घरलोकसभा २०१९लोकसभेत बंडखोरांना कसे आवरणार?

लोकसभेत बंडखोरांना कसे आवरणार?

Subscribe

शहापूर येथील आदिवासी सामुदायिक विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावून एकप्रकारे भाजपाने आपले शक्ती प्रदर्शन केले. येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप शिवसेना युतीतर्फे खासदार कपिल पाटील यांना संधी दिली जाणार हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. या लोकसभा क्षेत्रात भाजप आणि काँग्रेस अशीच अटीतटीची लढत होईल काँग्रेस आघाडीकडून माजी खासदार सुरेश टावरे हे काँग्रेसपक्षाकडे उमेदवारी मागत आहेत. तर कुणबी सेना नेते विश्वनाथ पाटील हे देखील पुन्हा उमेदवारी मागत आहेत. येथे काँग्रेस कडून दोघा इच्छुकांपैकी कोणाला उमेदवारी मिळेल, हे मात्र अध्याप काँग्रेस पक्षाकडून अधीकृतपणे जाहीर केलेले नाही. शहरीकरण झालेल्या कल्याण, भिवंडी या क्षेत्रासह शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यासह वाडा तालुक्यातील ग्रामीण भाग या मतदारसंघात येतो. त्यात आगरी-कुणबी, मुस्लिम समाजाचे प्राबल्य आहे लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने या मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी पाहण्यास मिळत आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील विजयी झाले होते. पाटील यांना 4 ,11,70 मते मिळाली होती. तर काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना 3,01,620 मते मिळाली होती. आता पुन्हा या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून विश्वनाथ पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आपल्या कुणबी कार्डावरील मताधिक्याची गणित मांडत त्यांनी काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाकडे उमेदवारी मागितली आहे. तर याच मतदारसंघात माजी खासदार राहीलेले सुरेश टावरे हेदेखील लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. या दोघांपैकी काँग्रेस कडून कोणाला तिकीट मिळेल, हे मात्र अध्याप स्पष्ट नाही. परंतु या इच्छुक उमेदवारांपैकी एकाचे तिकीट कापले जाणार, हे मात्र निश्चित आहे. यातील एक इच्छुक उमेदवार पक्षाचे काम करील किंवा बंडखोरी करुन निवडणूक लढवेल हे चित्र मात्र येत्या निवडणुकीत पाहण्यास मिळेल. एकंदरीत भिवंडी लोकसभेत तिकीट कापाकापीच्या राजकारणात पक्षाअंतर्गत वाद उफाळून गटबाजीचे ग्रहण लागण्याची भिती येथील राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

- Advertisement -

असेच काहीसे वातावरण भिवंडी लोकसभेत आहे. या मतदारसंघात शिवसेनेतून लोकसभा उमेदवारीसाठी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. अलिकडेच शिवसेना भाजपा यांची युती होण्या अगोदर बाळ्यामामा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहापुरात एक मोठे शक्तीप्रदर्शन करीत लोकसभेसभेसाठी बाळ्यामामा हेच लोकसभेचे उमेदवार असतील, अशा घोषणा देखील शिवसेना पदाधिकार्‍यांनी येथे केल्या. तर काहींनी त्यांना येत्या निवडणुकीसाठी आगाऊ शुभेच्छा दिल्या. दस्तुरखुद्द बाळ्यामामा म्हात्रे हे लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र अचानक भाजप-शिवसेनेची युतीची घोषणा झाल्याने व भिवंडी लोकसभा ही भाजपाच्या वाट्याला गेल्याने म्हात्रे प्रचंड नाराज झाले आहेत. पक्ष आदेशामुळे त्यांची पक्षाअंतर्गतच कोंडी झाली. पुढील काळात त्यांची नाराजी भाजपाच्या उमेदवाराला भोवणार असल्याचे दिसते आहे. युतीमुळे उमेदवारी हुकल्यामुळे बाळ्यामामा म्हात्रे हे ऐन लोकसभा निवडणुकीत पुढे काय भुमिका घेतात, हे गुलदस्त्यात आहे. अद्यापतरी काही एक सांगता येत नाही. परंतु येथेही पक्ष अंतर्गत बंडखोरी होण्याची भिती आहेच.

पक्षश्रेष्ठी या नाराजांना कसे शांत करतात यावरून पुढील निवडणुकांची समीकरणे स्पष्ट होतील. भिवंडी लोकसभेत खरी लढत ही भाजपा आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची अशी होईल, या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे येणारा काळाच ठरविल. मात्र सध्यातरी उमेवारीवरुनच नाराजी नाट्य रंगणार असून नाराज उमेदवारांची बंडखोरी काँग्रेस, शिवसेना या पक्षांना डोकेदुखी ठरणार असल्याने कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचे कापले जाणार ही चिंता काँग्रेसच्या गोटात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -