घरफिचर्ससारांशमहाजाल की मोहजाल ?

महाजाल की मोहजाल ?

Subscribe

कधीकाळी सामान्य माणसांना स्वप्नवत वाटणारी मोबाईलसारखी आधुनिक साधने आज त्याचा एक अवयवच बनलीत. मोबाईल जवळ नसेल तर चैन पडत नाही. कॉलेजमध्ये शिकत असताना मी राजकीय सभांना आवर्जून हजेरी लावायचो. तेव्हा काही मान्यवर नेत्यांच्या हातात हे साधन मी प्रथम पाहिले. तेव्हा त्याचे खूपच अप्रूप होते. असे साधन आपल्या हाती येईल असा विचारही तेव्हा दुरापास्त होता. साधारण ते नव्वदचे दशक होते. त्यानंतर नजीकच्या काही वर्षातच हे साधन अत्यंत सुलभ झाले.मोबाईल नव्हते तेव्हा कोणत्याही शहरात गेले की ‘ एस .टी.डी.आय.एस .डी.पी.सी .ओ.अशा पिवळ्या रंगात लिहिलेल्या पाट्यांचे. एस.टी.डी.बुथ लक्ष वेधून घेत असत. आता हा नजराणा इतिहास जमा झाला.

‘टू बी ऑर नॉट टू बी’ असा प्रश्न काही शतके आपल्या मनात रुंजी घालत होता; पण समकाळाने हा प्रश्न निकाली काढला आहे. आता खरा प्रश्न आहे ऑनलाईन की ऑफलाईन. माध्यम क्रांतीच्या काळातला हा कळीचा मुद्दा. याला टाळून पुढे जाण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आता ते माणसाच्या आवाक्यातले राहिले नाहीय. इतका तो जटिल झाला. कधी नव्हे ते माणसाचे मनोविश्व, भावविश्व आणि अर्थविश्वही या एका प्रश्नाने व्यापलेले. काही वर्षापूर्वी लाईट गेले, नळाला पाणी आले नाही, ऑफिसात प्रंचड उकाडा वाढलाय, बॉसने झापलेय म्हणून माणसे अस्वस्थ व्हायची. आता साधी रेंज गेली, चार्जिंग संपले तरी माणसे हताश होतात. नेट बंद झाले की सर्व व्यवहार ठप्प होतात. इंटरनेटला महाजाल म्हणतात, पण ते मोहजाल केव्हा बनले ते कळलेच नाही. आता या मोहजालाच्या रंगीन दुनियेतून सुटका होणे माणसाच्या हातात राहिलेले नाहीय. माणसाच्या जगण्यातला तो एक आशय बनलाय. सर्व व्यवहार या जालाच्या एका क्लिकवर येऊन स्थिरावलेत.

कधीकाळी सामान्य माणसांना स्वप्नवत वाटणारी मोबाईलसारखी आधुनिक साधने आज त्याचा एक अवयवच बनलीत. मोबाईल जवळ नसेल तर चैन पडत नाही. कॉलेजमध्ये शिकत असताना मी राजकीय सभांना आवर्जून हजेरी लावायचो. तेव्हा काही मान्यवर नेत्यांच्या हातात हे साधन मी प्रथम पाहिले. तेव्हा त्याचे खूपच अप्रूप होते. असे साधन आपल्या हाती येईल असा विचारही तेव्हा दुरापास्त होता. साधारण ते नव्वदचे दशक होते. त्यानंतर नजीकच्या काही वर्षातच हे साधन अत्यंत सुलभ झाले.मोबाईल नव्हते तेव्हा कोणत्याही शहरात गेले की ‘ एस .टी.डी.आय.एस .डी.पी.सी .ओ.अशा पिवळ्या रंगात लिहिलेल्या पाट्यांचे. एस.टी.डी.बुथ लक्ष वेधून घेत असत. आता हा नजराणा इतिहास जमा झाला. तेव्हा सर्व बोलणे या बुथवरच व्हायचे. त्याकाळी माझ्या एका प्राध्यापक मित्राचे नुकतेच लग्न ठरले होते. या बुथवरूनच तो नेहमी बोलायचा.

- Advertisement -

तेव्हा गाजलेल्या धडकन सिनेमातील ‘तुम दिल कीधडकन में’ हे गाणे त्याने त्याच्या नियोजित बायकोला ऐकवलेले मला आजही आठवतेय. आम्ही त्याचे कधी संपते याची वाट पाहत त्या बॉक्सच्या बाहेर उभे असायचो. तो पर्यंत साठ-सत्तर रुपयाचे बिल झालेले असायचे. त्याचा कॉल संपेपर्यंत आमच्या उरातील धडकन वाढलेली. त्याच्या बोलण्यानंतर आमचे बोलणे. असा हा सिलसिला चारेक महिने सुरु होता. पुढे इ.स.2002 मध्ये आयडिया कंपनीचा बोलबाला वाढला. तेव्हा साडे तीन रुपये मिनिट कॉलींग होते. इनकमिंगलाही अडीच रुपये पडायचे. या काळात माझ्या मित्राने आणि मी पहिला सेल फोन घेतला आणि आम्ही कॉलेजातील पहिले मोबाईल प्राध्यापक झालो. अर्थात ‘अलीकडची पोरं काय चैन करतात’, असे वडिलधार्‍या प्राध्यापकांचे टोमणे खात, बिचकतच आम्ही तो सेल फोन वापरत असू. विद्यार्थ्यांमध्येही मोबाईल असणारे सर म्हणून आमच्याकडे नजरा. पण अल्पावधीतच ही परिस्थिती बदलली. इनकमिंग फ्री झाले. कॉल रेट एक रुपयावर, नंतर काही पैशावर येऊन स्थिरावला. नोकियाचे सेल फोन अनेकांच्या हातात मिरवू लागले.

बघता बघता ग्रुप कॉलींग फ्री झाले. नंतर रिलायन्सने बाजी मारली. त्यांनी अलगद मोबाईल धारकांना गळाला लावले. तोपर्यंत स्मार्ट फोन आले नव्हते. पुढे स्मार्ट फोनने ‘करलो दुनिया मुठ्ठीमे’ चा नारा खरा केला. या जाळ्यात आपण कसे अडकलो आणि स्थायी स्वरूपाचे ग्राहक झालो ते कळलेच नाही. सोशल मीडिया आला आणि फक्त सेल फोन नव्हे तर इंटरनेट डाटा महत्त्वाचा झाला. त्याची गरज निर्माण केली गेली. हळूहळू सारेच ऑनलाईन होत गेले आणि या मोहजालात माणूस कायमचा अडकत गेला. काहींच्या रोजी रोटीचेही ते साधन झाले. सर्वच व्यवहार मोबाईलच्या, लॅपटॉपच्या, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर येऊन स्थिरावले. ही साधने हाताळता न येणे अडाणीपणाचे ठरले. त्याचा सुलभतेने अवलंब करणे स्किल ठरले. हळूहळू माणूस तंत्रशरण होत गेला. माहिती तंत्रज्ञानाच्या या काळात ज्यांना या तंत्राचे कौशल्ये प्राप्त झाले त्यांचा वरचष्मा वाढला. हे कौशल्ये प्राप्त करणे गरजेचे झाले. यातूनच पुढे सायबर कॅफे, विविध कोर्सेस, क्लासेस वाढू लागली. सायबर कॅफेत जाऊन माणसे रंगू लागली, रेंगाळू लागली. हळूहळू माणसे या आभासी दुनियेत स्थिरावू लागली.

- Advertisement -

जेव्हा मोबाईलवर बोलण्याची जेव्हा सुविधा नव्हती तेव्हा तरूण मुले हसत, खेळत, एकमेकांची वाट पाहत उभी असत. तेव्हा त्यांच्यात जिवंत, दिलखुलास संवाद होई. गप्पांची मैफल झडे. आता मोबाईलवर सहज बोलता येते. बोलणेच इतके वाढलेय की त्याची किमंत वाटत नाही. बोलण्यासाठी कुणाची वाट पहावी लागत नाही. ‘डोळ्यात वाच माझ्या हे गीत भावनेचे’ अशी प्रेयसीला साद घालणारे गाणे केव्हाचेच पडद्यामागे गेलेय. आता माणसांचे डोळे बोलत नाहीत, ती समोरासमोर हासत नाहीत. हसतांना, आनंद, दु:ख व्यक्त करताना,ते ईमोजीचा वापर करतात. चिन्हांची नवी परिभाषा अस्तिवात आलीय.

व्यक्त होणे ही माणसांची स्वाभाविक गरज, पण या स्वाभाविकतेलाही आपण तंत्रशरण बनवले.आता सर्व काही रेडिमेड आयात करता येते. कोणतीही माहिती एका क्लिकवर मिळते. त्यासाठी कोणी व्याकुळ होताना दिसत नाही. माहितीचे प्रसारण झपाट्याने सुरु आहे. त्यात माणसांची संवेदना बोथट होतेय. या आभासी मायेचे सावट सदसद्विवेकबुद्धीलाच ग्रहण लावताना दिसतेय. मध्यंतरी मोबाईल लपवत एक आजोबा एका सायबर कॅफेमध्ये आले. त्यांच्या स्क्रीनवर एक अश्लील फोटो चिकटलेला. त्यांना तो काढता येईना. त्या तंत्रकुशल माणसांने ते प्रकरण हाताळले आणि त्यांची सुटका झाली. नंतर हा किस्सा त्या कॅफेवाल्याने सर्वत्र गाजवला. काय पाहत होते ते? या माध्यमावर काय ऐकावे, काय पाहावे? काय वाचावे? याचे भान सुटले तर? आपला विश्वामित्र होण्यास वेळ लागणार नाही.

ऑनलाईनच्या या काळात तर काही लहान मुलांनी अजून शाळेची पायरीच चढलेली नाहीय. माझा लहान पुतण्या नर्सरीलाच ऑनलाईन शिक्षणाला सामोरा गेला. या मोबाईलवरच सर्व काही शकता येते अशी त्याची धारणा झालेली. ड्रायव्हिंग येत नसलेल्या माझ्या भावाला तो सहजच म्हणाला ‘काका युट्युबवर बोल ना, गाडी कशी चालवतात ते’ आपल्याला जे पाहायचेय, ऐकायचेय, शिकायचेय, ते या फोनवर मिळते असे त्याला कळलेले. आता त्याची ही धारणा कशी बदलणार ?

लिहिण्याची सवय राहिली नाही. ऑनलाईन काळात अनेकांना भरगच्च मार्क मिळाले. ऑफलाईन शिकवले मग ऑनलाईन परीक्षा का? असा त्यांचा युक्तिवाद. तो काहीसा खराही, पण या पाठीमागचे त्यांचे गणित वेगळे. ऑनलाईनच्या मोहात विचार, विश्लेषण, चिंतन करण्याची सवय नाहीशी झालेली. सर्व काही व्हर्च्युअल ! असा हा काळ ..पण आता यातून सुटका नाही. तरी या साधनांचा आवश्यक तेवढाच वापर करून ,आपण आपला वेळेचा अपव्यय वाचवू शकतो. आपला स्क्रीन टाईम कमी करून काहीशी सुटका करून घेऊ शकतो. एवढेच आता आपल्या हाती. बाकी कालाय तस्मै नम: !

–अशोक लिंबेकर 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -