घरदेश-विदेशसुषमा स्वराज यांना आदरांजली

सुषमा स्वराज यांना आदरांजली

Subscribe

माझ्या वाढदिवसाला आवडीचा केक आणण्यास त्या कधी विसरल्या नाहीत

सुषमा या दिग्गज राजकीय नेत्या आणि एक माणूस म्हणून मोठ्या होत्या. त्या नेहमीच आठवणीत राहतील आणि त्यांची उणीव भासत राहील. माझ्या वाढदिवसाला आवडीचा केक आणण्यास त्या कधीच विसरल्या नाहीत, हे सांगताना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे डोळे भरून आले होते.

माझ्या खूपच जवळच्या सहकारी सुषमा स्वराज यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. भाजपमध्ये त्यांच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच मी त्यांच्यासोबत काम केले आहे. 1980 मध्ये मी भाजपाचा अध्यक्ष असताना त्या युवा कार्यकर्त्या म्हणून काम करत होत्या. त्यांना मी माझ्या टीममध्ये सहभागी करून घेतले. जसजसे दिवस गेले तसे त्या आमच्या पार्टीच्या लोकप्रिय नेत्या बनल्या आणि इतर महिला नेत्यांसाठी त्या रोल मॉडल होत्या,’ असेही लालकृष्ण अडवाणी म्हणाले.

- Advertisement -

घरी या आणि एक रुपया घेऊन जा..
हरिश साळवे झाले भावूक

हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कुलभूषण जाधव याच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू प्रभावीपणे मांडणारे अ‍ॅड. हरिश साळवे हे सुषमा स्वराज यांच्या निधनाने भावुक झाले होते. स्वराज यांचे निधन होण्यापूर्वी काही तास अगोदर साळवे यांनी त्यांना फोन केला होता. स्वराज यांनी साळवे यांना बुधवारी भेटायला बोलावले होते. तसेच कुलभूषण जाधव यांची बाजू मांडण्यासाठी साळवे यांनी निश्चित केलेली एक रुपया फी घेऊन जाण्यास सांगितले होते. मात्र साळवे यांची स्वराज यांच्याशी भेट झालीच नाही.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली. त्यांना फाशीची शिक्षाही सुनावली. मात्र त्याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात खटला दाखल केला. हा खटला भारताच्या बाजूने माजी महाधिवक्ता अ‍ॅड. हरिश साळवे यांनी लढवला. त्यासाठी त्यांनी फक्त १ रुपया फी आकारली होती. या संपूर्ण प्रकरणात हरिश साळवे हे तत्कालिन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या संपर्कात होते. तसेच स्वराज यांनी लागेल ती सर्व मदत साळवे यांना देऊ केली. हा खटला भारताने जिंकला. जाधव यांची फाशी रद्द झाली. तसेच काऊंस्युलर असेसही मिळाला. मंगळवारी रात्री ८.५० वाजता साळवे यांनी सुषमा स्वराज यांना फोन केला होता. त्याबद्दल साळेव म्हणाले की, आमचं बोलणं खूपच भावूक झाले. त्यांनी मला बुधवारी संध्याकाळी ६ वाजता घरी बोलावले. माझी १ रुपया फी घेऊन जा असेही त्या म्हणाल्या. मला सुचतच नाही की मी काय बोलू, त्यांच्या निधनामुळे एक मोठी बहीण गमावल्याचे दु:ख मला झाले, असे साळवे यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला सांगितले.

- Advertisement -

परदेशी भारतीयांसाठी स्वराज होत्या देवदूत

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या अकाली निधनामुळे भारतीय राजकारणाची मोठी हानी झाली असतानाही त्यापेक्षा मोठा फटका परदेशी भारतीयांना बसला आहे. परराष्ट्रमंत्री असताताना त्यांनी शेवटच्या काही वर्षांत आपल्या कामाने ठसा उमटवला. परदेशात राहणार्‍या अनेक भारतीयांसाठी त्या अक्षरश: देवदूत ठरल्या. स्वराज यांनी परदेशी भारतीयांच्या अडचणींच्या काळात परराष्ट्र मंत्रालयामार्फत त्यांना खूप मदत केली. ट्विटरच्या माध्यमातून त्या परदेशी भारतीयांच्या मदतीला धावत. त्यांच्या अडचणी दूर करत. हे सर्व करत असताना त्यांचे स्वत:चे आरोग्य तितकेसे चांगले नव्हते.

भारतातील तरुण राजकीय नेतृत्त्वांसाठी त्या मार्गदर्शक ठरल्या. स्वराज यांची कामप्रती निष्ठा, त्यांचे कठोरपण, प्रसंगी आईची माया यातून नव्या नेतृत्त्वाला शिकण्यासारखे त्या बरेच काही देऊन गेल्या. त्यांनी सत्तेचा योग्य उपयोग करून सर्वसामान्यांपर्यंत ती नेली. पाकिस्तानमध्ये गेलेली मध्य प्रदेशमधील मूकबधीर मुलीला पुन्हा भारतात आणण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. स्वराज यांच्या निधनांचे वृत्त त्या मुलीला कळात तिच्या डोळ्यातून वाहत असलेले अश्रू स्वराज यांच्याबद्दल खूप काही सांगून जात होते. इतकेच नाहीतर भारतात इलाजासाठी येऊ इच्छिणार्‍या पाकिस्तानमधील अल्पवयीन मुलाला स्वराज यांनी केलेली मदत त्याचे आईवडिल विसलेले नाहीत. शत्रूराष्ट्रातही स्वराज यांनी त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण केली.

मोदींना हुंदका आवरला नाही..तर अडवाणी स्तब्ध होते

सुषमा स्वराज यांचे अकाली निधन देशवासीयांना चटका लावून गेले. हळुवार मनाच्या स्वराज प्रसंगी चंडिकेचे रूप धारण करून अन्यायाविरुद्ध पेटून उठायच्या. परराष्ट्रमंत्री असताना त्यांनी अनेकांना मदत केली. पक्षातही कोणाची तरी बेटी, कोणाची बहिण किंवा कोणाची तरी अक्का म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. त्यामुळे त्यांचे अंत्यदर्शन घेताना भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचे डोळे पाणावले. अनेकांना हुंदके आवरले नाहीत. धीरगंभीर मानले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना हुंदका आवरता आला नाही. तर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे एकटक स्वराज यांच्या पार्थिवाकडे पहात स्तब्ध होते.

स्वराज यांचे पार्थिव पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी जागच्या जागी हात जोडून उभे राहिले. त्यांचे डोळे पाणावले आणि हुंदकाही अनावर झाला. सुषमा स्वराज यांच्या कन्येच्या – बांसुरी स्वराज यांच्या डोक्यावर हात ठेवून मोदींनी त्यांना धीर दिला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि सुषमा स्वराज यांना गुरुस्थानी असलेले लालकृष्ण अडवाणी यांच्या मनातील दुःख त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवत होतं. सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाकडे ते एकटक पाहत होते. हे असे काही झाले आहे, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.

सुषमा स्वराज यांच्या निधनाने राजकारणातील तेजस्वी अध्याय समाप्त झाला आहे, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या. जनतेच्या सेवेसाठी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी आपले जीवन अर्पण करणार्‍या एका उल्लेखनीय नेत्याच्या निधनाबद्दल भारत दु: खी आहे. कोट्यवधी लोकांना प्रेरणा देणारं व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं. सुषमा स्वराज या जबरदस्त वक्त्या होत्या आणि उत्कृष्ट खासदार होत्या. पक्षाच्या पातळीवर त्यांचा नेहमीच आदर आणि सत्कार केला आहे. असे मोदी म्हणाले.

इसमें आपकी नही चलेगी

स्वराज यांनी पंतप्रधान मोदींनाही सुनावले होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकी-दरम्यान, बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याला दिलेल्या मुलाखतीत स्वराज यांचा एक किस्सा सांगितला, २०१४ साली पंतप्रधानपदी निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदी न्यूयॉर्कला संयुक्त राष्ट्रांची वार्षिक सभेत सहभागी होण्यासाठी गेले होते. भारताचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांचे संयुक्त राष्ट्रांमध्ये पहिले भाषण होते.

त्या भाषणाबद्दल पंतप्रधान मोदी सांगतात, ‘माझी एकच अडचण होती की मला अतिआत्मविश्वास होता. मी संयुक्त राष्ट्रांमध्ये देणार असलेल्या भाषणाचा आराखडा मनात तयार केला होता. मी जेव्हा संयुक्त राष्ट्रांमध्ये पोहचलो तेव्हा सुषमाजी तेथे अगोदरच आलेल्या होत्या. हॉटेलमध्ये पोहचल्यावर मी त्यांना भेटलो. त्यांनी मला माझ्या भाषणाबद्दल विचारल्यावर मी बघून घेईन, असे उत्तर दिले. पण स्वराज लगेच नाराज झाल्या. हे असे चालणार नाही, असे सुषमाजींनी मला खडसावले. मी पंतप्रधान असल्याने भाषण लिहून पाहीजे असे मला अधिकारी सांगू शकत नव्हते. पण सुषमाजींनी स्पष्टपणे नाही म्हटले. असे मनातले भाषण चालणार नाही. तुमच्याकडे लिहिलेलेच भाषण हवे, असे सुषमाजी म्हणाल्या.

त्यावर मी त्यांच्याशी वाद घातला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आम्ही सुमारे ३० मिनिटे वाद घालत होतो. पण सुषमाजी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. इसमें आपकी नही चलेगी, आपको माननाही पडेगा, असे सुषमाजींनी मला खडसावले. त्यानंतर माझे लिखित भाषण तयार करण्यात आले. ते लिहिले भाषण वाचून दाखवण्यात मला अडचणी आल्या, कारण मी लिहिलेले भाषण यापूर्वी कधीच वाचले नव्हते,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या मुलाखतीत सांगितले.

दिल्लीने एका वर्षात तीन माजी मुख्यमंत्री गमावले

सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने दिल्लीने एक वर्षापेक्षा कमी कालावधीत तीन माजी मुख्यमंत्री गमावले आहेत.

स्वराज या ऑक्टोबर ते डिसेंबर १९९८ या काळात दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तीनवेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचा याचवर्षी जुलै महिन्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दीक्षित आणि स्वराज यांचे एक महिन्याच्या कालावधीतच निधन झाले.

भाजपचे ज्येष्ठ नेते मदनलाल खुराण यांचे ऑक्टोबर-२०१८ मध्ये निधन झाले. ते १९९३ ते ९६ या कालावधीत दिल्लीचे मुख्यमंत्री होते.

मॅडम! तुझ्या मागे ४६ वर्षांपासून धावतोय
स्वराज कौशल यांचे भावनिक पत्र

सुषमा आणि स्वराज कौशल यांचा प्रेम विवाह. पंजाब विद्यापीठाच्या अंतर्गत येणार्‍या चंढीगडमधील लॉ कॉलेजमध्ये पहिल्यांदा या दोघांची भेट झाली. हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि अखेर घरच्यांची परवानगी मिळाल्यानंतर १३ जुलै १९७५ रोजी लग्न केले.

सुषमाजी राजकारणात तर स्वराज हे सुप्रीम कोर्टात वकील. त्यातच स्वराज यांना वयाच्या ३४ व्या वर्षी अ‍ॅडव्हकेट जनरल पदावर नियुक्त करण्यात आली होती. ते सर्वात कमी वयाचे अ‍ॅडव्हकेट जनरल ठरले. तर वयाच्या ३७ व्या वर्षी ते मिझोरमचे राज्यपाल झाले. त्यांनी १९९० ते १९९३ या तीन वर्षांसाठी राज्यपाल पद भूषवले. पती, पत्नी आपआपल्या क्षेत्रात बिझी. त्यामुळे एकांत नाही. संवादही अभावाने. त्यामुळे २०१९ साली जेव्हा सुषमाजींनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या स्वराज कौशल यांनी सुषमाजींना एक भावुक पत्र लिहिले. ते पत्र त्यावेळी खूपच व्हायरल झाले होते.

मूळ इंग्रजी असलेल्या त्या पत्रात स्वराज कौशल यांनी सुषमाजींचा उल्लेख मॅडम असा केला आहे. स्वराज म्हणतात, ‘मॅडम ! (सुषमा स्वराज) यापुढे निवडणूक न लढवण्याच्या तुझ्या निर्णयामुळे मी तुझा खूप आभारी आहे. मिल्खा सिंग यांनी यापुढे धावायचे नाही, असा निर्णय घेतला, त्याची मला आठवण झाली.’

‘तुझी राजकीय मॅरॅथॉन १९७७ पासून सुरू झाली म्हणजे ४१ वर्षे. तू ११ निवडणुका थेट लढवल्यात. खरं म्हणजे १९७७ सालापासून झालेल्या सर्वच निवडणुका तू लढवल्यात. अपवाद फक्त १९९१ आणि २००४ सालचा आहे. ज्यावेळी तुला पक्षानेच या दोन निवडणुका लढवू दिल्या नाहीत. तू चार टर्म लोकसभेत होतीस. तीन टर्म राज्यसभेत आणि विधान सभेवर तीनदा निवडून गेलीस. तुझ्या वयाच्या २५ व्या वर्षी तू निवडणूक लढवलीस आणि ४१ वर्षांपासून निवडणूक लढत आहे जे एका मॅरेथॉनपेक्षा कमी नाही.’

स्वराज यांनी ट्विटद्वारे जिंकली अनेकांची हृदये

सुषमा स्वराज या परराष्ट्रमंत्री असताना सेवेसाठी तत्पर असायच्या. त्यांना एक ट्विट केले की लगेचच त्यावर कार्यवाही होऊन त्या संबंधित व्यक्तीच्या मदतीला धावून जायच्या. त्यांच्या अशाच काही ट्विटने अनेकांची मने जिंकली

तुम्ही मंगळ ग्रहावर जी अडकले असाल तरी भारतीय दूतावास तुमची मदत करेल, असे ट्विट सुषमा स्वराज यांनी, जेव्हा एका ट्विटर युजरने ‘मी मंगळावर अडलोय,’ असे केलेल्या ट्विटच्या प्रत्युत्तरादखल केले होते.

मलेशियातील एक भारतीय व्यक्तीने, त्याच्या भारतातील मित्राला मलेशियात आणण्यासाठी स्वराज यांची ट्विटद्वारे मदत मागितली होती. मात्र त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये व्याकरणाच्या चुका होत्या. त्यावर अजून एका व्यक्तीने, त्या व्यक्तीला हिंदी किंवा पंजाबीत ट्विट करण्याचा सल्ला दिला. त्यावर उत्तर देताना स्वराज म्हणाल्या, ‘काही अडचण नाही. परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर मी इंग्लिश सर्वप्रकारच्या उच्चाराने, व्याकरणाने जाणून घेण्यास शिकले आहे.’

मला दोष असलेला फ्रिज विकण्यात आला, अशी तक्रार एका व्यक्तीने ट्विटरवरून स्वराज यांना केली होती. त्यावर स्वराज यांनी उत्तर दिले, ‘भाऊराया, मी फ्रीजच्या प्रकरणात तुझी मदत करू शकत नाही. मी सध्या मनुष्यांना थंड करण्याच्या कामात खूप व्यस्त आहे.’

स्वराज यांच्यावर एक ट्विटर युजरने, तुम्ही फक्त व्हिसाच्या अडचणीत सापडलेल्या मुस्लिमांना मदत करता, असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना स्वराज यांनी ट्विटरवर लिहिले, ‘भारत माझा देश आहे. सर्व भारतीय माझी माणसे आहेत. जाती, राज्य, भाषा, धर्म माझ्यासाठी महत्त्वाचा नाही.’

एका जोडप्याचा विरह दूर करण्याबाबत एका युजरने केलेल्या विनंतीवर सुषमा स्वराज यांनी ट्विट केले, ‘जर तुम्ही किंवा तुमची पत्नी माझ्या मंत्रालयाशी निगडीत असता आणि ट्विटरवर बदलीबाबत विनंती केली असती तर मी आतापर्यंत निलंबनाचे आदेश नक्कीच काढले असते.’

सुषमा यांनी केलेल्या या ट्विटवरून त्यांचा हजरजबाबीपणा दिसून येतो. इतकेच नाहीतर त्यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून मदतीची याचना करणार्‍यांना त्या आश्वासित करत होत्या.

चार दिवसांपूर्वी आमची भेट झाली आहे. आमची भेट अत्यंत कौटुंबिक स्वरुपाची होती. अडीच ते तीन तास आम्ही छान गप्प मारल्या. संसदेचे कामकाज संपल्यावर पुरणपोळी आणि उकडीचे मोदक खायला येते असे सुषमा स्वराज यांनी म्हटले होते. मुंबईतला पाऊस कमी झाला की दिल्लीतील घरी पुरणपोळी आणि उकडीच्या मोदकाचा बेत करायचा ठरला होता. मात्र हा बेत अपूर्णच राहिला. – संजय राऊत, शिवसेना नेते

सुषमा स्वराज यांचे अचानक निधन झाल्याचे एकून अत्यंत दुःख झाले. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी आपली एक वेगळी छाप सोडली. त्या उत्कृष्ट संसदपटू होत्या, हिंदी भाषेवर तर त्यांचे निर्विवाद प्रभुत्व होते. विरोधी पक्ष नेता असताना सत्ता पक्षातील नेत्यांशी त्याचे सौहार्दाचे संबंध होते. – पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. संकटात सापडलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी त्या धावून जायच्या! अगदी एक नर्स असेल तरी. त्यांचे योगदान भारतीय नेहमी लक्षात ठेवतील.
– पियुष गोयल, केंद्रीय रेल्वे मंत्री

सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. सुषमाजी यांच्या जाण्याने अभ्यासू, कर्तृत्ववान नेतृत्व देशाने गमावले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. – सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -