्तूसाठी जाहिरातीची स्क्रिप्ट लिहितो, म्हणजे लिहिण्याचे प्रकार भले वेगळे असू देत, मूळ गाभा आहे तो म्हणजे लिहिणे. भारतीय सिनेमांच्या इतिहासात अनेक असे गीतकार होते ज्यांनी केवळ गीतलेखन इतकंच आपलं करियर मर्यादित ठेवलं, पण काही गीतकार असेदेखील होते ज्यांनी लिहिण्याच्या वेगळ्या माध्यमातदेखील आपले नशीब अजमावले.

- Advertisement -

जावेद अख्तरपासून ते स्वानंद किरकिरेपर्यंत गीतकारांची एक फळी अशीदेखील आहे, ज्यांनी वेगवेगळ्या लिहिण्याच्या माध्यमात काम केलंय. याच फळीतला एक असा गीतकार जो मूळचा कॉम्प्युटर इंजिनियर होता, ज्याने आयटी कंपनीत कन्सल्टन्ट म्हणून काम केलं नंतर ते सोडून एका जाहिरात एजन्सीमध्ये कॉपीरायटर म्हणून कामाला सुरुवात केली, तिथं करियरच्या सर्वोत्तम स्थितीला असताना, प्रमोशन हातात असताना नोकरी सोडली आणि लिहिण्याच्या माध्यमात आला. पलाश सेन, युफोरिया यांच्यासाठी गाणी लिहिली आणि मग स्क्रीनप्ले लिहिण्याचं तंत्र अवगत करून सिनेमे लिहायला सुरुवात केली. यशराज असो किंवा इतर दुसरे मोठे बॅनर सगळेच त्याच्या स्क्रिप्टचे दिवाने झाले, पण त्याने आपल्यात असलेला गीतकार जिवंत ठेवला. त्याच्या लेखणीतून भारतीय सिनेमाला मिळाली अशी काही गाणी जी सदाबहार बनली, केवळ एकाच तर्‍हेची किंवा एकाच इमोशनची गाणी न लिहिता आपल्या जाहिरातीच्या पार्श्वभूमीचा योग्य वापर करत, त्याने प्रेक्षकांना जे हवं ते लिहिलं आणि त्यातून त्याने प्रसिद्धी मिळवली. ओ रे पियापासून नशे से चढ गईपर्यंत गाणी लिहिणार्‍या या गीतकाराचे नाव आहे जयदीप साहनी.

पलाश सेनसोबत युफोरियात काम केल्यानंतर जयदीप साहनी सिनेमाच्या क्षेत्रात आला, तत्पूर्वी अजून एका अल्बमसाठी त्याने गाणी लिहिली होती. पलाश सेनच्या युफोरीयात त्याने मायरी आणि हम अशी गाणी लिहिली जी लोकांना आवडलीदेखील, पण जेव्हा त्याने सिनेमाच्या क्षेत्रात लेखक म्हणून सुरुवात केली तेव्हा पहिल्याच सिनेमात त्याने गाणी लिहिली नव्हती. तो सिनेमा होता राम गोपाल वर्मा दिग्दर्शित जंगल, ज्यात फरदिन खान, सुनील शेट्टी, सुशांत सिंह यांसारखे कलाकार होते. अनेकांना तो सिनेमा सुशांत सिंह आणि राजपाल यादवच्या रोलसाठी लक्षात असेल, पण हा जयदीप साहनीचा लेखक म्हणून पहिला सिनेमा होता. पण यानंतरच कंपनी नावाचा सिनेमा जयदीपने लिहिला, ज्यात त्याने गाणंदेखील लिहिलं. भारतीय सिनेमात गाणी जास्त का असतात? असं जेव्हा जयदीपला कुणी तरी विचारलं होतं,तेव्हा त्याने सांगितलं की गाणी ही सिनेमाची लांबी वाढवण्यासाठी नाही तर कथा शॉर्टमध्ये सांगून वेळेची बचत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी असतात.

- Advertisement -

कंपनीचा स्क्रीनप्ले लिहिताना ती सर्व पात्रं डोळ्यासमोर ठेऊन साहनीने दोन ओळी लिहिल्या, ज्या नंतर सिनेमात गाणं म्हणून आल्या. त्या ओळी होत्या गंदा है पर धंदा हैं, कंपनी सिनेमा लक्षात असो किंवा नसो या ओळी मात्र सगळ्यांना लक्षात आहेत. सिनेमातली गाणी कशाप्रकारे स्क्रिप्टला शॉर्ट करतात, याचंदेखील एक उदाहरण त्यानेच सांगितलं आहे. बंटी बबली सिनेमा त्याने लिहिला होता ज्याची गाणी गुलजार साहेबांना लिहायला लावली, फक्त नॅरेशन ऐकून गुलजार साहेबांनी सुरुवातीच्या गाण्याच्या काही ओळी लिहिल्या ज्याने जयदीपच्या स्क्रिप्टचे किमान ४ पानं वाचली, ते गाणं होतं धडक धडक धडक धडक धुआ उडाए रे या एका गाण्यातून दोन्ही पात्रांचा पूर्ण भूतकाळ आणि पार्श्वभूमी प्रेक्षकांना लक्षात येऊन जाते. ज्यामुळे एका लेखकाची बरीच मेहनत आणि प्रेक्षकांचा बराच वेळ वाचतो. जयदीप साहनीचे हेच मत इतर गाण्यांसंबधीदेखील आहे, जे सिनेमे तो लिहितो त्यात त्याचीच गाणी असतात असं नाही, पण तरी गीतकार हा सिनेमाच्या लेखकाने तयार केलेल्या एका पेंटिंगला फायनल टच देण्याचं काम करत असतो, हे त्याचं मत आहे.

जयदीप साहनी हा प्रेमाची भाषा लिहितो, असं सुरुवातीला म्हंटल गेलं. कारण जेव्हा २००५ ला सलाम नमस्ते आला तेव्हा त्यातली दोन्ही गाणी तू जहाँ आणि माय दिल गोज ही चांगली चालली. पण मग आलं २००७ च वर्ष, जयदीप साहनीच्या करियर मधला सर्वोत्तम सिनेमा जो त्याने लिहिला आणि सर्वोत्तम गाणी जी त्याच्यामुळे इंडस्ट्रीला मिळाली. सिनेमाचं नाव होतं चक दे इंडिया आणि या सिनेमाचं टायटल ट्रॅक ऐकलं नसेल असा माणूस शोधूनही सापडणार नाही, पण फक्त हे एकच गाणं चाललं असं नाही. बादल पे पांव है आणि मौला मेरे ले ले मेरी जान ही गाणी देखील जयदीप साहनी यानेच लिहिली होती, जी आजही चालतात.

दु:खाच्या क्षणात मौला मेरे लेले मेरी जान आणि जेव्हा कधी मुली काही विशेष करतात तेव्हा बादल पे पांव है, एकंदरीत या सिनेमातली तिन्ही गाणी वेगवेगळ्या परिस्थितीसाठी अँथम बनलेत, मला अजूनही २०११ चा क्रिकेट वर्ल्ड कप आठवतोय, जो जिंकल्यानंतर हॉकीवर आधारित सिनेमाचं चक दे इंडिया हेच गाणं सर्वत्र वाजत होतं, आजही जेव्हा एखादा खेळाडू कुठल्या खेळात भारताच नाव कमावतो, तेव्हा ही हे गाणं ऐकायला मिळतं. या सिनेमातली अजून एक गोष्ट फेमस आहे, ती म्हणजे शाहरुखचा तो सत्तर मिनट वाला डायलॉग, विशेष म्हणजे हा डायलॉगदेखील याच जयदिपने लिहिला आहे. २००७ या वर्षात फक्त चक दे इंडियाच नाही तर इतरही दोन वेगळ्या सिनेमात जयदीपने गाणी लिहिली होती, त्यातला पहिला सिनेमा म्हणजे जॉनी गद्दार ज्याच टायटल साँग गाजलं जे याने लिहिलं होतं. दुसरा सिनेमा होता, माधुरी दीक्षितचा कमबॅक असलेला आजा नच ले, या सिनेमाचं टायटल ट्रॅक अनेकांना लक्षात असेल..पण याच सिनेमात राहत फतेह अली खान यांनी एक सुंदर गीत गायलं होतं, जे अजूनही एकांतात ऐकलं जातं, ओ रे पिया हे त्या गाण्याचे बोल जे आजही सर्वांच्या ओठावर आहेत.

पुढच्याच वर्षी म्हणजे २००८ साली आलेल्या रब ने बना दी जोडी सिनेमातली गाणीसुद्धा लोकप्रिय झाली, यातलं होले होले हो जाएगा प्यार, तुझ में रब दिखता है आणि डान्स पे चान्स ही तीनही गाणी जयदीपने लिहिली आहेत ज्यांना ऐकणारा मोठा वर्ग आजही आढळतो. यानंतरच्या काळात २०११ साली दम मारो दम सिनेमातलं टायटल ट्रॅक आणि टी एमो ही गाणी, २०१३ सालच्या शुद्ध देसी रोमान्सची सगळी गाणी, बेफिक्रे सिनेमाची गाणीदेखील सुपरहिट झाली. २०१८ साली आलेल्या अंधाधून या सिनेमातदेखील जयदीपनेच गाणी लिहिली होती,ज्यातील नैना दा क्या कसूर हे गाणं चाललं, अगदी ८३ आणि जयेशभाई जोरदार यांसारख्या सिनेमासाठीसुद्धा जयदीप साहनीने गाणी लिहिली आहेत. तू जहाँ लिहिणारा जयदीप तितक्याच सहजतेने टी एमो, नशे से चढ गई लिहितो, एकीकडे ओ रे पिया, तुझ मे रब दीखता है तर दुसरीकडं जॉनी गद्दार, उडे दिल बेफिक्रे लिहितो. जाहिरातीतून सिनेमाच्या क्षेत्रात येऊन तिथंदेखील लोकांना काय हवं? ते ओळखून त्यानुसार प्रत्येक भावनेला आणि परिस्थितीला शब्द देणारा, हा गीतकार फक्त एक गीतकार न राहता प्रोफेशनल लिरीसिस्ट बनतो.

- Advertisment -