नोज-इयर पिन्स फॅशनचा पुन्हा ट्रेंड

Fashion

आपल्या संस्कृतीमध्ये कान नाक टोचणे महत्त्वाचे मानले जाते. नाक, कान टोचण्याची फॅशन जुनीच असली तरी त्यात बदलत्या जीवनशैलीमुळे सतत नवीन काही ना काही दाखल होताना बाजारात दिसून येते. हीच हटके पण स्टाईलिश फॅशन अ‍ॅक्सेसरीजचा ट्रेंड महाविद्यालयातील तरुणींपासून कौटुंबिक लग्नसमारंभात बघायला मिळत आहे. सध्या आपल्या पारंपरिक असलेल्या दागिना म्हणजे नथेपासून कुड्यांसह, बुगडी आणि फॅशनेबल इयर पिन्सना अधिक पसंती दिली जात आहे.

कानात तसेच नाकात घातल्या जाणार्‍या पारंपरिक दागिन्यांमध्ये नथ, बुगडी आणि कुड्या यांचा समावेश होता. मात्र, आता या ट्रेडिशनल दागिन्यांना वेस्टर्न लूक देऊन पुन्हा एकदा इयर रिंग्स, इयर पिन्स आणि नोज पिन्सनी सर्वच वयोगटातील युवतींना भुरळ पाडली आहे. विविध आकारात आणि विविध डिझाईनमध्ये या नोज पिन्स आणि इयर पिन्स सर्वत्र ठिकाणी मिळतात. जुन्या पद्धतीच्या असलेल्या नथीमध्ये थोडा फॅन्सी बदल करून या नव्या लुकच्या नोज पिन्सच्या व इयर पिन्सच्या प्रेमात तरुणी पुन्हा एकदा पडल्याचे दिसत आहे. यात अनेक रंगाच्या इयरपिन्स आणि नोजपिन्स बाजारात उपलब्ध आहेत, परंतु सिल्वर रंगाच्या पिन्सना विशेष मागणी दिसते. थोडा आधुनिक लूक असलेल्या या इयर पिन्स आणि नोज पिन्स साडीवरच नाही तर कुर्ती आणि वेस्टर्न आऊटफिट्सवरही त्या वेगळा लूक आपल्याला देऊन जातात.

सध्या बाजारात दाखल झालेल्या या नोज पिन्स आणि इयर पिन्समध्ये वैविध्य बघायला मिळेल. त्यात कुंदन, फुलं, चांदणी, वेल, पान यासोबत अनेक आकार आणि रंगाचे ऑक्सिडाइज्ड प्रकारचे नोज पिन्स, इयर पिन्स विविध अ‍ॅक्सेसरीज शॉपमध्ये उपलब्ध आहे. सध्याच्या फॅशनमध्ये चलती असणार्‍या या दागिन्यांची किंमत अगदी परवडणारी आहे. फक्त सण-समारंभ नाही तर राजच्या फॅशनमध्ये या दागिन्यांचा वापर करण्याचा ट्रेंड सध्या आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नोज पिन्स, इयर पिन्सची ही फॅशन चर्चेत आली आहे.