घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआमदारांना 10 हजारांचे टार्गेट; शिंदेंच्या सैनिकांची जय्यत तयारी

आमदारांना 10 हजारांचे टार्गेट; शिंदेंच्या सैनिकांची जय्यत तयारी

Subscribe

नाशिक : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याप्रमाणे शिंदे गटानेही मुंबईत दसरा मेळाव्याचे आयोजन केलेले असताना पक्षातील प्रत्येक आमदाराला 10 हजार शिवसैनिक मुंबईत घेवून येण्याचे ‘टार्गेट’ मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातून किमान 15 हजार कार्यकर्त्यांना मुंबईत घेवून जाण्याची तयारी आमदार व खासदारांनी केली आहे.

दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावर होतो. त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून शिवसैनिक हे मुंबईत दाखल होतात. ठाकरे आणि दसरा मेळावा हे जणू समिकरणच मुंबईत तयार झालेले असताना आता शिवसेनेच्या शिंदे गटानेच ठाकरेंना आव्हान दिले आहे. मुंबईतील एमएमआरडीए मैदानावर शिंदे गटाचा मेळावा बुधवारी (दि.5) आयोजित करण्यात आला आहे. मुंबई शहरातील पाच मोठी मैदाने शिंदे गटाने घेतली आहेत. काही मैदानांवर पार्किंग केली जाईल. तर बीकेसी सारख्या मैदानावर ‘एलईडी स्क्रीन’द्वारे ‘शिंदे’ सैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

- Advertisement -

याशिवाय मुंबईच्या महत्वाच्या प्रत्येक चौकात स्क्रीन लावली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे विचार प्रत्येक शिवसैनिकापर्यंत पोहोचवण्याचे चोख नियोजन केले आहे. गटातील 50 आमदारांना प्रत्येकाच्या मतदारसंघातून प्रत्येकी 10 हजार कार्यकर्त्यांना मुंबई घेवून येण्याचे ‘टार्गेट’ दिले आहे. तर मराठवाड्यातील शिवसैनिकांसाठी 5 विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे. प्रत्येक आमदाराकडून येणार्‍या वाहनांची व्यवस्था करण्यासाठी सुक्ष्म नियोजन केले आहे. प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत जेवणाची व्यवस्था कशी पोहोचेल याचेही काळजी घेतली आहे.

नाशिक जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आहेत. तसेच खासदार हेमंत गोडसे व स्थानिक प्रतिनिधींनी गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. जास्तीत जास्त ‘शिंदे’सैनिकांना मुंबईत घेवून जाण्यासाठी आढावा बैठकही घेण्यात आली. त्यानुसार नाशिकमधून साधारणत: 15 हजार शिवसैनिक मुंबईला जातील, असे नियोजन सुरु आहे.

- Advertisement -

ठाकरेंच्या फलकावर दिघे

मुंबईत शिवसेना ठाकरे गटानेही दसरा मेळाव्याचे फलक झळकावले आहेत. मुंबईतील महत्वाच्या चौकात लावलेल्या फलकांवर हिंदुह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोनंतर धर्मवीर आनंद दिघे यांचाही फोटो प्रसिध्द केला आहे. ठाकरेंच्या फलकावर प्रथमच दिघेंचा फोटो झळकल्याची टिका शिंदे गटाने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -