घरफिचर्ससारांशपंकज उधास आणि कमलेश अवस्थी!

पंकज उधास आणि कमलेश अवस्थी!

Subscribe

अभिजन वर्गापर्यंत सीमित असलेली गझल पंकज उधास यांनी तळागाळातील, कनिष्ठ वर्गापर्यंत (मासेसपर्यंत) पोहचवली. त्यांची गझल शराब-शबाब-साकी-मैकदा यांनी बद्ध असल्यामुळे त्यांच्यावर टीकादेखील झाली, पण पंकज यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. २८ मार्च रोजी पार्श्वगायक डॉ. कमलेश अवस्थी यांनी अहमदाबाद इथं अखेरचा श्वास घेतला. त्यांनी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं, मात्र गुजराती चित्रपटसृष्टीतले ते लोकप्रिय गायक होते.

-प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार

१९८० ते १९९० या दशकात गझलसम्राट म्हणून लोकप्रिय झालेले गायक म्हणजे पंकज उधास. गझल ऐकायची सवय पंकज उधास यांच्यामुळेच आमच्या पिढीला लागली, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कालांतराने गझल गायकीतल्या गुलाम अली, मेहंदी हसन, जगजितसिंह, तलत अझीज, हरिहरन अशा दिग्गजांची ओळख झाली, पण हाफ चड्डीतून फुल पँटमध्ये आलेल्या आमच्या पिढीला गझलची गोडी लावण्याचं श्रेय जातं ते केवळ पंकज उधास यांनाच.

- Advertisement -

ज्याप्रमाणे अशोक कुमार, किशोर कुमार आणि अनुप कुमार हे तिघे भाऊ अभिनयाच्या क्षेत्रात वावरले तद्वतच पंकज, मनहर आणि निर्मल ह्या तिन्ही उधास बंधूंनीही एकच म्हणजे गायनाचं क्षेत्र निवडलं. यापैकी मनहर उधास यांना पार्श्वगायक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत बर्‍यापैकी यश मिळालं. पंकज आणि मनहर यांच्या तुलनेत निर्मल उधास मात्र तितकेसे प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत. विशेष म्हणजे पंकज आणि मनहर यांच्या आवाजाची जातकुळी एकसारखीच!

शालेय विद्यार्थी असताना पंकज उधास यांची एक गझल फार लोकप्रिय झाली होती. रेस्टॉरंट्स, पानाची दुकाने, सलून सेंटर्स, ऑडिओ कॅसेट्सची दुकाने इथे ती सतत ऐकू यायची. ती गझल म्हणजे -‘जिस दिन से जुदा वो हमसे हुए… इस दिल ने धडकना छोड दिया, ऐ चांद का मुह उतरा उतरा.. तारोने चमकना छोड दिया…’ मला ही गझल त्या वयात खूप आवडली होती, पण ही गझल कोणत्या अल्बममधील (कॅसेट) आहे हे मात्र ठाऊक नव्हतं. मग कॅसेट्स दुकानदाराला या गझलच्या आठवत असलेल्या ओळी सांगितल्या नि ही कॅसेट खरेदी केली.

- Advertisement -

‘आफरीन’ हे या कॅसेटचं नाव. (दोन दशकांनंतर उस्ताद नुसरत फतेह अलीखान यांचा याच नावाचा अल्बम आला.) यातल्या इतरही गझल तेव्हा आवडल्या होत्या. इक तरफ उसका घर इक तरफ मैकदा…, हुई महेंगी बहुत ही शराब…, निकलो ना बेनकाब जमाना खराब हैं…, जब घीर के आई काली घटा…, ला पिला दे साकीया…, इश्क नचाए जिसको यार… ह्या सार्‍या गझल तेव्हा फार ऐकाव्याशा वाटायच्या. आयुष्यात पंकज उधास यांची खरेदी केलेली पहिली आणि शेवटची कॅसेट!

अभिजन वर्गापर्यंत सीमित असलेली गझल पंकज उधास यांनी तळागाळातील, कनिष्ठ वर्गापर्यंत (मासेसपर्यंत) पोहचवली. त्यांची गझल शराब-शबाब-साकी-मैकदा यांनी बद्ध असल्यामुळे त्यांच्यावर टीकादेखील झाली, पण पंकज यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी सारं अवधान आपल्या गायकीवरच केंद्रित केलं. त्यांनी कधी आपली बाजू जाहीरपणे मांडली नाही.

ऐनकेन प्रकारे प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची त्यांची वृत्ती नव्हती. ते लोकप्रिय गझल गायक होत असतानाच त्यांना हिंदी सिनेमात पार्श्वगायन करण्याच्या संधी प्राप्त व्हायला सुरुवात झाली. महेश भट्ट यांच्या ‘नाम’ चित्रपटातल्या ‘चिठ्ठी आई है…’ ने भारतात घराघरात पोहचून विदेशातल्या तमाम अनिवासी भारतीयांच्या मनाच्या कोपर्‍यात अलगद जाऊन ते विसावले.

पंकज उधास यांची ना कजरे की धार… (मोहरा), आज फिर तुम पे… (दयावान), और भला क्या मांगू मै रब से… (थानेदार), महोब्बत, इनायत करम देखते है… (बहार आने तक), माहिया तेरी कसम… (घायल), खुदा करे महोब्बत मे… (रघुवीर), एक पल, एक दिन… (जिगर), एक पेग हो जाए… (गंगा जमुना सरस्वती), जिए तो जिए कैसे (साजन) अशी चित्रपटगीतंही लोकप्रिय झाली. शिवाय चांदी जैसा रंग है तेरा…, मोहे आई न जन की लाज…, दिवारो से मिलकर रोना…, आप जीनके करीब होते है…, और आहिस्ता किजीए बाते… अशा लोकप्रिय गझल कशा विसरता येतील. त्यांच्या जाण्यानं लोकप्रिय गझल गायकीचं पर्व (गेल्या २४ फेब्रुवारीला) संपलं.

२८ मार्च रोजी पार्श्वगायक डॉ. कमलेश अवस्थी यांनी अहमदाबाद इथं अखेरचा श्वास घेतला. त्यांनी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं, मात्र गुजराती चित्रपटसृष्टीतले ते लोकप्रिय गायक होते. त्यांचा जन्म १९४५ मध्ये गुजरातमधल्या सावरकुंडला या गावात झाला. त्यांनी आपलं शिक्षण एम.एस्सी., पीएचडी. भावनगर विद्यापीठातून पूर्ण केलं होतं. भावनगर इथल्याच भरभाई पंड्या यांच्याकडून त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं.

पार्श्वगायक मुकेश हे त्यांचे आदर्श होते. त्यामुळे ते मुकेश यांच्याच शैलीत गायचे. त्यांनी आपला गाण्यांचा पहिला अल्बम ‘ट्रीब्यूट टू मुकेश’ या नावाने काढला. यात त्यांनी मुकेश यांनी गायलेली गाणी आपल्या आवाजात सादर केली. ही गाणी श्रोत्यांना फार आवडली. परिणामी ‘व्हाईस ऑफ मुकेश’ म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. मुकेशसारखा आवाज हे त्यांच्या आवाजाचं वैशिष्ठ्य होतं. विख्यात निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता राज कपूर अभिनित ‘गोपीचंद जासूस’ चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्याची संधी त्यांना लाभली.

त्यांच्या आवाजातली गाणी ऐकून राज कपूर फार खूश झाले. देशाला मुकेश पुन्हा एकदा प्राप्त झाला, अशा शब्दांत त्यांनी कमलेश यांचं कौतुक केलं होतं, पण असं असूनही राज कपूरने त्यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करण्याची संधी मात्र दिली नाही. ‘स्कूल ऑफ मुकेश’चं प्रतिनिधित्व करणार्‍या नि संगीताचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेल्या मराठमोळ्या सुरेश वाडकरांचा आवाज राजने आपल्या (प्रेमरोग, राम तेरी गंगा मैली, हीना) चित्रपटांसाठी वापरला.

कमलेश अवस्थी यांनी गायलेल्या जिंदगी इम्तिहान लेती है…(यात लताच्या आवाजाची आठवण करून देणार्‍या सुमन कल्याणपूर व रफीच्या शैलीत गाणारा अन्वर यांनी साथ दिलीय. चित्रपट-नसीब), तेरा साथ है तो मुझे क्या कमी है…(प्यासा सावन) ह्या दोन गाण्यांना बर्‍यापैकी लोकप्रियता मिळाली. त्यांच्या आवाजातल्या मुकेशच्या गाण्यांना श्रोत्यांकडून खूप प्रतिसाद मिळायचा. त्यांचे समकालीन ऑर्केस्ट्रा गायक बाबला मेहता हेदेखील व्हाईस ऑफ मुकेश म्हणून ओळखले जातात, मात्र जाणकारांच्या मते बाबला यांच्यापेक्षा अवस्थी यांचा आवाज मुकेशशी साधर्म्य असणारा होता.

दस्तुरखुद्द मुकेश यांचा मुलगा गायक नितीन मुकेशवरसुद्धा वडिलांचा प्रभाव दिसतो. शिवाय पंकज उधास यांचे बंधू मनहर उधास यांचेही आदर्श मुकेशच! नितीन मुकेशला मनहर उधास यांच्या तुलनेत थोड्या अधिक संख्येने हिंदी चित्रपटगीतं गायला मिळालीत. कमलेश अवस्थी आणि नितीन मुकेश यांच्या गायकीत मुकेश यांच्या शैलीची नक्कल प्रतीत होते, तर मनहर उधास यांच्या आवाजात नक्कल जाणवत नाही. त्यांचा स्वत:चा आवाज वाटतो. गझलसम्राट म्हणून प्रसिद्ध झालेल्या पंकज उधास आणि हिंदीत फारशी प्रसिद्धी न मिळालेल्या ‘व्हाईस ऑफ मुकेश’ डॉ. कमलेश अवस्थी यांना भावपूर्ण आदरांजली!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -