घरफिचर्ससारांशदिवाळी सण गाण्याचा नव्हे खाण्याचा!

दिवाळी सण गाण्याचा नव्हे खाण्याचा!

Subscribe

दिवाळीचे निमित्त साधून कितीही दिवाळी पहाटेच्या नावाने गाण्याचे जलसे होत असले तरी हा केवळ खाण्याचा सण आहे या मतावर मी गेल्या पन्नासहून अधिक वर्षे ठाम आहे. आवराआवरी, साफसफाई, रंगरंगोटी यासाठी नवरात्रीपूर्वीचे पंधरा आणि दसर्‍यानंतरचे साधारण तेवढेच दिवस यासाठी राखून ठेवले आहेत. ही कामं कंटाळवाणी, टाळाटाळीची, अंगमेहनतीची, हाताबाहेर जाणारी, विकतची दुखणी काढणारी आणि त्यामुळे गृहकलह निर्माण करणारी असल्यानं ती वेळीच आटोपती घेऊन फराळाचं काय काय करायचं हा विषय पटलावर म्हणजे भोजन मांडणीवर आला की मागील तीन वर्षांत काय काय घडलं आणि बिघडलं, कुणी चुकीचा सल्ला दिला, कुणाचा डावलला गेला, तरी मी म्हणत होते, होतो या ब्रम्हवाक्याचा आधार घेऊन शेवटी पावसानं दगा दिला म्हणत सामना अनिर्णीत राहतो किंवा पुरेशा पुराव्याअभावी मुख्य आरोपी निर्दोष सुटण्यात सत्याचा विजय होतो.

-योगेश पटवर्धन

यावर्षी दिवाळी घरीच साजरी करायची असे मी नेहमीप्रमाणे ठरवले आहे. लक्ष्मीपूजन थोडक्यात उरकून साऊथला जाणारी हॉलिडे स्पेशल दुरांतो धरून मस्त फिरून येणार, असं सांगणार्‍या चाकरमान्यांचा मला हेवा वाटतो. अरे माईंड फ्रेश होतं जरा, तेवढाच चेंज. चार दिवस घेणेकरी मागे लागल्यासारखे फिर फिर फिरण्यासाठी तीन दिवस रेल्वेत कोंडून घेण्याने काय चेंज होतो हे मला कळत नाही.

- Advertisement -

इडली सांबार, डोसा, उतप्पा, वडा सांबार हे सगळे माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर बरे मिळते. ते तयार करून विकण्यासाठी अण्णा आणि त्याचे चार इडलीच्या विरुद्ध रंगाचे दांडगे दोन चार वर्षांपूर्वी शिर्डीला म्हणून आले, ते परत गेलेच नाहीत. सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत तोंडाची आणि कळकट कुकरची वाफ न दवडता लांबट जड तव्यावर डोसे, उतप्पे उलथत असतात. खाण्यापूर्वी ते पाहणे हा माझा छंद आहे. त्यासाठी इतक्या दूर जाणे जीवावर येते.

दिवाळीत कुणाला बोलवावे असा विचार आता स्वप्नातसुद्धा कुणाला येत नाही. हॅपी दिवालीचे मोबाईल सोपस्कार पार पडले की यावर्षी कुठे, असा प्रश्न विचारणे किंवा सांगणे हाही एक शिष्टाचार आहे. सिंगापूर दोनदा झालंय असं बोललं की ऐकणार्‍याने अरे वा… मग दुबईला जा की, असे सांगणे हा त्याचा उत्तरार्ध.

- Advertisement -

तरीही मला त्यांचा फोन आला. आम्ही तुमच्याकडे दिवाळीला यायचं म्हणतोय. नाशिकची दिवाळी जरा वेगळी असते म्हणतात… मी कसंनुसं अलभ्य लाभ, स्वागत आहे म्हणत त्यांचा मुक्काम दिवाळीपूर्वी आणि नंतर किती दिवस याचा अंदाज घेऊ लागलो. रिझर्वेशन करून टाका. मी खडा टाकला. परतीचं मी बघतो. त्याची काळजी नको, वेईकल आहे ना आमचं. म्हणजे चार जण नक्कीच. माझा अंदाज. अरे वा, छान, मी लोकेशन पाठवतो. त्याची गरज नाही, पत्ता आहे आमच्याकडे. असे लिखित संवाद इकडून तिकडे झाले.

ते माझे मित्र किंवा नातेवाईक नाहीत. ते सगळ्यांनाच ओळखतात तसेच मलाही इतकंच. त्यांचे नाव जी. एस. देव. उपाख्य गजानन शंकरराव देव. साक्षात देव. त्यांना दरवर्षीचा गणेश उत्सव पाहून वीट आला होता, लेझर लाईटमुळे आधीच बारीक असलेले नेत्र शिणले होते. त्यासाठी चेंज म्हणून दिवाळी अनुभवावी हा हेतू. अभ्यंग स्नान करून ते प्रवासाला निघणार होते. हे बघ, आमच्या येण्याची आजूबाजूला वाच्यता करू नकोस. आम्ही अगदी साध्या वेशात येऊ. तुम्ही गोव्यात फिरता ना, तसे हॉलिडे मूडमध्ये.

आरत्या, मोदक, पंच खाद्य, गूळ, खोबरे, दूर्वा, आघाडा, जास्वंदी, कमळाची फुले, जानवी जोड, शेंदूर लाल चढावो, पुढच्या वर्षी लवकर या हे नेहमीचं त्यांना नकोय हे त्यांनी अगदी हळू आवाजात पण स्पष्ट सांगितलं. मला हायसे वाटले. नेहमीच्या वेशात त्यांना घेऊन फिरणार कसं हा प्रश्न त्यांनीच मार्गी लावला होता. घरी हॉस्टेलवर राहणारा कॉलेजचा मित्र नाशिक बघायला येतोय दोन दिवस. आता फॉरेनला असतो. इथे आलाय दोन महिन्यांसाठी. तो खूश झाला तर आपला सगळा तिकडचा खर्च करेल. याचा योग्य तो परिणाम झाला. मी सण, वार आणि तारीख यांचा मेळ घालत भेटीचा आणि भटकण्याचा कार्यक्रम आखला.

पाडवा पहाट हा दिवाळीच्या मिरवण्याचा अविभाज्य भाग आहे. पहाटे शुचिर्भूत झाल्यासारखे दाखवत डिझायनर कुर्ता, नऊवारी लुगड्यासारखी धोती, शाल अथवा जाकीट, उपरणे, घडीची टोपी, कोल्हापुरी किंवा जयपुरी मोजडी, सोनीचा मूव्ही कॅमेरा आणि आपल्याला प्रत्येक जण पाहत आहेत असे गृहीत धरून सराफी पेढीच्या मालकासारखे श्रीमंती हास्य मिरवता यायला हवे. जे तिथे जात नाहीत, ते अरसिक किंवा असंस्कृत. गाणं बाजूला सारून आयोजक, कोण अभिजन आले त्यांचे सत्कार, फेटे बांधणे, मिठ्या मारणे, फोटो, टाळ्या वाजवून स्वागत झाले की ते एखादे गाणे ऐकून दुसर्‍या मांडवात हजेरी लावतात. कार्यक्रमाची सुरुवात ज्यांच्या स्तवनाने होते, त्यांनी ते अनुभवावे हा माझा प्रयत्न होता.

तिथे मिरवून झाले की नाशिक मिसळ हे काय प्रकरण आहे हे त्यांना दाखवावे म्हणून शहरापासून दूर असलेला काकांचा किंवा मामांचा मळा गाठावा की गावातील इतर मिसळ कट्टे शोधावेत हे ठरायचे आहे. वेळात वेळ काढून एखादे श्रीमंत देवस्थान दाखवणे अगत्याचे आहे. पाव किलो पेढे, गुलाबांचा हार, चंदन उदबत्तीचा पुडा आणि गोविंदा गोविंदा… असा घोष केला की ते श्रीमंत खूश होऊन आपले वार्षिक उत्पन्न वाढते असे म्हणतात.

एक रात्री भोज, पावभाजी, एक दिवस व्हेज मंचुरियन, एक दिवस वडा सांबार, फॅमिली डोसा. स्वीट डिश म्हणून काजू कतली, मिक्स मिठाई, मिनी बाकरवडी, डाएट चिवडा, कॉटन किंग, वॉकेरू, जॉकी, पार्क अ‍ॅव्हेन्यू, फुलबाज्या ओवळण्याचे सेल्फी, शेकडो फोटो, लाईक्स, क्या बात है, पैठणी, नऊवारी… हास्यजत्रा, हवा येऊ द्या, कपिल शर्मा हे सगळं साधलं की भूतलावरील देवांची दिवाळी संपते.

हे बघण्याची इच्छा त्यांना झालीय. आहे तसे त्यांना दाखवावे. खर्‍या देवांची दिवाळी आपले आकाश कंदील घडी घालून माळ्यावर गेले की साजरी होते. त्यांना शुभेच्छा देणारे मेसेज गॅलरीतून शोधून काढायचे आहेत.

नको नको म्हणताना….

दिवाळी हा केवळ खाण्याचा सण आहे या मतावर मी गेल्या पन्नासहून अधिक वर्षे ठाम आहे. आवराआवरी,साफसफाई, रंगरंगोटी यासाठी नवरात्रीपूर्वीचे पंधरा आणि दसर्‍यानंतरचे साधारण तेवढेच दिवस यासाठी राखून ठेवले आहेत. ही कामं कंटाळवाणी, टाळाटाळीची, अंग मेहनतीची, हाताबाहेर जाण्याची, विकतची दुखणी काढणारी आणि त्यामुळे गृहकलह निर्माण करणारी असल्यानं ते वेळीच आटोपते घेऊन फराळाचं काय काय करायचं हा विषय पटलावर म्हणजे भोजन मांडणीवर आला की मागील तीन वर्षात काय काय घडलं आणि बिघडलं, कुणी चुकीचा सल्ला दिला, कुणाचा डावलला गेला, (तो तिकडून होता की इकडून यावर बरेच काही अवलंबून असते म्हणे) तरी मी म्हणत होते, होतो या ब्रम्हवाक्याचा आधार घेऊन शेवटी पावसानं दगा दिला म्हणत सामना अनिर्णीत राहतो किंवा पुरेशा पुराव्याअभावी मुख्य आरोपी निर्दोष सुटण्यात सत्याचा विजय होतो.

चकली आणि अनारसे सोडून चिवडा, लाडू, शंकरपाळी, करंजी, शेव, बुंदी या सगळ्यांचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक प्रकार सांगणार्‍या पाककृती नुसत्या नजरेखालून घालायच्या ठरवले तरी डोक्याचा चार केरळी नारळ खोवल्याइतका कीस पडू शकतो. त्या संदिग्ध भाषेतून अन्वयार्थ काढणे म्हणजे ऐन युद्धभूमीवर, धावता रथ साईडला घेऊन गीतेचा अर्थ समजावून घ्यायला निघालेल्या अर्जुनासारखी गृहिणीची अवस्था होते.

मंद आचेवर, कोमट पाण्यात भिजवा, चवीनुसार मीठ, चिमूटभर सोडा, आवडत असल्यास हेही घाला, दही आंबट असल्यास इतके, नसल्यास तितके, लिंबू असल्यास इतके, नसल्यास लेमन पावडर, दूध, ते नसल्यास मिल्क पावडर, आमक्याचा स्वाद आवडत नसल्यास तमके, कापूर नसल्यास उदबत्ती, आघाडा नसल्यास अक्षदा असे काही. त्या पदार्थांचे कृष्णधवल फोटो असल्यास ते उपग्रहाने काढलेल्या कृष्ण विवराचे वाटू शकतात.

अनारसे हा पदार्थ अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. त्याचे प्रयोजन दिवाळीच्या आनंदाचे संतुलन करावे यासाठी असावे, म्हणून तो असायलाच हवा अशी अट घातली गेली आहे अशी माझी धारणा आहे. लक्ष्मीपूजनाला केलेले पाच अनारसे दत्त जयंतीपर्यंत दिवाळीचं अस्तित्व टिकवून असतात. त्याची चव, आकार, रंग, घनता याची नेमकी व्याख्या आजवर स्पष्ट नाही. कुठल्या देवदेवतांचे त्यावाचून पान हलत नाही हे मला ठाऊक नाही.

अनारसे अधिकात जावयाला देण्यात जी कल्पकता आहे त्याला तोड नाही. त्याबरोबर नाव टाकून आणि फोटो काढून दिलेली चांदीची वाटी तो पुढील चार वर्षे विसरू नये यासाठी त्या अनश्याची योजना आखली असणार. दिवाळीतील अनारसे त्या वाटीची आठवण जागवतात. दिवाळीत गावी आल्यानं सहज म्हणून भेटायला आलेला मित्र अथवा आप्त मला इतर काहीही नको, फक्त एक अनारसा द्या, असे उत्स्फूर्तपणे म्हणल्याचे मी स्वतः ऐकले नाही आणि कुणी मला ऐकवलेही नाही.

अनारसे शिल्लक नाहीत असा फलक मला आजवर कुठल्याही दुकानात दिसलेला नाही. तरीही अनारसे करता येणे म्हणजे पाकशास्त्रातील विशारद असण्यासारखे आहे, असा समज कमलाबाई ओगले किंवा मंगलाताई बर्वे यांचाही नव्हता. त्या आनंदीबाई नेमक्या कोण हे एकदा कळायला हवे. अनारसे करण्याची स्पर्धा नवीन नाही. ते खाण्याची स्पर्धा ठेवली तर नको नको म्हणण्याची वेळ येईल.

अन्नपूर्णा देवीची क्षमा मागून… माझ्या खास वाचकांसाठी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -