घरफिचर्ससारांशशाहीर हा महाराष्ट्राचा प्राण!

शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण!

Subscribe

संत परंपरेतील कीर्तनाप्रमाणेच शाहिरांचा पोवाडाही एकपात्री प्रयोगासारखीच सादरीकरणाची कला आहे. महाराष्ट्रातील अनेक महात्म्यांचा इतिहास, त्यांची कथा पोवाड्याच्या माध्यमातून लोकांना ज्ञात झाली. या साहित्याने भूपाळी ते लावणीपर्यंतचा काव्याशय पोटात घेऊन महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडवले. शाहिरांच्या कवनातील या समृद्धतेमुळेच या साहित्याला मराठी काव्याची प्रभात म्हणण्याचा मोहही काही समीक्षकांना झाला. होनाजी बाळा, परशराम, प्रभाकर, अनंत फंदी, पठ्ठे बापूराव, राम जोशी, सगनभाऊ यासारख्या शाहिरांनी शाहिरी काव्याचा पाया भक्कम केला. याच परंपरेला पुढे नेणारे अनेक शाहीर आधुनिक काळातही उदयास आले. त्यांच्या शाहिरीने महाराष्ट्रातील प्रबोधनाचा पैस विस्तारित होत गेला.

–डॉ. अशोक लिंबेकर

प्राचीन मराठी साहित्यात संत, पंत आणि तंत साहित्य हे तीन प्रवाह जवळजवळ सातशे वर्ष प्रवाहित होत आलेले. त्यामध्ये लौकिक जीवनाचा पहिला उद्गार उमटला तो शाहिरी साहित्यातून. मध्यकालापासून ते आधुनिकतेपर्यंत या साहित्याने महाराष्ट्राचे सांस्कृतिक पोषण आणि रंजन केलेले. केवळ रंजनच नाही; तर सामाजिक प्रबोधनाची, लोकशिक्षणाची मोठी परंपरा मराठी शाहिरांनी पुढे नेलेली. जनमानसांची पसंती आणि लोकप्रियता शाहिरांना लाभल्यानेच त्यांची ओळख लोकशाहीर अशी बनली. लोक हा शब्द इथे खूप महत्वाचा. यात समष्टीचे भान आहे. हे भान राखल्यानेच शाहिरी परंपरा समूहमनात रुजलेली दिसते. मराठी संस्कृतीचे आणि महाराष्ट्राचे ते एक महत्त्वाचे अंग आहे. किंबहुना महाराष्ट्राची ती वैशिष्ठ्यपूर्ण अशी ओळख आहे.

- Advertisement -

मराठी माणसांना लौकिक रंजनाची पहिली शिदोरी दिली ती शाहिरांनीच. संत आणि पंतपरंपरेमध्ये पारमार्थिक जीवनाचा विचार झालेला, परंतु शाहिरांनी मात्र संतपरंपरेतील बीज घेऊनच त्याला लौकिक अधिष्ठान दिले. त्यामुळे संत साहित्यालाच फुटलेला धुमारा म्हणजे शाहिरी साहित्य. महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि सामाजिक, राजकीय इतिहास पाहता जवळजवळ ७०० वर्षं महाराष्ट्र हा राजकीय आक्रमणांनी, सामाजिक, धार्मिक अराजकाने धुमसत होता. त्यामुळे महाराष्ट्राचे लोकजीवन हे संघर्षमय आणि अस्थिर होते. यातच अस्मानी संकटाचाही सामना महाराष्ट्रातील जनतेस करावा लागत होता. या काळातील हे अस्थिरतेचे, संघर्षाचे चित्र तत्कालीन साहित्यातून प्रतिबिंबित झाले. यात प्रामुख्याने संत एकनाथांचा उल्लेख जाणीवपूर्वक करावा लागतो.

एकनाथांच्या साहित्यातून संत, साहित्याचा, भक्तीचा तर आविष्कार झालाच परंतु पंडिती आणि शाहिरी साहित्याचे बिजारोपणही त्यांनी केले. भारुडासारखा बहुरूड असा रचना प्रकार स्वीकारून त्यांनी लोकमनाची मशागत केली. संत एकनाथांना लोकनाथ असे संबोधले गेले ते यामुळेच.. जनमानसाची नस ओळखून, त्यांचे प्रबोधन कसे करावे? रंजनातून त्यांना शिकवण कशी द्यावी याची सहज शिकवण लोकशिक्षकाच्या भूमिकेतून त्यांनी आपल्या समोर ठेवली. याच परंपरेला पुढे प्रशस्त करण्याचे काम शाहिरी वाङ्मयाने सशक्तपणे केलेले दिसते. शाहिरी परंपरेची बीजे ही संत साहित्यात अशी दडलेली आहेत. याचे सार्थ वर्णन कुसुमाग्रजांनी रस रंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर, येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर असे केले आहे. अशा प्रकारे मराठी मातीचा अभिमान आणि मराठी बाणेदारपणाची शान प्रकट झाली ती शाहिरांच्या कवणातून..!

- Advertisement -

उर्दू भाषेतील ‘शायर’ या शब्दावरून शाहीर हा शब्द रूढ झाला. उर्दूत कवी म्हणजे शायर असा या शब्दाचा अर्थविस्तार मराठी भाषेत मात्र याचा अर्थसंकोच बनून आलेला. मराठीत तमाम कवी शाहीर म्हणून ओळखले जात नाहीत. त्यामुळे शाहिरी साहित्याची स्वरूप विशिष्टता आणि शाहिरांचीही व्यक्ती विशिष्टता सहज ध्यानात येते. शाहिरी काव्याला सादरीकरणाचेही परिमाण लाभल्याने त्याचा अंतर्भाव परफॉर्मिंग आर्ट्समध्ये करावा लागतो. महाराष्ट्राची लोककला म्हणूनही शाहिरी साहित्याचे आणि शाहिरांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पोवाडा, लावणी, भारुड, फटका, गोंधळ इत्यादी लोककलेचा समावेश या प्रकारात होतो. विशेषतः शिवकाळानंतर शाहिरी साहित्याच्या निर्मितीला प्रारंभ झाला तर पेशवाईच्या काळात ही कला शिखरस्थानी पोहोचलेली दिसते. शाहीर अगिंनदास यांचा अफजलखानाचा वध हा मराठीतील पहिला पोवाडा मानला जातो. कीर्ती काव्य आणि कथा काव्य असे पोवाड्याचे स्वरूप आहे.

अलौकिक व्यक्तिमत्त्वांच्या शौर्याची अतुलनीय गाथा, त्यांच्या पराक्रमाची, वीरतेची प्रेरणादायी कहाणी पोवाड्याच्या माध्यमातून गायली जाते. संत परंपरेतील कीर्तनाप्रमाणेच शाहिरांचा पोवाडाही एकपात्री प्रयोगासारखीच सादरीकरणाची कला आहे. गायन, वादन, अभिनय, संवाद या घटकांचा समावेश या सादरीकरणात होतो. महाराष्ट्रातील अनेक महात्म्यांचा इतिहास, त्यांची कथा पोवाड्याच्या माध्यमातून लोकांना ज्ञात झाली. या साहित्याने भूपाळी ते लावणीपर्यंतचा काव्याशय पोटात घेऊन महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडवले. शाहिरांच्या कवनातील या समृद्धतेमुळेच या साहित्याला मराठी काव्याची प्रभात म्हणण्याचा मोहही काही समीक्षकांना झाला. होनाजी बाळा, परशराम, प्रभाकर, अनंत फंदी, पठ्ठे बापूराव, राम जोशी, सगनभाऊ यासारख्या शाहिरांनी शाहिरी काव्याचा पाया भक्कम केला. याच परंपरेला पुढे नेणारे अनेक शाहीर आधुनिक काळातही उदयास आले. त्यांच्या शाहिरीने महाराष्ट्रातील प्रबोधनाचा पैस विस्तारित होत गेला.

रंजन, प्रबोधन आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी जशा शाहिरी काव्यात आढळतात त्याप्रमाणेच रसिक मनाला भुरळ घालणार्‍या सौंदर्याची नजाकतही शाहिरी कवनातून व्यक्त झालेली. मराठी माणसांना शृंगारसौंदर्याचा पहिला आस्वाद शाहिरांनीच घडवलेला. ‘सुंदरा मनामधी भरली’ या राम जोशींच्या सुंदरापासून ते आजच्या आधुनिक काळातील तरुण मनाला भुरळ घालणार्‍या चंद्रापर्यंतची काव्यधारा यातून प्रवाहित होतं आली.

शाहिरांच्या लावणीने महाराष्ट्राला वेड लावले. मराठी माणूस जसा भजन कीर्तनात दंग होतो, तसाच लावणीच्या नादानेही तो वेडावतो. मराठी माणसाचे हे एक महत्त्वाचे वैशिष्ठ्यच. त्यामुळेच लावणी ही महाराष्ट्राची ओळख बनली. ढोलकीचा ताल आणि घुंगराचा नाद ऐकू येऊ लागला की कोणत्याही मराठी माणसाचे मन लुभावल्याशिवाय राहत नाही. शृंगार रसाने ओतप्रोत भरलेली लावणी बैठकीतून दरबारात आणि हवेलीतून सभागृहापर्यंत पोहचली. ज्या तथाकथित संस्कृती रक्षकांनी लावणीला नाके मुरडली, त्यांनीच तिला पुढे आपली सखीही बनवले. शाहिरांच्या लावणीचा झालेला हा काव्यप्रवास असा थक्क करणारा आहे. त्यामुळेच गदिमांसारख्या आधुनिक वाल्मिकीलाही लावणी लिहून ती चित्रपटांद्वारे पेश करावी वाटली यात नवल नाही. पण दुर्दैव हेच की जी लावणी पडद्यावर भाव खाऊन जाते तीच लावणी पडद्यामागील तंबूत मात्र आसवे ढाळते.

वारकरी संतांमध्ये जसे सर्व जाती धर्माचे संत निर्माण झाले तसेच मराठी शाहिरांमध्येही सर्व जाती धर्मांच्या शाहिरांचा समावेश होतो. महाराष्ट्राच्या या लोककलेला मिळालेली ही रसिक आणि समाजमान्यता म्हणूनच महत्त्वाची आहे. मराठी शाहिरांनी केवळ शृंगाराचेच बोट पकडून वाटचाल केली, असे नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक विकासामध्येही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. जीवनमूल्यांची कास धरून समाजमनाला प्रबोधित करण्याचे कार्य शाहिरांनी केले. यामध्ये शाहीर अनंत फंदी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. फंदींच्या फटक्याने समाजपुरुषाच्या डोळ्यात व्यवहारिक अंजन घातले. दैनंदिन जीवनातील उदाहरणातून नैतिक आणि व्यावहारिक उपदेश त्यांनी केला. ‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको’, असा सार्वकालिक संवादी, व्यावहारिक सल्ला त्यांनी मित्रत्वाच्या नात्याने दिला.

यात कोणताही अभिनिवेश नव्हता. या सहज, सुंदर शैलीनेच मराठी शाहीर लोकप्रिय झाले. होनाजी बाळाच्या ‘घनश्याम सुंदरा’ या भूपाळीने मराठी संस्कृतीचे विलोभनीय चित्र आपल्या पुढ्यात ठेवले. काळ बदलला तरी या भूपाळीची अवीट गोडी अजूनही आस्वादकच आहे. भारतीय संस्कृतीची थोडक्यात ओळख करून द्यायची असेल तर ही भूपाळी त्याचे मूर्तिमंत उदाहरणच आहे. या ओजस्वी आणि तेजस्वी परंपरेचा वारसा पुढे चालवला तो आधुनिक शाहिरांनी. महाराष्ट्राच्या सामाजिक समतेची, ही सहिष्णू विचारधारा पुढे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर साबळे, गवाणकर यासारख्या शाहिरांनी पुढे नेली. संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडणीतही या शाहिरांनी अमूल्य योगदान दिले. मराठी शाहिरी काव्याचा हा देदीप्यमान वारसा लक्षात घेता मराठी शाहीर म्हणजे महाराष्ट्राचा प्राणच जणू..!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -