घरलाईफस्टाईललग्नानंतरचे करिअर आणि शिक्षण

लग्नानंतरचे करिअर आणि शिक्षण

Subscribe

लग्नानंतर पुन्हा थांबलेले शिक्षण आणि करिअर केल्याने तिला आर्थिक, मानसिक समाधान तर मिळतेच. घरकाम सांभाळून स्वतःच्या कामात व्यस्त राहून तसेच मनासारखे काम आणि आवडते शिक्षण पूर्ण करून त्या क्षेत्रात नोकरी केल्याने मिळणारे चार पैसे तिला लाख मोलाचे समाधान देऊन जाते.

लग्न झाले की, करिअर आणि शिक्षणाला फुलस्टॉप द्यावा लागतो, असे बर्‍याच तरुणींना वाटते. पूर्वी असे म्हटले जायचे लग्न झाले की करिअर संपते. परंतु सध्याचा काळ वेगळा आहे, वाढणारी महागाई यासोबत आपली कधीही न संपणारी अनेक अपेक्षा यादी याकरिता लग्नानंतर नवरा-बायकोला नोकरी करणे भागच पडते. लग्न झाल्यावर संपूर्ण दिवस घरकामातच जातो. यातील कितीवेळ आपण स्वतःला देतो. हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. लग्नाआधी करत असलेली नोकरी लग्नानंतर सुरू ठेवल्यास येणारी स्वकमाई तिला हक्काची वाटू लागते. त्यामुळे तिला जे हवं ते ती निसंकोचपणे घेते. आपल्या आवडी-निवडी जोपासण्यासाठी प्रत्येकवेळी नवर्‍याकडे पैसे मागणे काहिंना आवडत नसते तर, काहींना लग्नानंतर नोकरी करून मानसिक आणि आर्थिक समाधान मिळत असते. यासोबतच संसाराचा भार नवर्‍यावर न पाडता त्यास आधार देण्यास, स्वत:ला लागणार्‍या वस्तू घेता याव्यात आणि स्वाभिमानाने जगता यावं, म्हणून काही तरुणी लग्नानंतरही नोकरी, गृहउद्योग करण्याचा निर्णय घेतात.

लग्न झाल्यावर तरुणींना त्यांचे नवीन घर, संसार, सासरची मंडळी त्यांचा नोकरीसाठी असणारा विरोध आणि नवर्‍याचा पाठिंबा किंवा विरोध हे सारं करिअरच्या आड येत असते, परंतु या सार्‍याला सामोरेही जावे लागते. नवरा हा आपल्या बायकोच्या करिअरचा विचार करणारा, एकाच क्षेत्रातील असेल तर तिला भक्कम पाठिंबा मिळून ती स्वतः करिअर नक्कीच घडवू शकते. यातही वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील ताळमेळ राखता आला तर लग्नानंतरही सगळे सोपे होते.
लग्नानंतर करिअरच्या आड येणार्‍या गोष्टींचा शांतपणे विचार करून आपल्या व्यक्तीशी मोकळेपणाने संवादामार्फत चर्चा करता येऊ शकते. लग्नानंतर तुमचे थांबलेले करिअर, शिक्षण नव्याने का सुरू करावेसे वाटते, तुम्हाला नोकरी, व्यवसाय का करावा वाटतो, त्यामागील नेमका उद्देश कोणता आहे हे सविस्तर सांगा. संवाद साधल्याने अनेक प्रश्न सहजतेने सोडवता येतात. त्यामुळे घरची जबाबदारी घेऊन करिअर नक्की पूर्ण करू शकता.

- Advertisement -

नवीन लग्न झालेले असो किंवा लग्न होऊन अनेक वर्षे उलटून गेलेले असो तुमच्या मनात असणारी इच्छा आणि आवड तुमचे अर्धवट राहिलेले शिक्षण आणि करिअर नक्की पूर्ण करण्यास मदत करेल. स्वयंपाक घरात एखादा पदार्थ आवडीने बनवत असताना तो नेहमीच उत्कृष्ट चवीचा बनतो. कारण या कामात तुम्ही तुमच्यात असलेल्या आत्मविश्वासाने तो पदार्थ बनवतात. तसेच करिअर घडविताना मी करू शकते, मला जमणार असा आत्मविश्वास तुमच्यात हवा. प्रबळ इच्छाशक्ती आणि मन उत्साही असेल तर, कोणत्याही वयात तुमच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -