घरफिचर्सख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ झाकिर हुसेन

ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ झाकिर हुसेन

Subscribe

झाकिर हुसेन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती, एक ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८९७ रोजी अफ्रिडी अफगाण मुसलमान कुटुंबात हैदराबाद (सिंध) येथे झाला. त्यांचे वडील वकील होते. झाकिर हुसेन नऊ वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारले. झाकिर हुसेन यांनी आपले शिक्षण इटावा, अलीगढ आणि बर्लिन इत्यादी ठिकाणी घेतले. त्यांनी अर्थशास्त्र विषयात पीएच डी पदवी मिळविली. ही पदवी मिळविण्यापूर्वी ते १९२० मध्ये जामिआ मिल्लिया इस्लामिया या शिक्षणसंस्थेकडे आकर्षित झाले होते. जर्मनीहून भारतात परत येताच त्यांनी आपले सर्व जीवन या संस्थेस समर्पित केले. १९२५ मध्ये ही संस्था दिल्लीस हलविण्यात आली व झाकिर हुसेन १९२६ मध्ये तिचे कुलगुरू झाले. त्यांनी जवळजवळ बावीस वर्षे या संस्थेचे कार्य केले व तिला एका अभिनव शिक्षणसंस्थेचे स्वरूप दिले.

विद्यापीठात बौद्धिक स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य व भाषणस्वातंत्र्य पुरेपूर असावे आणि व्यासंगी विद्वानांचे ते सभास्थान व्हावे; कारण अशा वातावरणात विद्यार्थ्यांचे नीतिधैर्य विकास पावते, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी स्वयंशिक्षणावर भर देऊन नव्या शैक्षणिक कल्पना जामिआ मिल्लियामध्ये रुजविल्या. ते अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरू झाले. १९५६ साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले. १९६७ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले.

- Advertisement -

झाकिर हुसेन यांनी अनेक शैक्षणिक समित्यांवर काम केले. त्यांना अनेक परदेशी आणि भारतीय विद्यापीठांनी डी. लिट ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले. भारत सरकारने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा यथोचित गौरव पद्मविभूषण (१९५४) हा पुरस्कार देऊन केला. १९३७ मध्ये महात्मा गांधींनी त्यांना मूलोद्योग शिक्षण समितीचे अध्यक्ष केले. आयुष्यभर त्यांनी या शिक्षणपद्धतीचा पुरस्कार केला. अशा या थोर शिक्षणतज्ज्ञाचे ३ मे १९६९ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -