घरफिचर्ससारांशनिवृत्तीनाथांची गुरूसंस्था!

निवृत्तीनाथांची गुरूसंस्था!

Subscribe

मागील तीन लेखांत आपण संत निवृत्तीनाथांच्या वेगवेगळ्या कार्यांच्या पैलूंवर तसेच त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेतला होता. त्यातून निवृत्तीनाथांचे वारकरी संप्रदायात असलेले योगदान तसेच अध्यात्माकडे पाहण्याची त्यांची दृष्टी याचाही परामर्श घेतलेला आहे. दरम्यान, आजचा हा समारोपाचा लेख आहे. या लेखात निवृत्तीनाथांनी आपल्या सद्गुरु गहिनीनाथांबद्दल आणि एकूणच गुरुसंस्थेबद्दल ज्या काही भूमिका मांडल्या त्या भूमिकांचा या लेखांमध्ये मागोवा घेणार आहोत.

–प्रा.अमर ठोंबरे

नाथ संप्रदायात सद्गुरूंना अत्यंत मोलाचे असे स्थान आहे. तसे ते प्रत्येकच पंथात आपल्याला दिसते. परंतु ज्या त्या पंथाचा सद्गुरूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे. वारकरी भागवत धर्मात तो वेगळा आहे. आता निवृत्तीनाथांनी आपल्या सद्गुरूंकडे ज्या भूमिकेतून पाहिले आहे, ती भूमिका केवळ गुरूंच्या कृपादृष्टीची नाही तर स्वतः वैराग्याच्या अग्नीमध्ये निवृत्तीनाथ तापल्यामुळे सद्गुरूच्या आंतरिक ओढीने त्यांना गुरु गहिनीनाथ भेटले. हे त्यांचे स्वतःचे प्रतिपादन आहे.

- Advertisement -

कोणत्याही पंथीय परंपरेने गुरू संस्थेकडे जर आपण बघितलं तर त्या त्या पंथाची शिष्यपरंपरा ही प्रचंड उज्ज्वल आहे असे आपल्याला दिसते. याचा अर्थ असा की पंथीय परंपरेतील गुरुभक्ती ही समाजाचे एक विधायक अंग असते. केवळ शिष्य परंपरेची संख्या वाढवणे, हे कोणत्याही गुरुसंस्थेचे कर्तव्य नसतं तर आपल्या पंथाचा प्रचार करून समाज हिताच्या काही गोष्टी प्रसृत करणं हेही एक महत्त्वाचं धोरण त्यामध्ये दडलेलं असतं. निवृत्तीनाथांच्या समग्र कार्यावर जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर त्यातून एकच गोष्ट वारंवार ध्वनीत होते तीही की, स्वानुभवाचे बोल इतरांना सांगणे. केवळ उपदेशकच होऊन बाजूला होणे नव्हे तर साधकाचा अनुभव स्वत: घेऊन इतरांना तो वाटणे त्याचा आनंद इतरांना देणे, ही पंथीय भूमिका नाथ संप्रदायाने प्रथमत: मांडली नंतरच्या काळात गुरुभक्तीचं असलेलं वेगळेपण अनेक पंथांना समजलं. निवृत्तीनाथांकडे समकालीन संत ज्या दृष्टीने पाहतात ती दृष्टी गुरूचीच होय.

म्हणून ते केवळ ज्ञानदेवादी भावंडांचेच गुरू नव्हते, तर सकळ संत मेळ्याच्या गुरुस्थानी होते, असे म्हटले तरीही ते वावगे ठरणार नाही. कारण निवृत्तीनाथांच्या कार्याचा समग्र पट जेव्हा समोर उभा ठाकतो तेव्हा त्या कार्याच्या पाठीमागे असलेली प्रेरकशक्ती ही सद्गुरूंचीच आहे, असं वेळोवेळी त्यांचे अभंगगाथेतून आपल्याला जाणवतं. निवृत्तीनाथ हे कोणताही अनुभव हा कोरडेपणाने सांगत नाहीत, तर त्यात ते समरसून जातात. मग तो कृष्णभक्तीच्या बाललीलांतला अनुभव असो, गुरू महिमा असो की नामसंकीर्तन असो या सार्‍या प्रांतात निवृत्तीनाथ मनमुराद रमतात.

- Advertisement -

मुळात संतांची भूमिकाच ‘शहाणे करून सोडावे सकळजन’ ही असल्याने आपले कोणतेच अनुभव संत स्वत:पासून लपवत नाहीत. खुलेपणाने हे अनुभव ते जगाला वाटतात. संतांचे नामसंकीर्तन हे आजच्या आधुनिक सत्संगाप्रमाणे मध्ययुगातही होतं. नामसंकीर्तन हे त्याचंच एक रूप होय. तर निवृत्तीनाथांची गुरूसंस्था याविषयी आपण बोलत आहोत, निवृत्तीनाथ गुरुकडे बघताना स्वत:च्या भूमिकेवर ठाम आहेत इतर पंथीयांनी वर्णिलेले गुरूंचे गुणगान त्यांना मान्य नाही ते आपल्या अभंगात म्हणतात,

‘आम्हा हेचि थोर सद्गुरु विचार
नलगे संप्रधार नाना मते’
नेघो ते काबाड न करू विषय
ब्रम्हांड हे होय आत्माराम.
( निवृत्तीनाथ अभंगगाथा १३९)

जसं तुकोबाराय वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, असे म्हणतात, तेव्हा अर्थाचा गलबला त्यांना नको होता, प्रत्यक्ष ईश्वरसुखाचा आनंद हेच त्यांचे ध्येय होते आणि ते त्यांनी अनुभवले होते. त्याचे ते भोक्ते होते. हीच भूमिका गुरुकडे पाहण्याची निवृत्तीनाथांची आहे. नाना संप्रदायांनी प्रतिपादिलेले गुरुबद्दलचे दृष्टिकोन आम्हाला नकोच आहेत. कारण गुरूने दिलेल्या विचारांमुळेच आम्ही आत्मसुखाचा आनंद घेऊ शकतो आणि ब्रम्हांडच आत्मरूप झाल्याचा स्वानुभव आमचा आहे, असे ते आत्मप्रचीतीने सांगतात. थोडक्यात गुरूचे केवळ कोरडे गुणगान करण्यात ते धन्यता मानत नाहीत, तर गुरुची आत्मानुभूती हीच आपली झाली आहे ही ग्वाही ते देतात.

निवृत्तीनाथांच्या या सद्गुरू विचारांकडे बघितल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, कोणताही शिष्य हा गुरुकडे रांगा लावून त्याचा अनुयायी बनत नाही तर शिष्याकडे असलेली योग्यता त्याच्या मनात निर्माण झालेलं वैराग्य, अनुताप या गोष्टी आपोआपच त्याला जिज्ञासू बनवतात. आणि निवृत्तीनाथांचा पिंड संतत्वाचा आहे. आपल्या परंपरेने आलेले संस्कार त्यांच्यात उतरलेले आहेत. म्हणूनच नाथ संप्रदायाच्या या गुरुपरंपरेने समर्थ अशी एक शिष्य परंपरा घडवली. निवृत्तीनाथ त्याचे पहिले पाईक तर ज्ञानदेवांसारखे उत्तुंग प्रतिभेचे तत्वज्ञ संतकवी हे याच परंपरेतील अर्थात निवृत्तीनाथांचे शिष्य होय. त्यांच्याही गुरुभक्तीने अनेकांच्या जीवनात ‘मोगरा फुलला’ हे अभिमानाने सांगावे लागेल.समारोपाच्या या लेखात निवृत्तीनाथांची गुरुभक्ती याविषयी आपण पाहिले.

पुढच्या महिन्यात अर्थात दोन जूनला निवृत्तीनाथांचा आषाढी पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत आहे, यंदाच्या वर्षी प्रथमच पालखीच्या रूपाने निवृत्तीनाथ आपल्या गुरूंच्यास्थानी गहिनीनाथांच्या मठात स्थिरावणार आहेत. वारकर्‍यांच्या मनात याविषयी नितांत आदर आहे. या ठिकाणी मुद्दामहून पालखी सोहळ्याचा उल्लेख निवृत्तीनाथांच्या लेखाचे औचित्य साधून केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -