घरफिचर्ससारांशज्युनियर आर्टिस्टची कथा- टिकू वेड्स शेरू

ज्युनियर आर्टिस्टची कथा- टिकू वेड्स शेरू

Subscribe

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांचा ‘टिकू वेड्स शेरू’ हा चित्रपट नुकताच अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. त्यात नवाज एका ज्युनियर आर्टिस्टच्या भूमिकेत आहे. हा एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट असून वेगवेगळ्या ड्रामाने भरलेला मसालापट आहे.

— आशिष निनगुरकर

बॉलिवूडचे नाव घेताच या इंडस्ट्रीशी निगडित अनेक बड्या कलाकारांचे चमकदार आयुष्य आठवते, मात्र या कलाकारांना स्टार बनवण्यामागे अशा अनेक लोकांचा हात आहे, जे कॅमेर्‍यामागे राहतात. बर्‍याच चित्रपटांमध्ये आपण मोठ्या संख्येने एक्स्ट्रा कलाकार (ज्युनियर आर्टिस्ट) बघतो. कलाकारांच्या बॅकग्राऊंडवर मालमत्ता म्हणून वापरल्या जाणार्‍या या ज्युनियर आर्टिस्टचे जीवन अडचणींनी भरलेले आहे. मुंबईत एका छोट्याशा खोलीत चादर पांघरून झोपणार्‍या प्रत्येक ज्युनियर कलाकाराचे स्वप्न मोठ्या पडद्याचा सुपरस्टार बनण्याचे असते, पण हे स्वप्न काही मोजकेच लोक पूर्ण करू शकतात. अशाच एका ज्युनियर आर्टिस्टची कथा आहे ‘टिकू वेड्स शेरू’. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांचा व कंगना राणावत निर्मित हा रोमकॉम चित्रपट प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे.

- Advertisement -

या चित्रपटाची कथा टिकू आणि शेरू या दोन मनोरंजक पात्रांभोवती फिरते. शेरू हा मुंबईत राहणारा एक ज्युनियर आर्टिस्ट आहे, जो त्याच्या ओव्हर अभिनयामुळे प्रत्येक सीनमध्ये बदलला जातो. हा अभिनेता या शहरात टिकून राहण्यासाठी अनेक चुकीच्या गोष्टी करतो. दिग्दर्शक होण्याचे त्याचे स्वप्न असले तरी ज्युनियर आर्टिस्टपेक्षाही त्याची ओळख ‘पिंप’ अशी आहे, जो त्याचा मित्र आनंदसोबत (मुकेश एस भट्ट) श्रीमंत आणि मोठ्या राजकीय नेत्यांना मुली पुरवतो. शेरूला सिनेसृष्टीत यश मिळत नसल्याने तो वाईट धंद्यांचा अवलंब करतो. तसेच सिनेनिर्मिती करण्याच्या उद्देशाने तो कर्ज काढतो, पण त्याचे नुकसानच अधिक होते.

शेरूचं लग्नाचं वय झाल्याने त्याच्याकडे टिकूचं स्थळ येतं. या लग्नामुळे त्याला १० लाख रुपये मिळणार असतात. टिकू आणि शेरू दोघेही या लग्नासाठी तयार होतात. मुंबईत येऊन अभिनेत्री होण्याचं स्वप्न टिकू पाहते. लग्नानंतर ते मुंबईत येतात आणि शेरूच्या लक्षात येतं की टिकूचा बॉयफ्रेंड असून त्याने तिला फसवलं आहे आणि आता ती प्रेग्नंट आहे. यादरम्यान त्याला आणखी एक मोठा धक्का बसतो. आता टिकू आणि शेरूच्या आयुष्यात कसले वादळ येते, खोट्याच्या पायावर बांधलेले हे नाते जास्त काळ टिकेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘टिकू वेड्स शेरू’ हा सिनेमा पाहावा लागेल.

- Advertisement -

‘टिकू वेड्स शेरू’ हा त्या चित्रपटांपैकी एक आहे, ज्याच्या सुरुवातीच्या १५ मिनिटांनंतर या कथेचा शेवट काय होईल हे सांगते. स्क्रिन प्ले आणि लेखन हे अगदी प्रेडिक्टेबल आहे. दिग्दर्शकाने आपल्या परीने प्रयत्न केले असले तरी प्रेक्षक या कथेशी जोडलेले राहतात, पण ते खूप अवघड आहे. असे चित्रपट आहेत ज्यात मुलींना नायिका बनण्याची संधी देण्याचे आश्वासन देऊन त्यांना वेश्याव्यवसायास कसे भाग पाडले जाते, हा प्रकार आपण वर्षानुवर्षे पाहत आहोत. कथेचे कथानक म्हणून ‘टिकू वेड्स शेरू’ ही संकल्पना चांगली होती, पण चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन कंटाळवाणे बनवते. शेरूच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकीने आपले शंभर टक्के योगदान दिले आहे. नवाजने शेरूचा खोटा स्वॅग, इंग्रजी बोलण्याचा अभिनय, कुटुंबाला आनंदी ठेवण्याची शेरूची धडपड अतिशय प्रभावीपणे मांडली आहे.

अवनीत कौरही तिच्या भूमिकेत छान आहे, पण नवाजुद्दीन, अवनीतभोवती फिरणारी ही कथा इतर पात्रांना फारसे महत्त्व देत नाही. तरीही झाकीर हुसेन, मुकेश एस. भट्ट, विपिन शर्मा आणि इतर कलाकार त्यांच्या भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी हाच या चित्रपटाचा खरा नायक आहे. संगीताचा विचार केला तर ही गाणी काही विशेष करीत नाहीत, पण चित्रपटाचे शेवटचे गाणे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देऊन जाते. एडिटिंग टेबलवरील या चित्रपटावर अधिक मेहनत घ्यायला हवी होती.आज कुठलाही कलाकार यशस्वी होतो तेव्हा त्याला स्टारडम मिळते. कलाकारांचे चाहते अनेक असतात आणि संपूर्ण जग त्यांच्यावर प्रेम करायला लागते, परंतु या फिल्मी दुनियेचे दुसरे रूपदेखील आहे.

सुरुवातीच्या काळात जेव्हा ऑडिशनमध्ये कुठल्याही कलाकाराने अभिनय करायचे ठरवलेले असायचे आणि तिथे जाऊन तो दुसरेच काहीतरी करून परतायचा. थोडक्यात ब्लँक व्हायचा आणि भरकटायचा, पण या सगळ्यातही बॉलिवूडचे स्वप्न मात्र तसेच कायम राहते. बॉलिवूडने अनेक लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. सहसा ज्युनियर कलाकारांच्या आयुष्यातील कथा प्रेक्षकांना भावूक करतात, पण ‘टिकू वेड्स शेरू’ हा चित्रपट प्रेक्षकांशी इतका भावनिक संबंध निर्माण करू शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच टिकू आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. तरी तिची वेदना आपल्या हृदयापर्यंत पोहचत नाही. चित्रपटाच्या ट्रेलरमधील लिपलॉक पाहून रोमान्सची अपेक्षा केली तरी ती व्यर्थ आहे.

‘टिकू वेड्स शेरू’ ही दोन भिन्न आणि उत्साही पात्रांची हृदयस्पर्शी कथा आहे, जी बॉलिवूडमध्ये मोठे बनण्याची आकांक्षा बाळगतात. हा चित्रपट त्याच्या प्रवासाचा पाठपुरावा करतो, जेव्हा तो ऐहिकतेत अडकतो आणि आव्हानांशी संघर्ष करतो, मात्र अडचणींचा सामना करूनही त्यांचे नाते टिकू शकेल का? हे चित्रपट पाहूनच कळेल. चित्रपटाचा शेवट काहीसा गुंडाळल्यासारखा वाटला. साई कबीर दिग्दर्शित हा चित्रपट कंगना राणावतने तिच्या प्रॉडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्स अंतर्गत केला आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा साई कबीरने ठीकठाक सांभाळली आहे, तर साई कबीर आणि अमित तिवारीने या सिनेमाचं लेखन केलं आहे. लेखन आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत हा सिनेमा काहीसा कमी पडला आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ हा वन टाईम वॉच सिनेमा आहे. जर तुम्ही नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौरचे चाहते असाल, तर तुमच्या आवडत्या कलाकारांसाठी हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -