घरफिचर्ससारांशमैत्रीला हवा सुख-दु:खाचा अंदाज!

मैत्रीला हवा सुख-दु:खाचा अंदाज!

Subscribe

काळ प्रचंड बदलला तसं मैत्री हे नातंही बदलत गेलं. पूर्वी एकमेकांना सहज भेटू शकणारे, प्रत्यक्ष निखळ गप्पा मारू शकणारे मित्र आता क्वचितच प्रत्यक्षपणे आपल्या मित्रांना भेटू शकत आहेत. ऑनलाईनच्या आभासी जगात भलेही आपण शब्दांचे थर रचत गप्पांचा पर्वत उभा करू शकू, पण जिवलग मित्राला प्रत्यक्ष भेटल्यावर प्रथमतः पुसटसाही शब्दोच्चार न करता केवळ एकमेकांचे चेहरे वाचून परस्परांच्या सुख-दुःखाचा अचूक अंदाज बांधणारी मैत्री निर्मळ व तेवढीच संस्मरणीय असते.

-अमोल पाटील

मैत्री हे ईश्वराकडून माणसाला मिळालेले एक असे नाते आहे की ज्यायोगे माणसाचे जीवन एकतर नंदनवन होते, अन्यथा जीवनाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आईवडील, शिक्षक यांच्यानंतर माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर जर कोणाचा सर्वाधिक परिणाम होत असेल तर हा ज्याच्या त्याच्या मित्रवर्गाचा होतो हे कोणताही अभ्यासू माणूस मान्य करेल. असे म्हटले जाते की, एखाद्याचे व्यक्तिमत्त्व तुम्हाला तपासायचे असेल किंवा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन तुम्हाला करायचे असेल तर त्या व्यक्तीचा मित्रवर्ग जर जवळून अभ्यासू शकलो तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा बर्‍यापैकी अंदाज येतो.

- Advertisement -

असे मत रूढ होण्यामागेसुद्धा कदाचित हेच कारण असले पाहिजे की माणूस ज्याच्या सहवासात राहतो त्याप्रमाणे आचार-विचार करू लागतो. अगदीच तुरळक प्रमाणात याबाबत अपवाद असेलही नाही असे नाही, पण बहुतांचे मत असेच येण्याची दाट शक्यता आहे की आपण ज्याच्या संगतीत राहतो तसे घडतो. यापुढे जाऊन यालाच एक गोष्ट जोडायला मला आवडेल की एका ठरावीक वयापर्यंत तरी आपण ज्याच्या सोबतीत संगतीत राहतो त्याच्या स्वभावाचा परिणाम हा आपल्यावर पडतो आणि पडतोच विशेषतः लहान मुले त्यातही कुमारवस्थेतील मुलांच्या बाबतीत हे तंतोतंत खरे ठरते.

अनुकूल मित्रवर्ग, सखेसोबती मिळाले की माणसाला गगनभरारी घेता येते, मात्र याउलट प्रतिकूल मित्रवर्ग मिळाला की धक्के, धोके खात खात जीवनाची परवड होते. म्हणून एखादा लाघवी, मितभाषी सकारात्मकतेने ओतप्रोत भरलेला बर्‍यापैकी पुढच्याचे भले होईल असेच सल्ले तेही विचारल्यावरच देणारा, निरामय हसणारा व निर्मळ हसवणारा माणूस माणसांच्या गर्दीत सापडताक्षणी लोक त्याच्या सहवासासाठी वाटेल ते करतात, पण दोन-पाच मिनिटे त्याच्याशी संवाद साधून मन मोकळं करून त्याच्या अंगी असलेल्या सकारात्मकतेचे तुषार आपल्यावर पाडून घेतात.

- Advertisement -

नकारात्मकतेने ओतप्रोत भरलेल्या व स्वतःचे स्वनिर्मित दुःख जगी वाटत फिरणार्‍या निराश, हताश माणसापासून दूर पळ काढताना बहुतेक जण दिसतात. याचाच अर्थ असा आहे की, दुःख, वेदना, संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात आहे. जो काहीतरी नवनिर्माणासाठी धडपडतो आहे त्याला संघर्ष अटळ आहे. विनासंघर्ष जीवनात तेजप्राप्तीची अभिलाषा बाळगणे म्हणजे शुद्ध भाबडेपणाचे लक्षण आहे.

या ठिकाणी एक मात्र लक्षात ठेवले पाहिजे की मित्रवर्गाची निकड पाहता चिकित्सेअभावी मित्रवर्ग जोडणे व नकारात्मकतेला खतपाणी घालणारी माणसं आवतीभोवती जमा करणे यापेक्षा सृजनशील चिंतनात रमणारा एकांतपणा केव्हाही उत्तमच ठरेल. फक्त तो एकांतपणा तुमच्या बुद्धीने सृजनासाठी स्वत: निवडणे मात्र अपेक्षित आहे. तो नाईलाजास्तव पदरी पडलेला किंवा दुर्गुणे पाडून घेतलेला मात्र असू नये.

प्रत्येकाच्या मनगाभार्‍यात जागृतावस्थेत विचारप्रक्रिया निरंतर सुरू असते. अगदी माणसशास्त्रीय भाषेत समजून घ्यायचे म्हटले तर उद्दीपक पाहताक्षणी माणूस विचारप्रवण होतो. म्हणून आपण जिथं राहतो त्या परिसराचा, तेथील व्यक्तींचा, त्यांच्या सहवासाचा थेट परिणाम या विचार प्रक्रियेवर होत असतो. विचार ही पायरी ओलांडली की त्याचे नंतर कृतीत रूपांतर होते आणि वारंवार विचाराअंती घडलेली वारंवार कृती पुढे सवय व नंतर स्वभाव होऊन आकार घेते. या स्वभावाच्या दीर्घकालीन मूल्यमापनालाच लोक चारित्र्य या अंगाने पाहतात.

याचा अर्थ असा आहे की, चारित्र्य हे जर शिखर मानले तर व्यक्तीचे उपजत ज्ञान व त्याने आपल्या अवतीभवतीच्या जगातून सहवास, संवाद, निरीक्षण, अनुभव याद्वारे संपादित केलेले ज्ञान हाच त्याचा पाया आहे हे नाकारू शकत नाही. या पायावरच संपूर्ण जीवनाची इमारत डौलाने उभी असल्याचे नीट चिकित्सेअंती पाहता लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. एखाद्याचे वागणे समाज नियमांना डावलून होत असेल तर हेच समाजमन त्याला ‘थोडा विचार करून वागायला शिक!’ अशा अर्थाने तंबी देत असल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील.

यातील तंबी देणार्‍या सूज्ञास समोरील व्यक्तीला विचारप्रवण होण्यास हाकच द्यावयाची असते हे प्रथमत: लक्षात घेतले पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात क्रांती आणू शकणारा हा घटक म्हणजेच ‘विचार.’ याला शक्तीचे स्थान आहे. फक्त त्या विचाराचा प्रवाह समाजहितदायी आहे की समाजअहितदायी आहे हे मात्र ज्याने त्याने तपासून घेतले पाहिजे. या तपासून घेण्यालाच चिकित्सा करणे म्हणतात.

लहान मुले इथं कमी पडतात आणि आपलं भलं व बुरं नेमकं कशात आहे, आपण कुणाच्या संगतीत राहिले पाहिजे म्हणजे त्याचा चांगला परिणाम आपल्या जीवनावर होईल अशा चिकित्सक विचाराच्या मर्यादा असल्यामुळेच नको त्याची संगत पदरी पडून अनेकांचे नुकसान झालेले आपण पाहतो. चांगली मुले बिघडलेली कितीतरी उदाहरणे आपण देऊ शकतो. अशा वेळी या कामात मुलांना पालकांनी, शिक्षकांनी व एक सूज्ञ समाजनिर्मितीची मनीषा मनोमन बाळगून त्यासाठी योगदान देऊ पाहणार्‍या समाजातील संवेदनशील घटकाने मदत केली पाहिजे.

मुलांना त्यांचं भलंबुरं कशात आहे, आपण नेमकं कशा मुलांच्या सहवासात राहिलं पाहिजे म्हणजे त्याचा आपल्याला चांगल्या सवयी लागण्यास हातभार लागेल याची वेळोवेळी जाणीव करून देणे क्रमप्राप्त ठरते. आजकालच्या जीवन पद्धतीमध्ये नेमका याचा काही अंशी का होईना पण अभाव जाणवतोच. धावपळ आणि दगदगीचं जीवन जगणारे पालक मनी प्रचंड इच्छा असूनही आज आपल्या मुलांसाठी वेळ काढू शकत नाहीत. त्याच्या भावविश्वात डोकावून पाहण्यासाठी त्याचा सहवास व त्याच्याशी संवाद साधू शकत नाहीत. सहवास आणि तद्नंतरचा सुसंवाद हे अंतिम परिणती म्हणून प्रेम व जिव्हाळा आपल्या पदरी टाकत असतात.

त्यामुळे जिथं सहवासाची, सुसंवादाचीच वाणवा आहे, तिथं प्रेम आणि जिव्हाळा पदरी पडण्याची आशा मनी बाळगणे हे भाबडेपणाचेच लक्षण म्हणावे लागेल. कितीही धावपळ आणि दगदग असली तरी या सहवास व संवादाचे महत्त्व जाणून पालक, शिक्षक व सूज्ञ समाज यांनी आपल्याच समाजाचे जे भविष्य म्हणून उद्या आकार घेणार आहेत त्या लहान मुलांचे एक जिवलग मित्र बनण्याची ही खरी वेळ आहे. समाजमाध्यमांवरील हजारोंनी असलेल्या मित्रांपेक्षा खर्‍या आयुष्यात आपल्या भल्याबुर्‍याचे भान बाळगून आपल्याला हात देणारा मित्र गरजेचा असतो.

काळ प्रचंड बदलला तसं मैत्री हे नातंही बदलत गेलं. पूर्वी एकमेकांना सहज भेटू शकणारे, प्रत्यक्ष निखळ गप्पा मारू शकणारे मित्र आता क्वचितच प्रत्यक्षपणे आपल्या मित्रांना भेटू शकत आहेत. ऑनलाईनच्या आभासी जगात भलेही आपण शब्दांचे थर रचत गप्पांचा पर्वत उभा करू शकू, पण जिवलग मित्राला प्रत्यक्ष भेटल्यावर प्रथमतः पुसटसाही शब्दोच्चार न करता केवळ एकमेकांचे चेहरे वाचून परस्परांच्या सुख-दुःखाचा अचूक अंदाज बांधणारी मैत्री ती निर्मळ व तेवढीच संस्मरणीय असते.

सुखात क्वचित परंतु दु:खात स्वत:हून धावत जात दुःखात होरपळलेल्या मित्राचा हात हातात घेऊन त्याच्याजवळ एक शब्दही न उच्चारता केवळ स्पर्शाच्या भाषेने ‘मी आहे तू घाबरू नकोस’ ही भावना अगदी सहज पोहचवण्याचा त्या परंपरेची जागा या आभासी जगातील आभासीच चिन्हांचे इमोजी वापरून येणार नाही.

माणूस हा भौतिकदृष्ठ्या प्रगतीशील जेवढ्या वेगाने झाला तितक्याच कदाचित किंचित अधिक वेगाने तो काही आंतरिक ओढ लावणारे, जिव्हाळा वृद्धिंगत करणारे व संवेदनशील मनाला हवेहवेसे वाटणारे हळूवार क्षण सखेसोबती त्यायोगे येणारे अनुभव व त्यातून निर्माण होणारी सर्वांगीण समृद्धीलाही काही अंशी का होईना गमावतही चालला आहे, जे गमावण्याची त्याची इच्छा नव्हती आणि आजही नाही. अंधानुकरण व प्रत्येक नवं ते हवं या प्रवाहात वाहत गेल्यामुळे असे झाले हे नाकारून चालणार नाही.

शेवटी जीवन हे जन्मापासून मृत्यूपर्यंत होत असलेला निरंतर न थांबणारा चढउतारांचा प्रवास आहे. या प्रवासात जसे सखेसोबती आपण आपल्या गाठीभेटी जमवत जाऊ तशा आठवणींनी हा प्रवास रंगतदार होत जाणार आहे. जे जे निर्मळ, निस्वार्थ, निरपेक्ष, निरागस, आनंददायी ते ते या प्रचलित दिव्यत्वाच्या व्याख्येला नियमित स्मरत राहू. वजाबाकी व बेरीज हे गणित आपल्या जीवनात आलेल्या व्यक्ती, प्रसंग, घटना, अनुभवाच्या बाबतीत लागू करू.

पुढे अविरत चालत राहण्यातच सर्वांचे भले आहे. निर्मळ, निरामय आणि निरागस आनंद त्यातच लपलेला आहे हेदेखील ओळखून जगता आले पाहिजे. नकारात्मकता वाढवणार्‍या बाबींची वजाबाकी तर सकारात्मकता वाढवणार्‍या बाबींची बेरीज असे हे साधे गणित आहे. ते एकदा जमले की जीवनातील संस्मरणीय क्षणांची डायरी रोज नवनवे आणि हवेहवे पान जोडत अधिक मोठी व समृद्ध होत जाते.

सहवासातून सुसंवादाने
फुलत जाते ती मैत्री खरी
सुख-दु:खाच्या क्षणांनी बहरते
विश्वास जोडते ती मैत्री खरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -