महाराष्ट्राचे सांस्कृतिक माहेर!

मी पांडुरंगाला मानत नाही आणि पंढरीलाही असं म्हणणारा नास्तिक अजूनतरी महाराष्ट्रात जन्माला आला नाही; यातच या क्षेत्राचे महिमान आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा देव महाराष्ट्रातील राकट, कणखर, श्रमिकांचा, तमाम कष्टकर्‍याचा, दिन-दुबळ्या वंचितांचा देव आहे. म्हणूनच त्याचा वर्णही या माणसासारखाच काळा आहे. याचे अधिष्ठान रत्नजडीत सिंहासनावर नाही तर मातीच्या विटेवर गेली अठ्ठावीस युगे तो उभा आहे. तेही कर कटेवर ठेऊन नेहमीच सज्ज! असा हा गोरगरीब भक्तांना जगण्याची ऊर्जा आणि बळ देणारा पंढरीनाथ मराठी माणसाला आवडला याचे गमक हेच आहे. या विठ्ठल रुपात प्रत्येकाला आपलेच रूप दिसते. देव आणि भक्त यांच्यातील हा अद्वैत भाव इतरत्र शोधूनही सापडणार नाही. म्हणूनच महाराष्ट्राचे सांस्कृतिक माहेर म्हणून या क्षेत्राचा गौरव करावा लागतो.

24-hour curfew has been imposed in 10 villages, including Pandharpur city, on the backdrop of Maghi Yatra

मराठी माणसाच्या भक्तीचे, निष्ठेचे आणि श्रद्धेचे केंद्रस्थान म्हणजे पंढरपूर! जशी आपल्या आईची ओळख करून द्यावी लागत नाही, तशीच या गावाची, तीर्थाची वेगळी ओळख करून द्यावी लागत नाही. या स्थळाविषयीचा पूज्यभाव सांस्कृतिक वारशानेच आपणास प्राप्त झालेला आहे. पंढरपूरचे नाव लहानपणीच आपल्या कानावर पडते. कारण या भक्तीपेठेचा आणि आपल्या गावाचा पुराण संबध आहे. इतरत्र कोठेही जाणे झाले नाही; तरी या क्षेत्राला गावातील कोणीतरी भेट दिलेलीच असते. त्यामुळे बाल्यावस्थेतच हे गाव आपल्या मनात वसतीला येते. जशी चिऊ-काऊची गोष्ट आपण लहानपणीच आजीकडून ऐकतो तसेच भजन कीर्तनाच्या द्वारे पंढरीच्या पांडुरंगाचे नाव आणि पंढरपूर आपल्या मनात सदैव दुमदुमत असते. मराठी माणसाचे अवघे जीवनच या दोन घटकांनी व्यापलेले आहे, किंबहुना आपल्या सांस्कृतिक जीवनातील हे अविभाज्य घटक आहेत. यांना वगळून मराठी माणसाचे सांस्कृतिक जीवन परिपूर्ण होत नाही. मराठी माणसाच्या या पंढरी प्रेमाचे प्रेरकस्थान म्हणजे वारकरी पंथ आणि सकळ मराठी संत. या पंथाच्या संत साहित्यातून आणि संतविचारातून व विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून ही परंपरा सदैव प्रवाहित राहिली.

तिला आजपर्यंत कोणीही खंडित करू शकले नाही. अस्मानी-सुलतानी तसेच आधुनिक काळातील जागतिकीकरणाच्या लाटेलाही या परंपरेने पचवून आपली अक्षय्यता कायम राखली. कारण मराठी माणसाच्या अस्मितेच्या आद्यस्थानी पंढरीचा पांडुरंग आणि पंढरपूर आहे! मी पांडुरंगाला मानत नाही आणि पंढरीलाही असं म्हणणारा नास्तिक अजूनतरी महाराष्ट्रात जन्माला आला नाही; यातच या क्षेत्राचे महिमान आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा देव महाराष्ट्रातील राकट, कणखर, श्रमिकांचा, तमाम कष्टकर्‍याचा, दिन-दुबळ्या वंचितांचा देव आहे. म्हणूनच त्याचा वर्णही या माणसासारखाच काळा आहे. याचे अधिष्ठान रत्नजडीत सिंहासनावर नाही तर मातीच्या विटेवर गेली अठ्ठावीस युगे तो उभा आहे. तेही कर कटेवर ठेऊन नेहमीच सज्ज! असा हा गोरगरीब भक्तांना जगण्याची ऊर्जा आणि बळ देणारा पंढरीनाथ मराठी माणसाला आवडला याचे गमक हेच आहे. या विठ्ठल रुपात प्रत्येकाला आपलेच रूप दिसते. देव आणि भक्त यांच्यातील हा अद्वैत भाव इतरत्र शोधूनही सापडणार नाही. म्हणूनच महाराष्ट्राचे सांस्कृतिक माहेर म्हणून या क्षेत्राचा गौरव करावा लागतो.

संत ज्ञानदेवापासून पुढील सर्व संतानी आपल्या अभंगातून पंढरपूरचा गौरव केला आहे. ज्ञानदेवांनी आपल्या पंचवीस अभंगातून, नामदेवांनी चोपन्न, तर संत तुकारामांनी सर्वात जास्त म्हणजे जवळ-जवळ दोनशेहून अधिक अभंगातून केवळ पंढरी प्रेम आणि तिचे महिमान अभिव्यक्त केले आहे. संत नामदेव आपल्या पंढरी महात्म्यातून सकळ तीर्थात असलेल्या या स्थानाचे महत्व सोदाहरण आणि भारतातील सर्व तीर्थाचा उल्लेख करून स्पष्ट करतात. अनंत तीर्थाचे माहेर । अनंत रूपाचे सार, असे म्हणून ते पंढरपूरचा गौरव करतात. तर संत तुकाराम म्हणतात, ‘उदंड देखिले उदंड ऐकिले । उंदंड वर्णिले क्षेत्रमहिमे । परी ऐसी चंद्रभागा । ऐसे भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठे । तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे । पंढरी निर्माण केली देवे,’ तुकारामांची ही उक्ती किती सार्थ आहे नाही? कारण तसे पाहिले तर असा देव आणि असे त्याचे वारकरी भक्त हीच खरी महाराष्ट्राची ओळख आहे. विटेवर उभा असलेला हा देव वैश्विकदृष्ठ्या युनिक आहे. तो एकमेवाद्वितीय आहे, म्हणूनच त्याची तुलना कोणाशीच होत नाही.

संत नामदेव आणि संत तुकाराम हे दोघेही हीच भावना पुढील अभंगातून आविष्कृत करतात. संत नामदेव म्हणतात, ‘अवघी ही पंढरी सुखाची वोवरी, अवघ्या घरोघरी ब्रह्मानंद ।’ पंढरीच्या सुखा अंतपार नाही लेखा।’ संक्षेपाने एकाच शब्दात ते पंढरीच्या सुखाचे तेथील अवर्णनीय भक्ती आनंदाचे वर्णन करतात. तर संत तुकाराम म्हणतात ‘वाराणशी गया पाहिली द्वारका । परी नये तुका पंढरीचा.’ इतर कोणत्याही तीर्थाची पंढरपुराशी तुलना होऊ शकत नाही असे स्थान महात्म्य सर्वच वारकरी संतानी एकमुखाने व्यक्त केले आहे. संत जनाबाईनेही हीच भावना व्यक्त केली. ती म्हणते ‘पंढरी सांडोनी जाती वाराणशी । काय सुख त्यासी आहे तेथे । सर्व तीर्थेच जिथे पवित्र व्हायला येतात त्यांनी हे सोडून बाहेर का जावे? हा विचार संत नामदेव आणि जनाबाई या दोघांनीही व्यक्त केला. मुक्तीसाठी किंवा मोक्षप्राप्तीसाठी इतरत्र कोठेही जाण्याची गरज नाही; कारण मुक्ती आणि मोक्षच पंढरपूरला नांदतात. संत तुकाराम यापुढे जाऊन म्हणतात ‘ऐसा ठाव नाही कोठे । देव उभा उभी भेटे । तुका म्हणे पेठ । भूमीवरी हे वैकुंठ।’ पंढरपूरच्या रूपाने जणू वैकुंठच या भुईवर आले आहे. त्यामुळे या पेठेसारखी दुसरी पेठ नाही.

इथले वाळवंट, वैष्णवाचा मेळावा, विलोभनीय भीमातीर हा आनंद मुक्तीच्या आनंदापेक्षाही मोठा आहे. हे सुख चिरंतन लाभणार असेल तर मुक्तीचीही गरज नाही. ही भावना तुकारामांनी आपल्या अनेक अभंगातून समर्थपणे व्यक्त केली आहे. ‘न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा । तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी,’ असे म्हणून तुकारामांनी या भक्तीसुखाला मोठे परिमाण दिले. किंबहुना, हा आनंदच मुक्ती आहे, मोक्ष आहे हेच त्यांना इथे म्हणायचे होते. संत नामदेव तर सर्व संतापेक्षा पंढरीच्या अधिक निकट राहिलेले. प्रत्यक्ष देवाचा शेजार त्यांना लाभलेला असल्याने इतर संतानाही नामदेवाबद्दल खूपच जिव्हाळा होता. या प्रेमात कुठेही असूया, द्वेष, मत्सर दिसणार नाही. उलट नामदेवाचा सहवास म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाचाच सहवास अशीच सर्व संताची धारणा होती. त्यामुळे नामदेवाचे हे सान्निध्य, त्यांचे हे पद कोणीही हिरावण्याचा प्रयत्न केला नाही हे विशेष! नामदेवाची वाणी तर पंढरी प्रेमाने ओथंबून येते. ते म्हणतात ‘सांडोनिया वाळवंट । काय इच्छिसी वैकुंठ ।’ अशाप्रकारे पंढरीच्या महात्म्याचे गुणगान मराठी संतानी केले आहे. आम्हाला वैकुंठ नको पंढरीचा सहवास हवा ही दुर्दम्य अभिलाषा संत व्यक्त करतात. मराठी संतांच्या याच भक्तीभावाचे संस्कार आपल्या मनावर झाले.

मराठी संतांचे अभंग स्मरत, गात, ऐकत, गुणगुणत लहानाचे मोठे झालेलो आपणही नकळत पंढरीकडे ओढलो जातो. मराठी माणसाच्या भावविश्वात पंढरी नांदायला येते. इथे कुणी कुणालाच सक्ती करत नाही, कारण हे आपसूकच आपल्या मनात उमलत असते. हा भक्तीचा प्रवाह आपल्या रक्तातूनच प्रवाहित होत आला आहे. म्हणूनच मराठी माणसाचे आणि पंढरीचे नाते हे माहेराचे आहे. माहेरचे मोठेपण, त्याची श्रीमंती सासरी जाणार्‍या मुलीलाच समजत असते. माहेरचा आंनद हा अवर्णनीय आणि अनुपम्य असतो. त्याची सर कशालाच नसते. सासरच्या मुलीला हे विचारून पहा? सगळे सुख एकीकडे आणि माहेरचे सुख एकीकडे! माहेरची नुसती आठवणही मनाला नवसंजीवनी देणारी असते. तिथे मायेचा पदर असतो, बापाचा आधार असतो आणि अखंड स्नेहाचा पाझर असतो. या सुखाला कोणी विटेल का? हे सुख तमाम स्त्री-पुरुषांना पंढरीच्या पांडुरंगानेच दिले. म्हणूनच तो आपल्याशी सगळ्या नात्यांनी बांधलेला आहे. जगाच्या पाठीवर असा स्नेहभाव सापडेल का? संत एकनाथ म्हणतात ‘माझे माहेर पंढरी । आहे भिवरेच्या तीरी’ या अभंगात पंढरपूर आपल्याशी किती नात्यांनी जोडलेले आहे याचा निर्देश होतो.

हे स्वर्ग सुख ज्याने आपल्या पदरात टाकले त्याच्याबद्दल नितांत आदरभाव व्यक्त केला पाहिजे. तसा अनेक संतानी हा आदरभाव व्यक्त केला. आपल्या भक्तीच्या बळावर भक्तराज पुंडलीकाने हे निरंतर भक्तिसुख आपल्या पदरात टाकले. त्यामुळेच सर्व संतानी भक्त पुंडलिकाचा याबाबत सार्थ गौरव केला आहे. पुंडलिकाने मराठी माणसावर केलेले हे अपरिमित उपकार आहेत. किंबहुना, त्याने भक्तीची पाऊलवाट सुलभ केली. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या रूपाने वैकुंठच भुईवर आणले, संत तुकाराम याबाबत म्हणतात ‘धन्य ते पंढरी । धन्य ते भीमातीर । आणियले सार पुंडलिके।’ भक्त पुंडलिकाच्या या श्रेयाची सर्वच संतांनी मुक्तकंठाने प्रंशसा केली आहे. खरं तर वारकरी पंथाच्या आधीपासून विठ्ठलभक्तीची परंपरा होती. भक्त पुंडलिकाची मातृभक्ती आणि विठ्ठलभक्ती सर्वश्रुतच आहे. वारकरी पंथाने याच परंपरेला अधिक प्रशस्त बनवून महाराष्ट्राचे लोकजीवन पंढरीमय करून टाकले. पंढरपूर पाहिले नाही अथवा हे नाव माहीत नाही अशी व्यक्ती मराठी असूच शकत नाही, इतके हे नाव आपल्या मनात रुजलेले आहे, तनात भिजले आहे. यातूनच विठ्ठलभक्तीचा मळा महाराष्ट्राच्या मातीवर फुलला.

संत नामदेव तर पंढरीशी एवढे एकरूप होतात की, आधी पंढरपूर आणि नंतर वैकुंठ असा या क्षेत्राचा अगाध महिमा त्यांनी अधोरेखित केला. आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी । जेव्हा नव्हते चराचर । तै होते पंढरपूर ।’ असे म्हणून त्यांनी अवघ्या मराठी मनात या नगरीविषयीचा आदरयुक्त श्रद्धाभाव रुजवला. या दृष्टीने पाहता पंढरपूर हे महाराष्ट्र संस्कृतीचे केंद्रस्थान ठरते. मराठी संस्कृतीची ज्यावर मोहर उमटलेली आहे, अशा ज्या साहित्य आणि कलाविषयक मराठी शैली निर्माण झाल्या, जसे ओवी, अभंग, कीर्तन, जागरण गोंधळ, लोकनाट्य शाहिरी काव्य हे आपल्या मराठीपणाचे द्योतक आहे आणि हे सर्व संतपरंपरेतूनच आलेले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. या भक्ती परंपरेमुळेच वैश्विक पातळीवर महाराष्ट्राची एक वेगळी ओळख निर्माण झाली. असा हा आपला दिव्य वारसा पिढ्यान पिढ्या आपण जोपासत आलो आहोत, त्यामुळेच ‘अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोकी । जाईन गे माय तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया।’ संत ज्ञानदेवांच्या या उक्तीप्रमाणे सुखी संसाराची गाठ सोडून आषाढी आली की, मराठी माणसाला या माहेर भेटीचे वेध लागतात आणि त्यांचे डोळे विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर होतात, मग नकळतच ‘पाउले चालती पंढरीची वाट ।’ असे म्हणत मराठी माणूस आपल्या या माहेराकडे प्रस्थान करतो.

–डॉ. अशोक लिंबेकर