घरCORONA UPDATEनगरमध्ये आणखी ६ कोरोनाबधित, संगमनेरच्या दोघांचा समावेश

नगरमध्ये आणखी ६ कोरोनाबधित, संगमनेरच्या दोघांचा समावेश

Subscribe

जिल्हा प्रशासनाला पुण्याच्या एनआयव्हीकडून गुरुवारी दुपारी ५१ अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ६ जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये संगमनेरमधील दोघांचा, नगरमधील दोघांचा आणि नेवाशात सापडलेल्या परदेशी नागरिकांपैकी दोघांचा समावेश आहे. आता नगरची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४ झाली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंता वाढल्या असून आता अधिक कठोर पावले उचलली जाण्याचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्रमध्ये कोरोनाबधितांची संख्या वाढत असताना अहमदनगरमध्ये देखील गुरुवारी ६ रुग्णांची भर पडली आहे. यातील दोघेजण दिल्लीतील निजामुद्दीनमधील मेळाव्यात सहभागी होते.

१७ वर्षांच्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण

नगरमध्ये सापडलेल्या पहिल्या रुग्णाला रुग्णालयातून  डिस्चार्ज मिळाल्यानंतर, लगेच दोन परदेशी रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे नगरची संख्या पाचवर गेली. त्यापाठोपाठ जामखेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले होते. आता गुरुवारी प्रशासनाला ८१ पैकी ५१ लोकांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये ६ जण बाधित सापडले आहेत. यात सापडलेल्या दोघा परदेशी व्यक्तींपैकी एक इंडोनेशिया आणि दुसरा जिबुटी येथील असून हे सर्व बाधित १७ ते ६८ वर्षे वयोगटातील आहेत. यासंदर्भात जिल्हा आरोग्य विभागाने माहिती दिली.

- Advertisement -

पुण्याला पाठवले होते नमुने

दोन परदेशी नागरिकांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आल्याच्या कारणावरून संगमनेरमधील १५ जणांना प्रशासनाने तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. या सर्वांची जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते. यातील दोघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. संगमनेरच्या प्रशासकीय यंत्रणेनेदेखील याला दुजोरा दिला आहे. संगमनेरमधील १५ लोकांना नगरला हलवल्यानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची चर्चा सोशल मीडियावरून सर्वत्र पसरविण्यात आली होती. या चर्चेला आजच्या अहवालाने पूर्णविराम मिळाला
असला तरी संगमनेरात दोन बाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे.

परदेशी नागरिकांमार्फतच कोरोनाचा फैलाव

याशिवाय नगरमध्ये प्रशासनाने धरपकड केलेल्या परदेशी नागरिकांपैकी एकूण ४ जणांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे आणि परदेशी नागरिकांमार्फतच याचा जिल्ह्यात फैलाव झाल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या मोठ्या
प्रमाणात वाढू लागल्याने आता प्रशासनासमोरील चिंता देखील वाढत आहेत. संगमनेरच्या सापडलेल्या बाधित व्यक्तींच्या संपर्कात आणखी कोण कोण लोक आलेत, याचा शोध घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. याशिवाय संचारबंदीच्या काळात फिरणाऱ्या रिकामटेकड्यांवर देखील कठोर कारवाई करावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -