घरफिचर्ससारांशभावविश्व समृद्ध करणार्‍या कथा!

भावविश्व समृद्ध करणार्‍या कथा!

Subscribe

‘प्राजक्तची शाळा’ हा मुंबई येथील चतुरस्त्र लेखिका कस्तुरी देवरूखकर यांचा पहिलाच कथासंग्रह असूनही त्यांनी या संग्रहातील कथांमध्ये निरनिराळे विषय सुरेखपणे व उत्तमपणे मांडून त्याद्वारे काही ना काही संदेश दिलेले आहेत.१५० पानी या पुस्तकात १९ कथा आहेत. साहित्य क्षेत्रात गेली अनेक वर्षे कस्तुरी देवरुखकर यांचा लेखन प्रवास चालू आहे. त्यांचे दोन काव्यसंग्रह आणि एक ललित लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत.

–अजित महाडकर

लेखिका आपल्या मनोगतात लिहितात, या संग्रहातील सर्वच कथा लिहिताना त्यातील प्रत्येक पात्र त्या जगल्या आहेत. म्हणूनच कथेतील पात्रे, प्रसंग त्या अधिक प्रभावीपणे वाचकांसमोर आणू शकल्या आहेत. या कथासंग्रहाला मौलिक प्रस्तावना लिहिली आहे पुणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिका व गायिका सरिता कमळापूरकर यांनी. त्या आपल्या प्रस्तावनेत लिहितात, अतिशय साध्या शब्दांतून, साध्या प्रसंगातून तुमच्या आमच्या मनातले प्रश्न, समाजातल्या समस्या मांडण्याचा असा कुठलाही अभिनिवेश न दाखवता अतिशय हळुवारपणे आणि सकारात्मकतेने हे प्रश्न, या समस्या मांडणारी, अशी कस्तुरीची शैली आहे. समस्या कितीही मोठी असो ती सुटू शकते, त्यावर काहीतरी तोडगा निघू शकतो हा आशावाद या संग्रहातल्या अनेक कथांतून समोर येतो.

- Advertisement -

कथेच्या मांडणीच्या गरजेनुसार ग्रामीण बोलीतले सहज संवाद, प्रसंगातील भावना व्यक्त करण्यासाठी संवादांना, प्रसंगांना सुसंगत अशा अत्यंत सुंदर, हळव्या अशा कवितांच्या ओळींची पेरणी यामुळे कथेतील भावना मनाला स्पर्श करून जातात. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख लेखापरीक्षक सुरेश बनसोडे यांनी सुरेख शब्दांत शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. ते आपल्या शुभेच्छा संदेशात लिहितात, आपल्या आजूबाजूला घडणार्‍या घटनांची नोंद ठेवत, स्त्री पुरुष मानसिकता, समाजमन, परिस्थितीनुसार बदलणारी माणसं अशा सगळ्यांचा ऊहापोह या कथासंग्रहातील वेगवेगळ्या कथांमधून केलेला आपल्या वाचनात येतो. त्यातही प्रामुख्याने स्त्री मन, मग ती ग्रामीण भागातली स्त्री असो की शहरी भागातली, स्त्री मनाचे असंख्य पैलू लेखिका कस्तुरी देवरुखकर आपल्या कथांमधून सक्षमपणे मांडताना दिसतात. काही सामाजिक प्रश्नही त्यांनी या कथांद्वारे वाचकांसमोर आणले आहेत. उदा. एकावन्न रुपये या कथेद्वारे किन्नरांविषयी आदर बाळगावा असे त्या सांगतात.

अतिशय गरीब असताना एका शिक्षिकेच्या मदतीमुळे व आधारामुळे शिक्षण पूर्ण करून उच्च पदावर पोहोचलेल्या व त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून त्याच गावात नवीन शाळा बांधणार्‍या तरुणाची कथा तसेच गावातील जोगतिणीसारख्या अनिष्ठ चालीविरूद्ध लढा देण्याचा प्रयत्न करून त्यातून आपल्या विद्यार्थिनीला सोडवण्यासाठी घेतलेला एक मोठा निर्णय..अशा पध्दतीने एका शिक्षिकेचा जीवनपट अन् मानवी मनाचे अनेक रंग, अनेक पैलू उलगडून दाखवतानाच त्यांच्या चांगुलपणावरही शिक्कामोर्तब करणारी या संग्रहातील मुख्य कथा आहे प्राजक्तची शाळा.

- Advertisement -

उपरती या कथेतील लाचखोर अधिकार्‍याला झालेली कर्तव्याची जाणीव आपल्याला बरेच काही सांगून जाते. स्वातंत्र्य जगण्याचे या दीर्घ कथेत नेत्रदानाचे महत्व अतिशय सुंदर शब्दांत विशद केले आहे. आपल्या मुलींना शिकू द्या, त्यांना त्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू द्या, असे लेखिका एक शोध अस्तित्वाचा व पुढचं पाऊल या कथांद्वारे लोकांना समजवतात. दिवाळी तुझी माझी या कथेत नवविवाहित जोडपे वृद्धाश्रमातील वृद्धांना नवे कपडे व मिठाई वाटून आपली पहिली दिवाळी साजरी करते. वृद्धाश्रमात एकाकी जीवन जगणार्‍या वृद्धांसोबत काही काळ हसत खेळत घालवून त्यांना आनंद द्यावा असे लेखिका या कथेद्वारे सुचवतात.

वरकरणी विनोद अन् रहस्य यांचे मिश्रण वाटणारी फजिती नामक कथा उत्तरार्धात कलाटणी घेऊन समाजातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आणत इथल्या भीषण वास्तवावर भाष्य करते अन् वाचकांचे लक्ष वेधून घेते. त्याशिवाय यात प्रेमकथा आहेत, भयकथा आहेत, गूढकथाही आहेत. असे निरनिराळे प्रकार लेखिकेने रंजकपणे आपल्यासमोर आणले आहेत. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील निसर्ग, जीवनपद्धती, परंपरा, मानसिकता यांचा उत्तम संदर्भ जोडत लेखिकेने आपल्या प्रगल्भ लेखणीतून प्रत्येक कथेचे भावविश्व समृद्ध केले आहे.

सहज, सुंदर प्रवाही शब्दरचना, कथेच्या पार्श्वभूमीला साजेशी उत्कृष्ट वातावरण निर्मिती आणि वेगवेगळ्या आशयाच्या अशा एकोणीस कथा आपल्या मनाचा ठाव घेतात, त्यामुळे वाचक या पुस्तकाचे नक्कीच स्वागत करतील याची खात्री वाटते. या कथासंग्रहाचे सुंदर व बोलके मुखपृष्ठ चितारले आहे सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी. शॉपिजन या प्रकाशन संस्थेने हा कथासंग्रह प्रकाशित केला आहे. पुस्तकाचा कागद व छपाई उत्कृष्ट आहे. रसिक वाचकांनी संग्रही ठेवावी अशीच ही साहित्यकृती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -