घरताज्या घडामोडीहोममेकरचा मनोरंजक प्रवास - बटरफ्लाय

होममेकरचा मनोरंजक प्रवास – बटरफ्लाय

Subscribe

सध्या मराठीत चर्चा आहे ती ‘बटरफ्लाय’ चित्रपटाची. या चित्रपटात अशी एक ठिणगी आहे जी आपल्या आयुष्याला लायटिंग करते. सर्वसामान्य कुटुंबातील होममेकरच्या स्वप्नांचा प्रवास ‘बटरफ्लाय’ या चित्रपटातून उलगडणार आहे. उत्तम स्टारकास्ट, कसदार लेखन आणि मीरा वेलणकर यांचं दिग्दर्शन असलेला ‘बटरफ्लाय’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रत्येक घरातल्या होममेकरला आपलीशी वाटणारी ही गोष्ट मोठ्या पडद्यावर पाहणं हा वेगळा अनुभव ठरणार आहे.

– आशिष निनगुरकर

घरातील गृहिणी सर्वकाही करीत असते. कधी आपल्या नवर्‍यासाठी, मुलांसाठी, सासू-सासर्‍यांसाठी, नातेवाईकांसाठी, प्रत्येकासाठी, पण ती स्वतःसाठी काय करते? याचं उत्तर तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. कारण ती स्वतःसाठी काहीच करीत नाही. ‘होममेकर’ ही अविरत भूमिका ती कायम निभावत असते. अशीच एक ‘होममेकर’ असलेल्या मेघा देशपांडेची (मधुरा वेलणकर) वास्तवदर्शी गोष्ट दिग्दर्शिका मीरा वेलणकर हिने ‘बटरफ्लाय’ या आपल्या पहिल्यावहिल्या दिग्दर्शकीय सिनेमातून आपल्यासमोर मांडली आहे. प्रत्येक व्यक्ती एका उद्देशाने जन्माला येते. विशेषत: ज्या स्त्रिया कुटुंबासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करतात, त्या स्वतःची ओळख पूर्णपणे गमावून बसतात. या सर्व गोष्टींमध्ये आयुष्यात अशी एक घटना घडते ज्याने आयुष्याला पूर्णपणे कलाटणी मिळते. बटरफ्लाय म्हणजे पाहिलेले स्वप्न आणि ते पूर्ण करण्याच्या उद्देशाने झटणार्‍या स्त्रीचा मनोरंजक प्रवास हे बटरफ्लाय या चित्रपटाचे कथासूत्र आहे. सकस लेखन, उत्तम अभिनय आणि तांत्रिकदृष्ठ्या परिपूर्ण असलेला हा चित्रपट लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला आहे.

मधुरा वेलणकर साटम यांच्या संकल्पनेला विभावरी देशपांडे यांनी कथेत बांधले आहे. विभावरी देशपांडे आणि मीरा वेलणकर यांनी पटकथा लेखन, तर कल्याणी पाठारे, आदित्य इंगळे यांनी संवाद लेखन केले आहे. वैभव जोशी, गुरू ठाकूर यांनी गीतलेखन, शुभाजित मुखर्जी यांनी संगीत दिग्दर्शन, वासुदेव राणे यांनी छायांकन केले आहे. वैशाली भैसने माडे आणि हंसिका अय्यर यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. या चित्रपटात मधुरा वेलणकर साटम, अभिजित साटम, महेश मांजरेकर, राधा धारणे, सोनिया परचुरे, प्रदीप वेलणकर अशी उत्तम स्टारकास्ट आहे. अजित भुरे, अभिजित साटम, मधुरा वेलणकर साटम या चित्रपटाचे निर्माते आहेत.

- Advertisement -

आपल्याकडे आजही बहुतांश कुटुंबांमध्ये गृहिणी म्हणजे गृहित धरण्याचं हक्काचं माणूस समजलं जातं. तिला काय हवंय, काय करायचंय, तिच्या इच्छा याबाबत तिनं स्वतःशी आधी बोललं पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे, असं सांगणारी ही मेघा देशपांडे या गृहिणीची गोष्ट आहे. दिग्दर्शक मीरा वेलणकरनं ‘बटरफ्लाय’ या चित्रपटातून ती अत्यंत साध्या पण रंजक पद्धतीनं मांडली आहे. मेघा ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातली गृहिणी. नवरा, मुलगी, सासरे आणि ती असं त्यांचं चौकोनी कुटुंब. सगळ्यांचं सगळं करता करता तीदेखील गाणं, पाककला अशा काही शिकवण्यांना जाते, पण काही ना काही कारणांमुळे ती ते अर्ध्यात सोडून देते. तिच्या या धरसोड वृत्तीमुळे घरातलं कुणी तिला गांभीर्यानं घेत नाही. या संपूर्ण प्रवासात कोणतीही रंजक वळणं वा धक्कातंत्र नसलं तरी हा चित्रपट प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. चित्रपटात अनेक प्रतिकात्मक गोष्टींचा वापर करून त्या स्त्रियांच्या आयुष्याशी कशा जोडल्या आहेत ते दाखवलं आहे. ओरिगामीमध्ये कागदाचं मूळ स्वरूप बदलत नाही आणि त्यातूनच एक नवीन आकार जन्माला येतो. फक्त काही घड्या आणि फुलपाखरू तयार! असं चित्रपटात म्हटलं आहे. हेही गृहिणीशी किंवा घरातल्या कोणत्याही स्त्रीशी जोडलं जाणारं आहे. एखादी स्त्री तिच्या रोजच्या कामांव्यतिरिक्त तिला हवं ते करीत असते, तरी ती तिचं मूळ रूप कधीच विसरत नाही. तिच्या मूळ रूपातूनच ती वेगवेगळे आकार घेत असते. कल्याणी पाठारे आणि आनंद इंगळे यांनी लिहिलेले असे संवाद बरंच काही सुचवून जातात.

‘स्वत:ला इतकं हलकं बनवा की बॅटमिंटन कोर्टवरच्या तुमच्या हालचाली एखाद्या फुलपाखरासारख्या वाटल्या पाहिजेत. स्वत:ला इतकं स्ट्राँग बनवा की समोरच्याला कळता कामा नये शॉट कुठून आलाय आणि किती पटकन आलाय.’ (उपरोक्त मूळ उद्गार हे बॉक्सिंग चॅम्पियन मुहम्मद अली याचे आहेत.) आता तुम्ही म्हणाल हा उपदेश केवळ खेळाच्या मैदानापुरताच मर्यादित आहे का? तर तसं मुळीच नाही. मेंदूला थोडा जोर देऊन विचार करा. तुमची आई, तुमची पत्नी (किंवा तुम्ही स्वतः कोणाची आई, पत्नी असाल तर) ही (ती) सुद्धा अशीच असते की! सूर्योदयाअगोदर ती उठते आणि रात्री उशिरा ती हातातलं सर्व काम आटपून घरातल्यांच्या नकळत झोपते. अधिक अधोरेखित करायचं झालं तर प्रत्येक घरातील ‘गृहिणी’ ही अशीच असते. तिच्याशिवाय घरात कोणाचं पान हलत नाही, पण मोबदल्यात तिच्या पदरी काय येतं? काही मोबदला मिळावा अशी तिची मुळीच अपेक्षा नसते, परंतु आपण सर्व ‘ती’ला गृहीत धरत असतो.

- Advertisement -

कल्याणी पाठारे आणि आदित्य इंगळे यांनी या सिनेमाचे संवाद सर्वसमावेश लिहिले आहेत. योग्य ठिकाणी विनोदबुद्धी, गांभीर्य आणि सुसंवाद घडवणारी तुमची आमची बोलीभाषा सिनेमाच्या संवादात आपल्या कानी पडते. उगाच शब्दाला शब्द जोडून सूर आणि यमक जुळवण्याचा अट्टाहास इकडे दिसत नाही. ‘बोअरिंग जगण्याला कोरं अस्तर लावलंय गं’, ‘मी मलाच मागं सोडलं गं,’ अशा काही ओळी जमून आल्यात. ‘धागे’ या गाण्यातल्या ‘असे कसे मन तरी वागते, तुझे माझे क्षण जुने मागते,’ ‘ही कसली शांतता दोघांना गाठते,’ या ओळी कमाल आहेत. गीतकार वैभव जोशी, गुरू ठाकूर आणि संगीतकार शुभाजित मुखर्जी यांची भट्टी जमून आली आहे. आजवर आपल्या संवेदनशील अभिनयामुळे सर्वांच्या परिचयाची असलेली अभिनेत्री विभावरी देशपांडे हिने सिनेमाची कथा-पटकथा लिहिताना बारकाईने संभाव्य परिस्थितीचा आणि प्रसंगांचा विचारपूर्वक अभ्यास केलेला जाणवतो. हलकी-फुलकी पण प्रभावी अशा पटकथेचे श्रेय हे दिग्दर्शिका मीरा वेलणकर हिचेदेखील आहे. मुळात दिग्दर्शिका मीरा वेलणकर हिने स्वतःच्या कक्षा रुंदावून या सिनेमाचे दिग्दर्शन केले.

सिनेमातील काही गिमिक्स सीन्सदेखील तिनं पटकथेत अचूक पेरले आहेत, ज्यांना मानवी स्वभावाच्या सवयीचा आधार आहे.‘बटरफ्लाय’ हा एक असा चित्रपट आहे जो प्रत्येक गृहिणीची कळकळ आणि परिचितता व्यक्त करतो. सुंदर संवाद लेखनासह पात्रांच्या अचूक कास्टिंगमुळे कथेत प्राण फुंकले गेले आहेत. चित्रपटात एक ताजेपणा आहे, जो प्रयत्नशील तांत्रिक बाजूंनी अधिक उठावदार बनवला आहे. कलाकारांचं अभिनय कौशल्य आणि छायांकनातील प्रयोगशीलतेमुळे सिनेमा अधिक अधोरेखित होतो. चित्रपट दिसायला ‘सोप्या’ परंतु तितक्याच ‘क्लिस्ट’ विषयांचा शोध घेतो आणि तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. ही सर्जनशील निर्मिती इतर समविषयीन सिनेमांप्रमाणे बटबटीत नाही. ती अत्यंत वास्तवदर्शी आणि ‘साधी-सरळ-सोप्पी’ आहे. मधुरा वेलणकर मेघा ही व्यक्तिरेखा जगली आहे. घरातली धावपळ, दगदगीतही हसरेपण टिकवणं, काहीही न बोलता स्वतःच्या मनाला मुरड घालणं, आनंद, समाधान अशा कैक गोष्टी तिनं कधी डोळ्यांतून, तर कधी देहबोलीतून दाखवल्या आहेत. अभिजित साटम (विराज), प्रदीप वेलणकर (बाबा), महेश मांजरेकर (कोच साहिल) या कसलेल्या कलाकारांनी त्यांच्या व्यक्तिरेखांना योग्य न्याय दिला आहे. प्रसिद्ध नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शक सोनिया परचुरेला अभिनेत्री म्हणून बघणं छान वाटतं. राधा धारणेचंही (अनन्या) काम कमी असलं तरी दखल घेण्यासारखं आहे. मीरा वेलणकर यांनी आतापर्यंत अनेक नामांकित जाहिरात संस्थांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या जाहिरातींनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारही पटकावले आहेत. वेगवेगळ्या माध्यमात चतुरस्र काम केल्यानंतर आता ‘बटरफ्लाय’ या चित्रपटाचं त्यांनी पहिल्यांदाच उत्तमरीत्या दिग्दर्शन केलं आहे.

आजवर गृहिणी, स्त्रिया केंद्रस्थानी असलेल्या अनेक कलाकृती होऊन गेल्या, पण अतिरंजित, बटबटीत न करता साधेपणानंही हा विषय सुंदररीत्या मांडता येऊ शकतो याचं ‘बटरफ्लाय’ हा चित्रपट हे उत्तम उदाहरण आहे. मोजके कलाकार, ठरावीक लोकेशन अशा मर्यादित साधनांत तयार झालेली ही कलाकृती मनाला भिडणारी आहे. ‘उडवायला धूळ सारी कळत-नकळत साचलेली, एक फुंकर पुरे असते आपली आपण घातलेली,’ या चित्रपटातल्या एका गीतातील वाक्याप्रमाणे प्रत्येकानं विशेषत: स्त्रीनं तिच्या मनात स्वतःबद्दल असलेला न्यूनगंड दूर करून तिच्या आतला आवाज ऐकण्यासाठी आणि आयुष्य फुलपाखरासारखं आणखी रंगीबेरंगी करण्यासाठी ‘बटरफ्लाय’ एकदा तरी बघायला हवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -