घरमहाराष्ट्रपालघरमधून 90 लाखांचा गुटखा जप्त

पालघरमधून 90 लाखांचा गुटखा जप्त

Subscribe

सहा जण अटकेत,पाच गाड्या जप्त

पालघर पोलिसांनी मंगळवारी दिवसभरात केलेल्या धडक कारवाईत जिल्हाभरातून तब्बल 90 लाखांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. तसेच यावेळी गुटखा वाहतूक करणार्‍या पाच गाड्या जप्त करून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्रात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे. पण, गुजरातहून मुंबई-अहमदाबाद हायवेवरून मुंबईत गुटख्याची मोठ्या प्रमाणावर चोरटी वाहतूक होत असल्याचे कारवाईवरून उजेडात आले आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने वसईत दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल 76 लाख 75 हजार 390 रुपयांचा गुटखा जप्त केला. मुंबई-अहमदाबाद हायवेवरील मालजीपाडा येथील एका गोदामावर टाकलेल्या धाडीत तब्बल 72 लाख 49 हजार 380 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. यावेळी गुटखाची वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेण्यात आला. तसेच टेम्पोचालक इम्रान खान (24, रा. भाईंदर) याला अटक करण्यात आली. मालजीपाडा परिसरात अनेक गोदामांमध्ये गुटखा साठवला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. याच पथकाने तुळींज येथे एका टेम्पोतून नेण्यात येणारा 4 लाख 26 हजार रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. यावेळी टेम्पोचालकाला अटक करण्यात आली.

- Advertisement -

महाराष्ट्रात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे. असे असतानाही गुजरातहून मोठ्या प्रमाणावर गुटखाची चोरटी वाहतूक होत असते. गुजरातहून एका कारमध्ये लपवून आणलेला 4 लाख 90 हजार रुपयांचा गुटखा कासा पोलिसांनी चारोटी टोलनाक्यावर तपासणी करताना जप्त केला आहे. यावेळी पोलिसांनी आरीफ करीम (26) आणि आशिफ मंजिल (40) या दोघांना अटक केली. दोघेही भिवंडीचे रहिवाशी असून गुटखा वाहून नेणारी कारही जप्त करण्यात आली आहे.

मुंबई-अहमदाबाद हायवेवरील खानिवडे टोलनाक्यावर तपासणी सुरु असताना एका कारमधून 6 लाख 43 हजार 408 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. विरार पोलिसांनी केलेल्या कारवाईत कारचालक महेंद्र नारायण गर्ग (22, रा. सफाळे, पालघर) याला अटक करून गाडी जप्त केली.

- Advertisement -

वालीव पोलिसांनी वालीव गावातील नाईकपाडा येथील ठाकूर मोतीबाई चाळीत राहणार्‍या अशोक गुप्ता (40) याच्या घरातून 97 हजार 722 रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी गुप्ताला अटक करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -