घरफिचर्ससारांशकोरोनानंतरची विधवा विवाह चळवळ !

कोरोनानंतरची विधवा विवाह चळवळ !

Subscribe

दु:स्वप्न ठरावं तसा अचानक ‘कोरोना’ विषाणू मानवी जीवनात आला आणि सारे सुरळीत मानवी आयुष्य उध्वस्त करू लागला. ध्यानीमनी नसताना, वय-व्याधी नसताना हसत्या-खेळत्या, चालत्या-बोलत्या माणसांना कोरोना संसर्ग भरल्या-बहरत्या कुटुंबातून कायमचा घेऊन गेला. कितीतरी कुटुंबं अनाथ झाली, कुटुंबप्रमुख गमावलेली कुटुंबं अक्षरश: उघड्यावर पडली. ज्यांच्यामुळे आपण या जगात आलो, ज्यांच्यासाठी जगत होतो, ज्यांच्यामुळे जगत होतो त्याच माणसांचे हात-साथ झटकन सुटावी यासारखे दुसरे मोठे दु:ख मानवी आयुष्यात असू शकत नाही. मनातली ही पोकळी कधी भरुन निघणार नाही. पण म्हणून रडत किती दिवस बसणार? जितकं आयुष्य नशिबात आहे ते हसत-हसत जगता येणार नाही का? यावरच लक्ष केंद्रित करीत कोरोना विधवा महिलांसाठी एकल पुनर्वसन समितीने काम सुरू केले आहे. त्यात प्रामुख्याने विधवा महिलांच्या पुनर्विवाहावर जोर दिला जात आहे. राज्यभर पसरु पाहणार्‍या या चळवळीविषयी..

विश्वास बसू नये एवढ्या वेगाने शरीरात वेगाने कोरोना संसर्ग होत होता. श्वासयंत्रणा, फुफ्फुसं निकामी करत होता आणि माणूस कुणाला न सांगता, बोलता अचानक जगाचा निरोप घेत होता. ना शेवटचे बोलणे ना जीवलगांना अखेरचे डोळाभर पाहाणे! कोरोनाच्या पहिल्या लाटेत कितीतरी मायबहिणींचे कुंकू काळाने पुसले. कितीतरी मुलांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हरपले. मायबाप गेले, सासू-सासरे गेले, दीर-जावा गेल्या आणि हसणारी-खिदळणारी, रुसणारी, चिडणारी घरं अचानक मुकी झाली, उदास झाली. घराचे अंगण म्लान, शांत झाले. शाळा-महाविद्यालय भकास झाली, ओस पडली. गाड्या-रस्ते जणू जागीच थांबले. गाव, गल्ली, बाजारहाट यातील गजबज अदृश्य झाली. रोज दिवस उगवायचा तो कितीतरी लोकांच्या जाण्याची बातमी घेऊनच. सकाळी फोनाफोनी व्हायची तीच मुळात ऑक्सिजन कुठे उपलब्ध होईल? वा रेमिडीसीवर इंजेक्शन कुठे मिळतील? दवाखान्यात एखादी खाट आमच्या पेशंटला मिळू शकेल का? आणि ह्या सार्‍या प्रश्नांचे उत्तर सर्व बाजूंनी ‘नाही’ असेच येत होते. उपचार घेऊन आणि उपचाराअभावी अशा दोन्ही प्रकारातील मयत होत होते. प्रत्येकास दु:ख व्यथित करत होतं. कुणाची काय तर कुणाची काय कहाणी! सारे दुखरे दु:ख पण प्रत्येकाचा रंग वेगळा, हरवलेला माणूस वेगळा, नाते वेगळे.

कोरोना आपल्यापासून अजून दूर आहे असे आपण समजत होतो, पण अशात तो आपल्या शेजारी वा आपल्या घरातही कसा व केव्हा प्रवेश करता झाला? हे आपल्यालाही समजले नाही. एवढे सारे झपाट्याने घडत होते की, दुष्ट कोरोना आपल्याला विचार करण्याचीसुद्धा उसंत देत नव्हता. अशातच आमच्या शेजारी राहणारे, पतसंस्थेत नोकरीस असणारे भले गृहस्थ शरद झाल्टे हे कोरोनाबाधित झाल्याने त्यांना दवाखान्यात भरती केले. दशकभर वाट बघून जन्मास आलेल्या आपल्या तान्ह्या लेकीलाही त्यांनी डोळाभर बघितले होते की नाही? माहीत नाही. त्यांची तब्येत गंभीर झाली, घरच्यांनी प्रचंड धावपळ केली पण ते सातव्या दिवशी सगळ्यांना सोडून गेले. त्यांचे वृद्ध आईबाबा, पत्नी, लहान लेक, भावंड सारेच परिस्थितीपुढे हतबल झाले होते. अशी अनेक उदाहरणे गावोगावी आहेत.

- Advertisement -

ह्या सार्‍या भयंकर वातावरणात अनेक सामाजिक कार्यकर्ते पीडित कुटुंबाना आपापल्यापरीने मदत करत होते, पण ती मदत दीर्घकाळ आधार देणारी नक्कीच नव्हती. केवळ हळहळ करण्यात अर्थ नाही. आल्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल, ह्या कोरोना एकल महिलांचे, त्यांच्या पाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडून, स्थानिक प्रशासनाकडून योजना, निधी, रोजगार, शिक्षण सुविधा उपलब्ध होणे गरजेचे होते. काही खासगी संस्था-संघटनादेखील मदतीसाठी पुढे येत होत्या. ह्या सार्‍या बाबी गरजू कोरोना एकल विधवा महिलांपर्यंत पोहचवाव्यात, खचलेल्या या माय-माऊल्यांना आत्मविश्वास, धीर द्यावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी सर त्याकाळात समाजमाध्यमे व शक्य तिथे प्रत्यक्ष जाऊन कोरोना एकल महिलांना, त्यांच्या आप्तांना मार्गदर्शन, चर्चा करत होते. याकामी त्यांनी अनेक संवेदनशील, सजग माणसे त्यांनी जोडली.

नाशिक जिल्ह्यातील लासलगावीही अशा कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केले. खूप कमी वेळात पत्रकार अ‍ॅड. शेखर देसाई आणि सरपंच जयदत्त होळकर यांनी ग्रामपंचायतीच्यावतीने आखीवरेखीव कार्यक्रमाचे आयोजन केले. तिथे अनेक तरुण कोरोना विधवा उपस्थित होत्या. त्यांच्या डोळ्यातील चमक-स्वप्न लोप पावली होती, डोळ्यातील दाटलेला कंठ आणि डोळ्यातील आसवं यासह तरुण विधवा सरकारी योजनांविषयी अनेक शंका-प्रश्न आम्हाला विचारत होत्या. शक्य तसे निरसन आम्ही करत होतो. अशातच उंच, सडपातळ, गोरीपान मुलगी उठली आणि सहकार खात्याच्या निवृत्तीवेतनाबद्दल प्रश्न विचारू लागली, तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. तिचे नाव रुपाली (राणी) झाल्टे. भकास चेहर्‍याने ओसाड आयुष्य कसे काढावे? हा प्रश्न इथे अनेकींना होता. त्यात पदरी लहान लेकरं होती, त्यांच्या भविष्याचा प्रश्न अधिक काळजीत टाकणारा होता.

- Advertisement -

कोरोनामुळे अकाली विधवा झालेल्या पुनर्विवाह इच्छुक तरुणींचे विवाह आगामी काळात आपण जमवूया म्हणून कुलकर्णी सर, त्यांच्या पत्नी व आमची घरी आल्यावर चर्चा झाली. शेजारी राहणार्‍या राणीला त्याविषयी विचारले तर ती म्हणाली, हरकत नाही मॅडम, चांगले स्थळ असेल तर सुचवा. मला उभं आयुष्य काढायचे आहे लेकीला घेऊन! राणीने तिच्या लहानपणीच आई गमावलेली, सावत्र आई, मामा-आजी यांचाच काय तो आधार. सासू सासरे, दीरजावा सगळेच उच्चशिक्षित व समंजस. पण हिचे उभे आयुष्य अजून सरायचे आहे, शिवाय पदरात दीड वर्षाची मुलगी. तिचे खरे नाव रुपाली पण सारे तिला प्रेमाने राणीच म्हणत. राणी हसतमुख, हुशार, नक्षत्रासारखी तरुण सुंदर मुलगी. बारावीनंतर डी.एम.एल.टी. कोर्स केलेला, लासलगावमध्ये तिने काही काळ खासगी नोकरीही तिने केली. अचानक पती सोडून गेल्याचा धक्का तिला बसला. आव्हानात्मक टप्प्यावर आयुष्याने तिला आणून ठेवले होते.

कोरोना एकल महिलांच्या पुनर्वसन कार्यक्रम निमित्ताने हेरंब कुलकर्णी सरांशी सतत फोनद्वारे संपर्क होताच. राणीचे नाव ऑनलाईन वधूवर सूचकमंडळात मी दाखल केले. मग राणीसाठी आम्ही काही मुलांची स्थळं बघितली पण काहींना विधवा मुलगी नको होती, कुणाला आधीचे अपत्य नको होते तर कुणाला फक्त घर सांभाळण्यासाठी ‘बाई’ हवी अशा अपेक्षा होत्या. भलेही तो माणूस विधुर असो वा घटस्फोटीत त्याला अजूनही ‘चॉईस’ आहे हे आपल्या एकांगो पितृसत्ताक पद्धतीचं पातक आहे. समोरून अशी काही अपेक्षा ऐकून खूप संताप व्हायचा. त्याच काळात राणीची आई व मामा यांनी चंद्रकांत पालवे यांचे स्थळ तिच्यासाठी बघितले आणि व्यवस्थित चर्चा होऊन ते जमले. चंद्रकांत पालवे हे उच्चशिक्षित आहेत. किर्लोस्कर कंपनीत व्यवस्थापक ह्या चांगल्या पदावर ते नोकरी करीत आहेत. त्यांचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला होता. दोन अपत्यांपैकी अकरा वर्षांचा मुलगा त्यांच्याकडे आहे व एक पूर्वपत्नीकडे. राणीच्या दीड वर्षाच्या चिमुरडीचा त्यांनी मोठ्या मनाने स्वीकार केला आहे. ते तिला वडिलांचे नाव, प्रेम देणार आहेत आणि राणी त्यांच्या मुलावर मायेची पाखर घालणार आहे.

खरे तर जोडीदार ही गरज दोघांचीही आहे, आयुष्यभर एकमेकांच्या सोबतीने ते वाटचाल करणार आहेत. आयुष्यात दोघांनाही संकटे पाहिली-पचवली आहेत म्हणून त्यांना ‘सोबतीचे’ महत्व पटले आहे. गेल्या 6 फेब्रुवारीला त्यांचा विवाह नाशिकला पार पडला आणि ते चौकोनी कुटुंब आता आनंदात राहते आहे. लग्नानंतर मी व कुलकर्णी सर राणीशी, तिचे पती चंद्रकांत पालवे यांच्याशी फोनवर बोललो. दोघेही आनंदी होते. एकमेकांविषयी जिव्हाळ्याने आदराने बोलत होते. पालवे यांना अनेक प्रथम वधूंची स्थळे लग्नासाठी चालून आली होती, पण त्यांनी राणीला पसंती दिली. कारण तिच्या व तिच्या मुलीच्या पुढील आयुष्यास त्यामुळे स्थैर्य प्राप्त होणार होते. त्यांनी सामजिक भान ठेवून त्यांनी कोरोना विधवा राणीशी संसाराची गाठ नव्याने बांधली. बारावी डी.एम.एल.टी.चे शिक्षण घेतलेल्या राणीला चंद्रकांत पालवे नोकरीसाठीदेखील प्रोत्साहन देत आहेत. तिच्या लहानग्या मुलीची सर्व जबाबदारी ‘बाप’ म्हणून त्यांनी आनंदाने स्वीकारली आहे.

आज विधवा महिलांकडे बघण्याचा बुरसटलेला दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. या विवाहाच्या निमित्ताने तो निश्चित बदलेल असे वाटते. घटस्फोटीत, विधवा स्त्रीही व्यक्ती आहे, पतीचे छत्र एखाद्या अपघाताने हरवत असेल तर त्यात तिचा काय दोष? तिने हयातभर ते दु:ख कुरवाळत का बसावं? आई-वडील, सासू-सासरे, घरातील ज्येष्ठ यांनीच संवेदनशील समंजसपणे सुयोग्य स्थळ बघून विधवांचे विवाह लावले पाहिजेत, त्यांना आर्थिक स्वावलंबी केले पाहिजे. हयात असताना तिचेही नाव पतीच्या, सासरच्या मिळकतीवर लागले पाहिजे, पण शेतीचा शोध लावणारी बाईच आज पुरुषप्रधान मानसिकतेतून सातबार्‍यावरून बेदखल केली आहे. मुलींनी शिकले पाहिजे, सुजाण पालकत्व निर्माण व्हायला हवे.

समाजाची मानसिकता बदलायची असेल तर आपण स्वतःपासून सुरुवात करणे केव्हाही उत्तम. पालवे व त्यांच्या कुटुंबाने समाजाचा विचार न करता आपली विवेकबुद्धी जागृत ठेवत एका विधवेशी विवाह करून समाजाला आपल्या कृतीतूनच महत्वाचा संदेश दिलेला आहे. विधवा विवाहाचे स्वागत यानिमित्ताने होत आहे. मानवी जीवन एकदाच लाभते ते भरभरून जगता यायला हवे, आयुष्यात आव्हाने, सुख-दु:ख आहेतच, पण भूतकाळात रमून वर्तमान आणि भविष्य रखरखीत करण्यात काय हाशील? ह्या राजा आणि ‘राणी’चा नवा संसार फुलतोय, बहरतोय हे खूप सकारात्मक असे चित्र आहे. पण मित्रहो, करड्या दु:खाच्या छायेतून अनेक जीवांना बाहेर काढत असे अनेक संसार आपण उभे केले पाहिजेत.

महाराष्ट्रात कोरोनाकाळात 70 हजार महिला विधवा झाल्या असून त्यात 50 वर्षापेक्षा कमी वयाच्या 20 हजार महिला आहेत. या महिलांच्या पुनर्वसनासाठी कोरोना एकल पुनर्वसन समिती व आम्ही सारे कार्यकर्ते प्रयत्न करत आहोत. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून यातील तरुण वयाच्या महिलांच्या विवाहासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ‘कोरोना एकल पुनर्वसन समितीचे’ तालुका समन्वयक अप्पासाहेब ढूस यांच्या पुतण्याने एका विधवेशी विवाह केला. तिला 9 महिन्यांची लहान मुलगी आहे. महाराष्ट्रात विधवा विवाहाला खूप मोठी परंपरा आहे, परंतु अलीकडच्या काळात जाती बळकट होताना, परंपरा, वाढती पुरुषप्रधानता यामुळे विधवा विवाहांची गती मंदावलेली दिसून येते. विधुर, घटस्फोटीत पुरुष पुन्हा नव्याने विवाह करू शकतो व समाजाची त्याबद्दल काही तक्रार, शंका नसते. पण विधवा स्त्रीचा विवाह म्हणताच भुवया उंचावल्या जातात, नाकं मुरडली जातात. दुर्दैव म्हणजे यात महिलाच पुढे असतात. मुळात स्त्रीकडे एक व्यक्ती म्हणून समाज पाहत नाही, स्त्रीने तरी स्त्रीचे दु:ख समजून घ्यायला नको?

‘कोरोना एकल पुनर्वसन समिती’च्या माध्यमातून अशोक कुटे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर अशा विधवा महिलांना विवाह करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत. त्यासाठी एक वेबसाइट सुरू करून त्यात असे विवाह करणार्‍या महिला व पुरुष यांच्या नोंदणीसाठी marathisoyrik.in हा मंच तयार केला आहे; जेणेकरून महाराष्ट्रातील विधवा महिलांचे विवाह होतील. तरुणांनीही आवर्जून जोडीदार निवडताना एका महिलेचे आयुष्य सुखी करण्याचा विचार करावा. पंडिता रमाबाई यांचे हे स्मृतीशताब्दी वर्ष आहे. या वर्षात आपण पंडिता रमाबाई यांना आदरांजली म्हणून विधवा विवाहाची चळवळ गतिमान करूया, ज्यांना या कामात रुची असेल तसेच विवाह करण्याची इच्छा असेल अशा महिला व पुरुषांनी जरुर संपर्क करावा.

–डॉ. प्रतिभा जाधव

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -