शिदोरी…

Subscribe

आपण जेव्हा आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला निरोप देतो, तेव्हाही त्यांच्याबरोबर आपण आवर्जून शिदोरी बांधून देतो. अशी शिदोरी आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांनाही त्यांच्या विसर्जनाच्या दिवशी देतो. ही शिदोरी त्यांना प्रवासात खाण्यासाठी आणि कैलासातल्या सर्वांना इथल्या पदार्थांचा वानोळा म्हणूनही दिलेली असते. प्रत्येक ठिकाणी या शिदोरीतले पदार्थ वेगवेगळे असतात. पण सगळ्याच ठिकाणी बाप्पांबरोबर विशिष्ट पध्दतीने तयार केलेले ‘दही पोहे’ मात्र नक्की दिले जातात.

‘शिदोरी’ म्हणजे खरे तर घरातलेच ‘खाद्यपदार्थ’, जे बाहेर नेऊन खायचे असतात. ‘शिदोरी’ या शब्दातच घरातला उबदारपणा साठवलेला आहे. ही ‘शिदोरी’ म्हणजे अगदी ऑफीसला नेण्याचा रोजचा डबा असो की आवळी भोजनासारखे गावाबाहेर केलेले जेवण की लांबच्या प्रवासाला जाताना बरोबर नेलेला फराळ… तिथे अगदी रोजचे घरचेच पदार्थ अधिक चवदार लागतात मग चार घास जास्त जातात. मला तर शिदोरी म्हटले की एखाद्या शेतकर्‍याच्या कारभारणीने आणलेली शिदोरी आठवते. कापडात बांधलेल्या पांढर्‍या शुभ्र भाकर्‍या, त्यावर ठेवलेला हिरव्या मिरच्याचा ठेचा, दह्याचं लोटकं, भरली वांगी..सोबतीला भुईमूगाच्या भाजक्या शेंगा आणि कांदा… लिहितानाही ही माझी जीभ खवळते आहे.
शिदोरीच्या खरे तर कित्ती आठवणी…. लांबच्या रेल्वेच्या प्रवासात, जेवणाच्या वेळी आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांनी डबे उघडले की होणारी देवाण घेवाण… सगळ्या पदार्थांच्या मिसळलेल्या चवी… त्यावेळी अगदी अनोळखी माणसेही एकमेकांना दोस्त बनतात.

शिदोरी प्रामुख्याने दोन प्रकारची. एक म्हणजे जेवणाची. लांबच्या प्रवासात नेण्यासाठी जेवणाच्या शिदोरीतले पदार्थ पाण्याचा अंश कमी असलेले आणि जरा अधिक टिकणारे असावे लागतात म्हणजे पोळ्या, दशम्या, गुळाच्या/ सांज्याच्या पोळ्या, मिरच्यांचा ठेचा, सुक्या चटण्या, लोणची.. बटाट्याची सुकी भाजी, झुणका, प्रवासी पिठले, थापट वड्या, दही भात…इ. दुसर्‍या प्रकारची शिदोरी म्हणजे फराळाची. त्या शिदोरीत भाजलेले शेंगदाणे, तिखटा-मीठाच्या पुर्‍या, वेगवेगळ्या प्रकारचे पण खरपूस भाजलेल्या पिठांचे, शक्यतो पाकातले लाडू, उडिद, तांदूळ आणि हरभरा डाळीचे निपट्टू (चपट्या पुर्‍या), चिवडा, चकल्या, शेव, करंज्या असा दिवाळीसारखा फराळ. त्यात असतो.

- Advertisement -

आमच्या कोल्हापूरकडे सासरहून माहेरी निघालेल्या मुलींबरोबर, तिच्या माहेरच्या पै पाहुणे आणि शेजार्‍यांसाठी लाडू/ करंज्या/केळीची शिदोरी पाठवायची पध्दत आहे. या शिदोरीवरून सासरच्या लोकांची दानत आणि आपल्या मुलीची त्यांच्याकडे असलेली पत जोखली जाते. अशी शिदोरी तिच्या माहेरूनही सासरी जाते.

आपण जेव्हा आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला निरोप देतो, तेव्हाही त्यांच्याबरोबर आपण आवर्जून शिदोरी बांधून देतो. अशी शिदोरी आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांनाही त्यांच्या विसर्जनाच्या दिवशी देतो. ही शिदोरी त्यांना प्रवासात खाण्यासाठी आणि कैलासातल्या सर्वांना इथल्या पदार्थांचा वानोळा म्हणूनही दिलेली असते. प्रत्येक ठिकाणी या शिदोरीतले पदार्थ वेगवेगळे असतात. पण सगळ्याच ठिकाणी बाप्पांबरोबर विशिष्ट पध्दतीने तयार केलेले ‘दही पोहे’ मात्र नक्की दिले जातात. यामागे एक लोककथा सांगितली जाते. पूर्वी म्हणे गणेशोत्सवानंतर श्रीगणेश जेव्हा कैलासात परत जात, तेव्हा त्यांचे पोट हमखास बिघडलेले असायचे. तसे तर त्यांची पार्वती माय त्यांना, पृथ्वीवरच्या प्रवासात जपून खाण्याचा सल्ला देत असेच. पण त्यांच्याच उत्सवासाठी पृथ्वीवर जाण्याचा, श्रीगणेशांना एवढा अमाप उत्साह असे की ते आईच्या सांगण्याकडे साफ दुर्लक्ष करत असत. त्यात त्यांना खाण्याची आत्यंतिक आवड आणि प्रेमळ भक्तांचा अनाठायी आग्रह यामुळे, उत्सव संपेपर्यंत म्हणजे चांगले दहा दिवस… पोट तुडुंब भरेपर्यंत, ते यथेच्छ गोडधोड आणि तळणाचे पदार्थ खात…मग जो परिणाम व्हायचा, तो निस्तरायला त्यांना आईच लागे. मग पोट दुखतेय म्हणून त्यांचे रडणे काय… नाचणे काय…नुसता थयथयाट असायचा. त्यात कार्तिकेय दादाचे चिडवणे… पार्वती मातेला अगदी वैताग येई. अशावेळी शंकर महादेव मात्र नेहमीप्रमाणेच ध्यानालाच बसलेले असत. पण ते जरी ध्यानात असले तरी त्यांचे लक्ष मात्र घरात असे. गणेशांची रडारड ऐकून एकदा त्यांनी पार्वतीला सांगितले, गणेशाच्या भक्तांना निरोप द्या, त्याला हवे तितके खायला घाला, पण कैलासावर परत पाठवताना, त्याच्या हातावर, थोडे गोड दही ठेवा आणि बरोबर ‘दही पोह्याची’ शिदोरी द्या.

- Advertisement -

दही पोहे…! एवढे मोदक, खीर, लाडू, घारगे..भजे, वडे वगैरे खाल्ल्यावर ‘दही पोहे!’ हूं… म्हणून गणेशांनी सोंड वाकडी करून नापसंती दर्शवली होती. पण महादेवांच्या डोळ्यांकडे पाहून त्यांनी मुकाट्याने ते मान्यही केले. खरे तर त्यानंतरच, गणेशोत्सवानंतरचा ‘तो त्यांच्या पोटदुखीचा कार्यक्रम’ म्हणे कायमचा संपुष्टात आला. यातली गंमत सोडून दिली…तरी दही आणि दही पोहे…हे अजीर्ण पोटावर उत्तम औषध असतात. भवरोग वैद्य असलेले ईश्वर ते जाणत असणारच.
मात्र तेव्हापासूनच म्हणे विसर्जनाच्या वेळी गणेशांच्या हातावर इवलेसे पण गोड दही ठेवण्याची प्रथा सुरू झाली. या दह्यात मीठ, साखर घालत नाहीत. त्यावेळी गणपतींबरोबर ‘दही पोहेही’ देतात. त्यासाठी दगडी पोहे पाण्यात चांगले धुवून कोरडे करतात. मग एक वाटी धुतलेल्या पोह्यांना, चार चमचे दूध आणि अर्धा चमचा दही लावतात. त्यावर मीठ, साखर घालून त्या पोह्यांवर, तेलात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची किंवा खाराची मिरची घातलेली फोडणी घालतात. मग ते कोरडे दिसणारे पोहे केळीच्या पानात बांधतात आणि त्यांची पुरचुंडी बांधून तिचा दोरा गणेशांच्या हातात देतात. प्रवासात भूक लागली की तशा पोह्यात साधे पाणी घातले की एकदम चवदार दही पोहे तयार होतात. या पोह्यांमधल्या कार्बज्मुळे पोटही पटकन भरते. त्याचबरोबर त्यातल्या आयर्न आणि बी ग्रुप्सच्या व्हिटॅमिन्समुळे प्रवासाचा शीण होत नाही. त्यातल्या दह्यामधल्या ‘प्रोबॉयॉटिक्समुळे’, प्रवासात अद्वातद्वा खाणे झाले तरी पोटही बिघडत नाही.
पण श्रीगणेशांचे भक्त त्यांची फक्त पोह्यांवरच बोळवण करत नाहीत. त्याशिवाय कैलासावरही देण्यासाठीच्या शिदोरीसाठी बनवलेले पदार्थही एकसे एक असतात.

हे सर्व पदार्थ भौगोलिक स्थान आणि प्रत्येक कुटुंबातील पध्दती यानुसार वेगवेगळे असतात. त्या सगळ्या पदार्थात मला आवडतात त्या ‘खानदेशातल्या तेलच्या’. त्यासाठी खपली गहू खमंग भाजतात आणि त्याचा रवा काढून…तो गुळाच्या दाटसर पाण्यात रात्रभर भिजवतात. त्या गुळाच्या पाण्यात किंचित मीठ, सूंठ, जिरे आणि वेलदोडेही घालतात. रात्रभर गूळाचे पाणी पिऊन तो रवा चांगला फुलतो. मग हाताला तूप लावून त्या रव्याचे सैलसर लाडू बांधतात. कणकेत थोडे बेसनाचे पीठ आणि कडकडीत मोहन आणि मीठ घालून घट्ट भिजवतात. दोन कणकेच्या गोळ्यांमध्ये तो सोजीचा लाडू ठेवून, त्याच्या पुर्‍या लाटून तळतात. या पुर्‍या चांगल्या फुगतात. यांचे वैशिष्ठ्य म्हणजे शिळ्या ‘तेलच्या’ चवीला अधिक छान लागतात. काही ठिकाणी शेवखंड किंवा शेवखंडाचे लाडू करतात. बेसनाची जाड शेव तळून गुळाच्या पाकात घालतात. यासाठी शेव करताना पुरेसे मोहन घालणे आणि खमंग तळणे आवश्यक असते. गुळाच्या पाकातली शेव इतकी सुंदर लागते की कितीही खाल्ली आणि पोट भरले तरी मन भरत नाही. काही जणांकडे ही तळलेली शेव बारीक करतात आणि त्यात गूळ किंवा पीठी साखर घालून लाडू करतात.

पुण्या-मुंबईकडे यावेळी वाटली डाळ, काही ठिकाणी लिंबाचा रस, सुके खोबरे घातलेली कच्ची आंब्याची डाळ करतात. तर कुठे वाटलेल्या हरभरा किंवा हिरव्या मुगाच्या डाळीचे किंवा बेसनाचे लाडू करतात. उत्तर कर्नाटकात डाळ्याचे आणि चुरमुर्‍याचे लाडू करतात. काही ठिकाणी ओले खोबरे चांगले कोरडे भाजून त्यात पीठी साखर मिसळतात आणि पांढर्‍या शुभ्र करंज्या करतात. काही ठिकाणी खोबरे, रवा आणि साखर घालून तळलेले मोदक करतात. कोकणातही काही ठिकाणी तुपात गुलाबीसर भाजलेल्या कणकेत पिठीसाखर मिसळून कणकेचे लाडू करतात. मालवण जवळच्या भागात यावेळी ‘बोरे’ करायची पध्दत आहे. कणकेत थोडेसे तांदळाचे पीठ घालून त्यात तीळ, जिरे, मीठ, सुके खोबरे भाजून घालतात आणि चिंच गुळाच्या पाण्यात ती कणिक भिजवून त्याचे छोटे बोराएवढे गोळे करून तळतात. हे गोळे अळूच्या पानात ठेवून त्याची पुरचुंडी केळीच्या सोपाने बांधतात. विसर्जनाच्या वेळी, गणपती बाप्पांच्या गळ्यात अशा बर्‍याच, शिदोर्‍यांच्या पुरचुंड्यांची माळ अडकवलेली असते. काही ठिकाणी कणिक आणि तांदळाच्या पीठाची उकड काढून छोट्या बरण्या करतात. त्यामध्ये हरभर्‍याची डाळ आणि भरपूर गूळ, सुका मेवा घातलेले खोबर्‍याचे सारण भरून, त्या बरण्या तळतात. कर्नाटक किनारपट्टीवरच्या गावात यावेळी ‘अंबोडे’ नावाची अतिशय चविष्ट अशी भजी करतात. हरभरा डाळ भिजवून, त्यामध्ये मिरची, आले, आणि (त्यात काही ठिकाणी त्यात मिरी, बडिशेप/ शेपूही घालतात) आणि कोथिंबीर घालून चपटी भजी थापून खरपूस तळतात. दक्षिण कोकणात, अळूच्या पानांच्या गाठोड्यात भात, काळ्या वाटाण्याचे सांबार आणि वडे असे ताजे जेवण बांधून बाप्पांच्या बरोबर देतात.

कोकणातच काही ठिकाणी विसर्जनाच्या वेळी गणरायांबरोबर हरभरा आणि मूग डाळ, तांदूळ, नारळ, गूळ, कणिक, भाज्या असा कच्चा शिधाही बांधून देतात. काही कडक सोवळे ओवळे पाळणारे लोक, घरातले, शिजवलेले पदार्थ बाहेर खात नाहीत, ते लोक प्रवासाला जाताना कच्चा शिधा बरोबर घेऊन जातात आणि एखाद्या थांब्यावर चूल मांडून स्वैपाक करतात. ते लोक त्यांच्या देवांनाही तशीच शिदोरी देतात. काही वेळा त्यांच्या शिदोरीत तुपात भाजलेला कोरडा शिरा किंवा उप्पीटही असते. गरम पाणी घातले की पदार्थ खाण्यासाठी तयार होतात. काही ठिकाणी, देवांच्या बरोबर फक्त फळे बरोबर देतात.

दूरच्या प्रवासासाठी न्यायच्या शिदोर्‍यांमध्ये बहुधा हरभर्‍याच्या डाळीचे पदार्थ असतातच. पूर्वीच्या प्रवासामध्ये ते पदार्थ, तहान लाडू, भूक लाडूसारखे काम करत. कारण प्रवासात कधी कुठे.. पाणी, खाणे मिळेल याची तेव्हा शाश्वती नसायची. मानस सरोवर, हिंगलाज यासारख्या अनेक यात्रांमध्ये, त्या शिदोरीत कोणकोणते पदार्थ असावेत आणि कधी कोणत्या वेळी खावेत, अशा प्रकारचे अनेक नियम असतात. पण त्यातला महत्वाचा नियम म्हणजे, शिदोरीतल्या पदार्थांची देवाण घेवाण करायची नाही. पण अनेक संतचरित्रांमध्ये त्यांनी त्यांच्या शिदोरीतले पदार्थ सोबतच्या वाटसरूंना दिल्याचे उल्लेख असतात. अशा वेळी देणारा आणि घेणारा दोघेही कृतकृत्य होतात आणि माणुसकीचे बंध अधिक सघन होतात.

मंजुषा देशपांडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -