घरलाईफस्टाईलरांगोळीचे सप्तरंगी रंग...

रांगोळीचे सप्तरंगी रंग…

Subscribe

कल्याण मधील ५८ वर्षीय हुसैन शेख,गेले २५ वर्षे रांगोळी विकण्याचा व्यवसाय करत आहेत. त्यांनी याबाबत काही खास माहिती आपलं महानगरला दिली.

आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगात न्हाऊनी आली… या गाण्यातून दिवाळी ही विविध रंगांनीच सजलेली असते, याची प्रचिती येते. दिवाळीची रंगत वाढविण्यासाठी वेगवेगळ्या रंगातील रांगोळीने सध्या बाजार सजला आहे. ग्राहकांचीदेखील रांगोळी आणि दिवाळीच्या खरेदीसाठी धूम सुरू आहे.रांगोळी म्हणजे ६४ कलाप्रकारांपैकी एक! रांगोळी ही प्रामुख्याने सण, उपवास, उत्सव, लग्न इ. शुभप्रसंगी काढली जाते आणि दिवाळी म्हटलं की, विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो ते म्हणजे रांगोळी. रांगोळी हे एक मांगल्याचं आणि उत्साहाचं प्रतीक मानलं जातं. प्रत्येक राज्यात या रांगोळीला विविध नावांनी संबोधलं जातं. कर्नाटकात रंगवली, उत्तरांचल प्रदेशात ऐपन, आंध्रप्रदेशात मुग्गु आणि केरळमध्ये कोल्लम. रांगोळीची परंपरा ही अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.

सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. रांगोळीच्या ज्या आकृती काढतात त्या प्रतिकात्मक असतात. रांगोळी भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे. खरे तर हातानेच रांगोळी काढण्याची पारंपरिक पद्धत आहे. पण सर्वांनाच हाताने रांगोळी काढायला जमत नसल्याने त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. दिवाळीच्या सणाला बाजारात पारंपरिक रंगांच्या रांगोळ्यांसोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळींचे स्टीकर, छाप, आपल्याला पाहायला मिळतात. बर्‍याच महिला ऑफिसमुळे अथवा वेळेअभावी अशा रेडिमेड रांगोळीचा पर्याय निवडतात.

- Advertisement -

स्टिकरची रांगोळी- स्टिकरची रांगोळी ही रेडिमेट प्रिंटेड रांगोळी असते. ती हवी त्या जागी फक्त चिटकवायची असते. ह्या स्टिकरमुळे वेळ वाचतो तसेच ही रांगोळी दिसायलाही सुंदर दिसते. ही रांगोळी मोडण्याची/ खराब होण्याची शक्यता देखील नसते. सध्या बाजारात लक्ष्मीच्या पावलांचे स्टिकर्स, तोरण रांगोळीचे स्टिकर्स तर अगदी छोटे रांगोळीचे स्टिकर्स १० रुपयांपासून मिळतात. तर मोठ्या रांगोळीचे स्टिकर्स ५० रुपयांपर्यत उपलब्ध आहेत. त्यातही स्टोन लावलेले डिझाईन्सचे, लक्ष्मीची पावले आणि आकर्षक रांगोळीचे मोठे स्टिकर्स अगदी १०० रुपयांपर्यत विक्रीला आहेत.

छाप- रांगोळीचे छाप वापरुनही कमी वेळात सुबक रांगोळी काढता येते. कर्मचारी महिला वर्ग या छापांचा देखील मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याने बाजारात हे रांगोळीचे छापही मोठ्या प्रमाणात उपलब्घ आहेत. रांगोळाचे हे छाप जाळीदार कापडापासून बनवलेले असतात. त्याच्या आकारावरुन त्याची किंमत असते. जितका मोठा छाप तितकी महाग त्याची किंमत असते. रांगोळीवाल्यांकडे हे छाप हमखास विक्रीसाठी ठेवलेले दिसतात. हे छापे २० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यत बाजारामध्ये उपलब्ध आहेत.

- Advertisement -

वर्ष भरात जेवढी रांगोळी विकली जात नाही तेवढी दिवाळीमध्ये विकली जाते. अगदी १ रुपया किलो पासून रांगोळी मी विकली आहे. आज पांढरी रांगोळी १० रुपये किलो बाजारात विक्रीसाठी आहे तर रंग मिश्रित रांगोळीचा दर ४० रूपये किलो आहे. लाल, हिरवा, नारंगी या रंगांना लोकांची जास्त पसंती मिळल्याचे दिसते. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति किलो रांगोळीचा दर समान आहे. वाढती महागाई आणि लोकांना असलेला अपुरा वेळ यामुळे बाजारात रेडिमेड स्टिकर लक्ष्मीची पावले आणि उंबरठ्यावरील पट्टीची मागणी जास्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -