घरसंपादकीयओपेडसंगीतोपचार...

संगीतोपचार…

Subscribe

चांगल्या प्रकारचे संगीत ऐकल्यास निश्चितच त्याचा उत्तम परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. येणार्‍या काळामध्ये कुठल्याही प्रकारचे औषधोपचार न करता हेडफोन्स लावून केवळ संगीताचे श्रवण केल्याने अनेक जुन्या व्याधी दूर होत असल्याचे जर आपणास समजले तर यात नवल नाही. छत्तीसगड राज्यातील खैरागडमधील साल्हेवारा या गावात याची अंमलबजावणीदेखील केली जात आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामधील राग ऐकवून अनेकांच्या जुन्या व्याधी बर्‍या केल्या जात आहेत.

गायन, वादन आणि नृत्य यांच्या समागमाला संगीत असे म्हणतात. संगीताची ही पुस्तकी व्याख्या असली तरी काही विद्वानांच्या मते रंजन करणारे शास्त्र म्हणजे संगीत होय. म्हणजेच ज्या ध्वनीलहरी ऐकून आपले मनोरंजन होते त्याला संगीत असे म्हणतात, परंतु संगीताने केवळ मनोरंजनच होते असे नव्हे, तर आधुनिक अभ्यासकांच्या मतानुसार संगीत हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. संगीताचा भौतिक गोष्टींवर परिणाम कसा होतो यासाठी एक सोपे उदाहरण समजून घेऊया. आपण कार चालवत असाल आणि आपल्या कारमध्ये संथ लयीत अभंग, भजन अथवा विरहगीत सुरू असेल तर आपल्या कारचा वेग नियंत्रित असतो. याउलट द्रुत लयीमधील एखादे पाश्चात्य संगीत सुरू असेल तर आपल्या कारचा वेग आपोआप वाढतो. नकळत आपल्याकडून कार जोरात चालवली जाऊ शकते. आधुनिक व्यायामशाळा म्हणजेच जिममध्ये फास्ट म्युझिक लावण्यामागे हेच कारण असावे. म्हणजेच संगीताचा भौतिक गोष्टींवर निश्चितच परिणाम होतो.
चांगल्या प्रकारचे संगीत ऐकल्यास निश्चितच त्याचा उत्तम परिणाम आरोग्यावर दिसून येतो. येणार्‍या काळामध्ये कुठल्याही प्रकारचे औषधोपचार न करता हेडफोन्स लावून केवळ संगीताचे श्रवण केल्याने अनेक जुन्या व्याधी दूर होत असल्याचे जर आपणास समजले तर यात नवल नाही. छत्तीसगड राज्यातील खैरागडमधील साल्हेवारा या गावात याची अंमलबजावणीदेखील केली जात आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामधील राग ऐकवून अनेकांच्या जुन्या व्याधी बर्‍या केल्या जात आहेत.

भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीमध्ये निरनिराळे थाट निरनिराळ्या रागांची निर्मिती करतात. या रागांमध्ये निरनिराळे भावदेखील असतात. समजा आपण मानसिकरित्या अस्वस्थ आहात. अशा परिस्थितीमध्ये शांत ठिकाणी बसून ‘भूप’ अथवा ‘बिलावल’ रागाचे श्रवण केल्यास मन स्वस्थ होते आणि आपणास प्रसन्न वाटू लागते. इंसोमनिया म्हणजेच अनिद्रा या व्याधीमध्ये राग ‘भैरवी’ अथवा राग ‘सोहनी’ ऐकल्यास लाभ मिळेल. हृदयरोगामध्ये राग ‘दरबारी’ व राग ‘सारंग’ ऐकल्यास मदत होईल. हे दोन्हीही राग सितार वादनामध्ये ऐकल्यास उत्तम परिणाम दिसून येतात. उच्च रक्तदाबामध्ये विलंबित लयीत म्हणजेच कमी गतीमधील कुठलाही गीत प्रकार ऐकल्यास लाभ मिळू शकतो. त्याचप्रमाणे कमी रक्तदाबाच्या व्याधीमध्ये तीव्र गतीमधील गीत ऐकावे. अ‍ॅसिडिटीचा त्रास असेल तर राग ‘खमाज’ ऐकावा. शारीरिकदृष्ठ्या थकवा येत असेल तर राग ‘जयजयवंती’ ऐकावा. त्याचप्रमाणे स्मरणशक्तीचा अभाव असेल तर राग ‘शिवरंजनी’ ऐकल्यास स्मरणशक्तीमध्ये वृद्धी होते. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने राग शिवरंजनीमधील विविध गीत प्रकार दररोज ऐकावा. डिप्रेशन अथवा कुठलाही मनोरोग असल्यास राग ‘बिहाग’ अथवा राग ‘मधुवंती’ ऐकावा. अशा व्यक्तींनी घुंगरू अथवा तबला वारंवार ऐकायला हवा.

- Advertisement -

संगीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये संगीत उपचार पद्धतीचा परिणाम लवकर दिसून येतो. संगीताबद्दलची असणारी रुची आणि स्वरांची समज यामुळे त्यांच्यावर संगीत उपचार पद्धतीचा परिणाम अगदी कमी कालावधीमध्ये दिसून येतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने शास्त्रीय संगीत अथवा कुठलेही एखादे वाद्य नक्कीच शिकायला हवे. आपणास जर कुठल्याही रागांची अथवा स्वरांची समज नसेल तरीदेखील केवळ श्रवण केल्यानेसुद्धा आपणास लाभ मिळू शकतो. दररोज झोपण्याअगोदर आणि सकाळी उठल्याबरोबर अंदाजे 15 मिनिटांपर्यंत संगीत ऐकायला हवे. सुमारे 10 ते 15 दिवसांमध्येच आपल्याला आश्चर्यकारक परिणाम दिसायला लागतील.

संगीत उपचार पद्धतीच्यादेखील काही मर्यादा आहेत. संगीत उपचार पद्धती ही कम्युनिकेबल डिसीजेस यावर काम करीत नाही. डेंग्यूचा डास चावल्यास डेंग्यू होईल, मलेरियाचा डास चावल्यास मलेरिया होईल, अशुद्ध पाणी पिल्यास अथवा अशुद्ध खानपान केल्यास डायरिया होऊ शकतो, अशा प्रकारच्या आजारांवर संगीत उपचार पद्धती काम करू शकत नाही. संगीत उपचार पद्धती हृदयरोग, मधुमेह, दमा यांसारख्या व्याधींवर काम करते. एखाद्या व्यक्तीला म्युझिक ऐकण्याची आवड नसेल तर जबरदस्तीने त्याला संगीत अथवा राग ऐकवून बरे केले जाऊ शकत नाही. मनातील भाव सकारात्मक असणे अत्यंत गरजेचे आहे.

- Advertisement -

साहिल पाटील
   एम. ए. संगीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -