घरफिचर्ससारांशशून्य मशागत तंत्रज्ञान काळाची गरज

शून्य मशागत तंत्रज्ञान काळाची गरज

Subscribe

मशागतीचा अतिरेक झाला तर निश्चित त्याचा वाईट परिणाम मानवाला सहन करावा लागणार आहे यात शंका नाही. मग मशागतीला पर्याय काय? ज्या ठिकाणी मशागतीची आवश्यकता नाही ती मशागत आपण कमी करू शकतो किंवा ज्या ठिकाणी मशागत न करताही पुढील पिकाची लागवड करणे शक्य आहे तिथे शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण पीक उत्पादन घेऊ शकतो. वेगवेगळ्या मशागती करून खूप मोठ्या प्रमाणात पिकाचे उत्पादन तर घेतले जाते, पण मातीचे आरोग्य मात्र बिघडत चालले आहे. शून्य मशागतीबाबत शेतकर्‍यांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.

-डॉ. विशाल गमे

आजकाल कोणत्याही पिकाचे उत्पादन घ्यावयाचे असल्यास अगोदर जमिनीची चांगली मशागत करणे नित्याचे झाले आहे. मग त्यामध्ये नांगरणी करणे, वखरणी करणे तसेच काही यंत्राद्वारे मातीची उलटापालट केली जाते. पिकाच्या एकूण उत्पादन खर्चामध्ये मशागतीवरील खर्चाचा मोठा वाटा आहे. मशागत करण्याचे अनेक फायदे असले तरी अलीकडच्या काळात मशागतीचा अतिरेक होताना दिसत आहे.

- Advertisement -

आजकाल नवनवीन आणि मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने मशागत करणे म्हणजे प्रगतशील शेती असे जणू समीकरण करून टाकले आहे, पण वास्तविक तसे अजिबात नाही. जसजसे मोठमोठे यंत्र विकसित झाले तसे माणसाने मातीच्या उलथापालथीचा वेग वाढवला आहे आणि त्याचा फटका कळत नकळत मातीच्या सुपीकतेवर व पर्यायाने पिकाच्या उत्पादनावर होताना दिसत आहे. मशागतीचा अतिरेक केल्याने जमिनीवर त्याचे वाईट परिणाम दिसायला सुरुवात झाली आणि भविष्यात अशाच पद्धतीने जर मशागतीचा अतिरेक झाला तर निश्चित त्याचा वाईट परिणाम मानवाला सहन करावा लागणार आहे यात शंका नाही.

मग मशागतीला पर्याय काय? ज्या ठिकाणी मशागतीची आवश्यकता नाही ती मशागत आपण कमी करू शकतो किंवा ज्या ठिकाणी मशागत न करताही पुढील पिकाची लागवड करणे शक्य आहे तिथे शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण पीक उत्पादन घेऊ शकतो. वेगवेगळ्या मशागती करून खूप मोठ्या प्रमाणात पिकाचे उत्पादन तर घेतले जाते, पण मातीचे आरोग्य मात्र बिघडत चालले आहे. शून्य मशागतीबाबत शेतकर्‍यांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

शून्य मशागत म्हणजे विनामशागत लागवड होय. म्हणजेच कोणत्याही प्रकारची मशागत जसे की नांगरणी, वखरणी, कुळवणी न करता पुढील पिकाची लागवड करणे होय. फक्त पेरणी किंवा लागवड करण्यासाठी पुरेशी जमीन खोदून त्यात पेरणी अथवा लागवड करावी. यामध्ये पेरणीची योग्य पद्धत, खत व पाण्याचे व्यवस्थापन ह्या बाबी महत्त्वाच्या ठरतात. पीक काढल्यानंतर कुठल्याही प्रकारची खास मशागत न करता उपलब्ध ओलीवर पुढील पिकाची लागवड करावी.

कमी कालावधीचे पीक लावल्यास कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवता येते. यामुळे मशागतीवर होणारा खर्च कमी होतो व त्यामुळे निव्वळ नफ्यात वाढ होते. मजुरीवर होणारा खर्चही कमी होतो. तसेच पूर्वीच्या पिकातील अवशेष, पालापाचोळा व जमिनीतील ओलाव्याचा योग्य वापर करता येऊ शकतो. उपलब्ध ओलीवर पेरणी केल्यास पाण्याची बचत होते व ओलिताखालील क्षेत्रात वाढ होते. मातीची व पाण्याची धूप कमी होते.

जमिनीतील सेंद्रिय पदार्थांची वाढ होते व जमिनीची सुपीकता वाढते. शून्य मशागत तंत्रज्ञानात योग्य पिकाची निवड करणे महत्त्वाचे ठरते. कमी पाण्यात येणारी व कमी कालावधीची पिके फायदेशीर ठरतात. कडधान्य पिकाची निवड केल्यास जमिनीचा पोत सुधारतो व सुपीकता वाढण्यास मदत होते. ह्या पिकांच्या मुळावर रायझोबियमच्या गाठी असतात, ज्या हवेतील नत्र शोषून जमिनीत नत्राचा साठा वाढवतात. यासाठी चवळी, मूग, कुळीथ, वाल किवा उडीद या पिकांची निवड करावी.

पूर्वीचे पीक काढल्यानंतर त्या जमिनीतील तण नियंत्रण करण्यासाठी ग्लायफोसेटसारखे बिननिवडक तणनाशक पाण्यातून फवारावे. त्यानंतर ४-५ दिवसांनी पुढील पिकाची टोकण पद्धतीने पेरणी करावी. खुरप्याने किंवा लाकडी ठोंब्याच्या मदतीने जमिनीत विशिष्ट खोलीवर छिद्र पाडावे. त्यामध्ये प्रथम खत टाकून झाकावे व नंतर बियाणे पेरावे. अशा पद्धतीने योग्य रीतीने पेरणी करून खते दिल्यास बियाण्यांची उगवण चांगली होते. पाण्याची व्यवस्था असल्यास ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा.

पिकाच्या अतिसंवेदनशील काळात पाणी देणे आवश्यक असते. शक्यतो पीक फुलोर्‍यात असताना व शेंगा, दाणे भरण्याच्या काळात पाणी दिल्यास अधिक उपयुक्त ठरते. आंतरमशागत २-३ आठवड्यांनंतर एक कोळपणी व गरज असल्यास एक झांबडनी करावी. साधारणत: ३ महिन्यांनंतर पिकाची तोडणी केल्यावर झाडे न उपटता नांगरट करावी म्हणजे झाडाची मुळे, खोड, फांद्या व पाने जमिनीत गाडल्यास ती कुजतात व त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.

अशा प्रकारे शून्यमशागत तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास व योग्य पद्धतीने खत व पाणी व्यवस्थापन केल्यास कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवता येते. जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत होते. हे तंत्रज्ञान सर्वच पिकांमध्ये फायदेशीर ठरेल असेही नाही, परंतु जिथे शक्य असेल त्या पिकांमध्ये आपण हे तंत्रज्ञान अवलंबू शकतो. पारंपरिक तसेच कमी कालावधीच्या पिकांसोबतच फळपिकांमध्येसुद्धा शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास त्याचा फायदा होतो.

शून्य मशागत पद्धतीचा वापर केल्याने मातीचा पृष्ठभाग विस्कटला जात नाही. मातीच्या पृष्ठभागाखाली पाणी झिरपण्यास मदत होते. शून्य मशागत केलेल्या शेतांमध्ये कार्बन अधिक साठून राहण्यास मदत होते. शून्य मशागतीमुळे सेंद्रिय कर्बाची उपलब्धता आणि ओलावा टिकून राहिल्याने मातीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते. त्याचप्रमाणे पूर्वीच्या पिकाची मुळे जमिनीत राहिल्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जलद गतीने वाढते.

त्यामुळे काही प्रमाणात का होईना पण रासायनिक खताची बचत होते. जमिनीची वारंवार उलथापालथ थांबल्याने विपुल प्रमाणात जमिनीमध्ये गांडूळांचा संचार सुरू होतो. जमिनीत जैविक विविधतेत वाढ होऊन मातीचे आरोग्य सक्षम होते. त्याचबरोबर जमिनीची धूप कमी होणे, तापमान नियंत्रित राहणे तसेच जमिनीत पिकाच्या मुळाशी वायू आणि पाणी यांचे प्रमाण संतुलित राहणे असेही फायदे अनुभवायला मिळतात आणि महत्त्वाचे म्हणजे मशागत खर्च कमी होऊन उत्पादन खर्चामध्ये मोठी बचत होते.

-(लेखक नाशिक येथील म. वि. प्र. कृषी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -