धन की बात!

Subscribe

विनाकष्टाचे असे कुणालाही काहीही मिळत नसते आणि या जगात काहीही विनामूल्य उपलब्ध नाही. हवेचेसुद्धा पैसे मोजावे लागतात. आपण जी वाहने वापरतो त्यासाठी आवश्यक असलेली हवा मोफत नाही. पिण्याचे पाणी अनेकदा दहा रुपये प्रतिलिटरने विकत घ्यावे लागते. प्रदूषित हवेची किंमत महागाची औषधे घेऊन मोजावी लागते. यासाठी प्रत्येक साक्षर माणसाने वर्षातून एकदा तरी आपले उत्पन्न आणि खर्च यांचा आढावा घ्यायला हवा. आर्थिक वर्षातील हा पहिला म्हणजे एप्रिल महिना त्यासाठी महत्त्वाचा आहे.

-योगेश पटवर्धन

एप्रिल महिना लागला की पहिल्या दिवशी काहीतरी लोणकढी थापा मारून मित्रांना फसवणे आणि दुरून त्यांची फजिती पाहणे यात असुरी नाही पण बालसुलभ आनंद असायचा. त्या थापा सुचणे आणि निरागस भाबडा भाव चेहर्‍यावर ठेवून मित्राला सांगणे ही अभिनयाची प्राथमिक कार्यशाळा असायची तेव्हा! आज अमुक सर सिनेमाचे, सर्कसचे पास देणार आहेत किंवा तमुक विषयाचा पेपर शाळेचा शिपाई देणार आहे, हवा असेल तर त्या चौकात येऊन उभा राहा असले काहीतरी ते असायचे.

- Advertisement -

मुख्य विषय हा नाही. भारतात मध्यमवर्ग ५० टक्के आणि उरलेल्या ५० टक्क्यांत अतिश्रीमंत आणि अतिगरीब आहेत. ते प्रमाण नेमके किती यावर मतभेद होतील. आपण आज फक्त मध्यमवर्गाचा विचार करायला हरकत नसावी. मध्यमवर्गाचे अर्थशास्त्र कसे असावे याची चर्चा वर्षातून एकदा तरी करायला हवी. त्या अर्थाने भारतीय अर्थविश्वाचा चैत्री पाडवा म्हणजे एक एप्रिल. याविषयी थोडे अधिक सविस्तर.

भारतीय फारसे अर्थसाक्षर नाहीत हे वास्तव आहे. त्यामुळे आजवर केवळ शाब्दिक भूलथापा देऊन लाखो लोकांना हजारो कोटी रुपये गमावण्याची वेळ आली आहे. गुंतवणुकीवर आश्वासनांच्या स्वरूपात मिळणारा अवास्तव परतावा ही लालसा फसवणुकीच्या जाळ्यात शिरण्याचा राजमार्ग आहे. राष्ट्रीय बँका अथवा पोस्ट खाते जे व्याज देऊ शकत नाही तेवढे किंवा त्यापेक्षा आधिक कुणी खासगी व्यक्ती अगर संस्था देईल हे संभव नाही.

- Advertisement -

असे अधिकचे व्याज एक दोनदा मिळते आणि भांडवल कायमचे बुडते. अशी हजारो प्रकरणे पोलीस दप्तरी आहेत. विश्वास कोणावर ठेवावा हे पोलीस खाते सांगत नाही. काही वेळा आरोपी पकडले जातात, पण हे गुन्हे फौजदारी कायद्याच्या दृष्टीने गंभीर या स्वरूपाचे नसल्याने जामीन मिळतो आणि खटले वर्षानुवर्षे रेंगाळतात. बुडालेल्या पैशांतील एक रुपयाही कुणाला आजवर मिळालेला नाही आणि गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा भोगण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

विनाकष्टाचे असे कुणालाही काहीही मिळत नसते आणि या जगात काहीही विनामूल्य उपलब्ध नाही. हवेचेसुद्धा पैसे मोजावे लागतात. आपण जी वाहने वापरतो त्यासाठी आवश्यक असलेली हवा मोफत नाही. पिण्याचे पाणी अनेकदा दहा रुपये प्रतिलिटरने विकत घ्यावे लागते. प्रदूषित हवेची किंमत महागाची औषधे घेऊन मोजावी लागते. यासाठी प्रत्येक साक्षर माणसाने वर्षातून एकदा तरी आपले उत्पन्न आणि खर्च यांचा आढावा घ्यायला हवा. आर्थिक वर्षातील हा पहिला म्हणजे एप्रिल महिना त्यासाठी महत्त्वाचा आहे.

व्यक्ती नोकरदार, व्यापारी अगर निवृत्तीवेतनधारक असला आणि त्याचे उत्पन्न समान नसले तरीही अनेक खर्च साधारण सारखेच असतात. अपरिहार्य खर्च म्हणजे रोजच्या लागणार्‍या वस्तू, सेवा आणि अन्नपदार्थ असे काही. आपला मासिक खर्च १०० रुपये असेल तर उत्पन्न हवे १२० रुपये. म्हणजेच आपला खर्च हा उत्पन्नापेक्षा नेहमीच कमी असायला हवा. याचा अर्थ प्रत्येक गोष्टीत काटकसर करणे अथवा इच्छा मारणे, सतत पैशांचा विचार करणे, काळजी करणे, पै पैचा हिशोब ठेवणे असा मुळीच नाही. त्या पैशांचे करायचे असते ते नियोजन. त्यासाठी आपण नेमके कशासाठी खर्च करतो याची यादी पाहिली तर २० प्रकारचे खर्च अटळ आहेत.

दूध, किराणा, भाजीपाला, औषधे, इस्तरी, पेपर, घरकामाच्या माणसांचे वेतन, पेट्रोल, बसभाडे, हाऊस टॅक्स, पाण्याचे बिल, विजेचे बिल, शिक्षण, छंद वर्ग, हॉटेलिंग, भेटवस्तू, वाढदिवस, शॉपिंग, मेंटेनन्स, गॅस सिलिंडर अशा त्या खर्चाच्या २० खिडक्या आहेत. यातील काही खर्च दर महिन्याला नसले तरी त्याचेही नियोजन करता येते. उदाहरण म्हणजे गॅस सिलिंडर. ते दोन महिने पुरते म्हणून त्याचा मासिक खर्च ५०० रुपये गृहीत धरायला हवा. पैसा हा खर्च करण्यासाठीच आहे. त्या खर्चाचे समाधान मिळवायचे असेल तर नियोजन आवश्यक आहे. ते असेल आणि

त्याप्रमाणे आर्थिक शिस्त बाळगली तर कुणावरही कर्ज काढण्याची वेळ येणार नाही. आजची तरुण पिढी अवाजवी कर्जाच्या विळख्यात सापडली आहे. चांगल्या पगाराच्या नोकर्‍या आहेत म्हणून घरासाठी, गाडीसाठी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते हे एका सामान्य माणसाच्या मासिक मिळकतीपेक्षा अधिक आहेत. सगळी भौतिक सुखे मला संसारात पाऊल ठेवलं की लगेच मिळायला हवीत ही मानसिकता तरुण वयात अनेक गंभीर आजारांना कारण ठरत आहे.

ज्या ५०-६० लाखांच्या हजार चौरस फूट जागेसाठी नोकरी गहाण ठेवली आहे, जी आजच्या काळात शाश्वत नाही, अशा घरात माझे वास्तव्य केवळ रात्रीच्या झोपेपुरते आहे. त्यासाठी किती कर्जबाजारी व्हायचे? अशी अवस्था मोठ्या शहरात घरोघरी पाहायला मिळते. घर आणि कामाचे ठिकाण विरुद्ध टोकाला. आठ तास नोकरी आणि तीन-चार तास महागर्दीतून उबग आणणारा प्रवास.

अशा नव्या घरात जुने पलंग, लोखंडी घडीच्या खुर्च्या, लाकडी सोफे, मळखाऊ तपकिरी पात्यांचे पंखे, चार फुटी ट्यूब लाईट, दळणाचे डबे, पोचे आलेल्या कळशा, हांडे, किक मारून सुरू होणारी दुचाकी आणि नाडीचा लेंगा वापरणारे वडील, नऊवारी लुगडे नेसणारी आई हे सगळे जुने वाटू लागल्याने अधिक कर्ज घेऊन अंतर्गत सजावट करणे आवश्यक असते. त्यासाठी प्रमोशन हवे किंवा पुण्याहून मुंबईला, मुंबई सोडून दिल्लीला, तिथे पटले नाही तर चेन्नई, बंगलोरचे पॅकेज मिळवण्यासाठी धावाधाव. वरून एकाच ठिकाणी घासत बसायचा हा जमाना नाही, प्रमोशन द्या नाहीतर राम राम… मी चाललो दुसरीकडे (कर्ज फेडायला) हा बाणा.

स्वत:च्या चारचाकी गाडीने कामावर जाणे यात आता सुख, सोय, वेळेची बचत अथवा रूबाब राहिलेला नाही. त्यात मानसिक ताण, कष्ट, खर्च आणि जोखीम याचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहचले आहे. एक चारचाकी वाहन बाळगणे म्हणजे एका व्यक्तीला सांभाळण्याएवढा आर्थिक बोजा आहे याचे भान असायला हवे.

उत्पन्न आणि खर्च याचे प्रमाण नेहमीच व्यस्त असणार आहे. त्यासाठी नियोजन आवश्यक असते. चार दिवसांच्या सहलीसाठी आपण जगप्रवासाला निघाल्यासारखी तयारी करतो. अगदी नेलकटरसुद्धा असल्यास बरे असे वाटते. मग जीवन प्रवासाची तयारी, नियोजनसुद्धा तसेच सजगतेने व्हायला हवे. जगायचे आहे ते खर्च करण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी मुळीच नाही, यासाठी एप्रिलचे हे फूल खास माझ्या वाचकांसाठी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -