मैदानात गंभीर, मैदानाबाहेर गौतम

सुकमा येथील माओ हल्ल्यात शहीद झालेल्या 25 सीआरपीएफ जवानांच्या मुलांचा गंभीर खर्‍या अर्थाने आधार झाला आहे.जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्याच्या ‘गौतम गंभीर फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्याने स्वीकारली आहे. तृतीयपंथीयांच्या आंदोलनात सहभागी होऊन त्याने त्याने त्यांच्यासारखा वेश देखील परिधान केला होता हे विशेष.

gautam gambhir
गौतम गंभीरचे विधान

2 एप्रिल 2011 तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठीच नव्हे तर या देशावर निस्सिम प्रेम असणार्‍यांसाठी जल्लोषाचा दिवस होता.सकाळपासूनच्या उत्सुकता आणि धाकधुकीच रूपांतर रात्री लाखो क्रिकेट चाहत्यांच्या साक्षीने जल्लोषात झाले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जल्लोष सुरू होता. निमित्त होते भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्याचे. भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने श्रीलंकेचा गोलंदाज नुआन कुलसेखराला लाँग-ऑन वरून षटकार खेचत रूबाबात विश्वचषक मिळवून दिला.आता 7 वर्षांनंतरही विश्वचषक म्हटला की धोनीचा तो षटकार आणि रवी शास्त्रीची ती जोरदार कॉमेन्ट्री डोळ्यांसमोर येते.

परंतु, या मोठ्या विजयात अजून एका खेळाडूचा सिंहाचा वाटा होता आणि तो फलंदाज म्हणजे गौतम गंभीर. सचिन (18) आणि सेहवाग (0) असे खंदे फलंदाज बाद झाल्यावर भारतीय प्रेक्षकांच्या विश्वचषकाच्या स्वप्नावर जवळजवळ पाणीच फेरल्यासारखे झाले होते. परंतु,त्यानंतर गंभीरने 97 धावांची आपल्या नावाला साजेशी खेळी करत तेवढ्याच शांतपणे विराट कोहलीच्या साथीने भारताला लक्ष्य पार करण्यास मदत केली. त्यावेळी गंभीरने केलेल्या खेळीचे महत्त्व एक सच्चा भारतीय क्रिकेट चाहताच सांगू शकेल. केवळ 3 धावांनी त्याचे शतक हुकले आणि त्यानंतर आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून तो हळूहळू झाकोळला गेला. पहिल्यांदा आंतराष्ट्रीय क्रिकेट त्यानंतर 2018 च्या आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडलेल्या गंभीरने शेवटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतची त्याची कारकिर्द भारतीय क्रिकेटला प्रकाशित करून गेली.

2007 च्या विश्वचषकात आपल्याला संधी मिळाली नाही म्हणून आपण त्यावेळी आत्मविश्वास गमावल्याचे गंभीरने म्हटले होते. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, सेहवाग यांच्यासारख्या दादा आणि भारतीय क्रिकेटमध्ये स्थिरस्थावर झालेल्या खेळाडूंच्या शर्यतीत स्वत:साठी संधी निर्माण तेव्हा भरपूर कठीण होते. परंतु, गंभीर पुन्हा पूर्ण तयारीनीशी उतरला आणि त्याने मैदान गाजवले देखील. गांगुलीच्या निवृत्तीनंतर एक महत्त्वाचा फलंदाज म्हणून त्याने संघात नाव मिळवले.सेहवागसोबत त्याने सलामीला 38 सामन्यांत 50.54 च्या सरासरीने 1870 धावा कुटल्या.2008 ते 2012 या काळात त्याच्या कारकिर्दीला खर्‍या बहर आला.

सलग पाच कसोटी सामन्यांत शतके झळकवणार तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. असा पराक्रम करून डॉन ब्रॅडमनसारख्या फलंदाजांच्या पंक्तीत तो जाऊन बसला. यावरून त्याच्या खेळाची क्षमता लक्षात येते. गांगुलीच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या कर्णधारपदासाठी तो एक प्रबळ दावेदार होता.परंतु, महेंद्रसिंग धोनीसोबतच्या शर्यतीत तो मागेच राहिला आणि 2013 नंतर सातत्याने संघात स्थान देखील मिळवू शकला नाही. तो आपला शेवटचा सामना 2016 ला इंग्लंडविरूद्ध खेळला आणि आता निवृत्तीच्या निर्णयापर्यंत आंतराष्ट्रीय क्रिकेटच्या बाहेरच होता. 2013 नंतर सातत्याने संघाबाहेर असलेल्या गंभीरने आयपीएलमध्ये मात्र आपला आब आणि रूबाब कायम राखला. आयपीएलमधील यशस्वी झालेल्या खेळाडूंपैकी तो एक खेळाडू आहे. 2012 आणि 2014 च्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा तो कर्णधार होता.

मैदानावर खेळाच्या बाबतीत तो कायम गंभीर आणि अ‍ॅग्रेसिव्ह होता. परदेशी ऑस्ट्रेलियन खेळाडूंपासून शाहिद आफ्रिदी, कामरान अकमल या पारंपरिक प्रतिस्पर्धांबरोबर तो भिडला होता. कधीकधी तर त्याची आपल्याच संघातील खेळाडू असलेल्या विराट कोहलीशी आयपीएलदरम्यान शाब्दिक चकमक झाली होती. बाहेर शांत असलेला गंभीर कायमच एकाद्या ज्वालामुखीसारखा होता. कधी उफाळून येईल याचा भरवसा नसायचा. ‘माझ्या देशासाठी १५ वर्षांहून अधिक काळ क्रिकेट खेळल्यानंतर या सुंदर खेळातून निवृत्ती घेण्याचे मी ठरवले आहे. क्रिकेटमध्ये झालेल्या सर्व दुखापती व वेदना, भीती व अपयश यानंतरही पुढील आयुष्यात याच गोष्टींची पुनरावृत्ती करण्यास मला आवडेल. मात्र, पुढच्या जन्मी मला भारतासाठी आणखी काही सामने जिंकायचे आहेत, आणखी काही शतके ठोकायची आहेत, तसेच प्रतिस्पर्ध्यांचा निम्मा संघही गारद करायचा आहे,’ अशा भावना निवृत्तीनंतर त्याने व्यक्त केल्या.

क्रिकेटविषयी भावनिक असलेला गंभीर सामाजिक प्रश्नांविषयी तेवढाच संवेदनशील असतो. क्रिकेटव्यतिरिक्त समाजात काम करण्याची दुसरी बाजू देखील समोर आली. मैदानावर कायमच आक्रमक असणारा गंभीर क्रिकेटपासून हळूहळू दूर जात राहिला तरी समाजाशी आणि विशेष करून सीमेवरील जवानांशी त्याचा जवळचा संबंध आला. सामाजिक क्षेत्रात त्याने सहभाग घ्यायला सुरूवात केली आहे. दिल्ली शहराच्या समस्यांविषयी तो सोशल मीडियावर देखील व्यक्त होतो.तो नुसता व्यक्तच होत नाही तर कृती देखील करतो. सुकमा येथील माओ हल्ल्यात शहीद झालेल्या 25 सीआरपीएफ जवानांच्या मुलांचा गंभीर खर्‍या अर्थाने आधार झाला आहे.जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्याच्या ‘गौतम गंभीर फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्याने स्वीकारली आहे. तृतीयपंथीयांच्या आंदोलनात सहभागी होऊन त्याने त्याने त्यांच्यासारखा वेशदेखील परिधान केला होता हे विशेष.

मैदान कोणतेही असो समर्पण ही सामायिक गोष्ट असतेच. जवानांचे देशाप्रती असलेले समर्पण आणि त्याने भारतीय क्रिकेटप्रति दिलेले योगदान याची सांगड घालण्याचा तो प्रयत्न करतो आहे .यश-अपयश हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग असतोच. परंतु, मैदानावर उतरल्यावर भिडण्याची जिद्द आणि जोश मनुष्याला संपूर्ण आयुष्य उत्तमरित्या जगण्याची प्रेरणा देते. मैदानावर नेहमीच चढउतार बघितलेल्या गंभीरने आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात सामाजिक कामातून करण्याचे ठरवले आहे. आपल्या धेय्याकडे गंभीरपणे पाहत, आयुष्यात कधी यशस्वी तर कधी काळ्याकुट्ट अंधारातून जात मार्गक्रमण करण्याचा त्याचा आतापर्यंतचा प्रवास इतरांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल.

रोशन चिंचवलकर

(लेखक आपलं महानगरचे उपसंपादक आहेत)