घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रविम्याच्या चार कोटींसाठी काढला मित्राचाच काटा; मयतही होता कटात सहभागी

विम्याच्या चार कोटींसाठी काढला मित्राचाच काटा; मयतही होता कटात सहभागी

Subscribe

नाशिक : मित्राचा खून करुन अपघात झाल्याचा बनाव रचून सहा जणांनी संगनमताने विम्याचे चार कोटी रुपये हडपल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, मृत अशोक भालेराव देखील या कटात सहभागी होता. त्याने मित्रांच्या मदतीने नियोजनबद्ध प्लॅन करुन त्याच्या जागेवर दुसर्‍या व्यक्तीला मृत दाखवत वारस लावलेल्या महिलेला विम्याची रक्कम देण्याचा कट आखला होता. मात्र, अनोळखी व्यक्तीच मिळत नसल्याने मित्रांनीच अशोकचा खून करत त्याच्या नावे असलेला तब्बल 4 कोटी 10 लाखांचा विमा क्लेम करत आपआपसात वाटून घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

मुंबईनाका पोलिसांनी मुख्य संशयित मंगेश बाबूराव सावकार (रा. सम्राट नगर दिंडोरीरोड), रजनी कृष्णकांच उके (रा. रासबिहारी लिंक रोड), दीपक अशोक भारुडकर (रा. विनयनगर, नाशिक), किरण देविदास शिरसाट (रा. दिपाली नगर, नाशिक), हेमंत शिवाजी वाघ, प्रणव राजेंद्र साळवी (रा. बुधवार पेठ, भद्रकाली) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 स्प्टेंबर 2021 रोजी रात्री इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक येथे रस्त्याच्या कडेला झाडीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या तपासात मृत अशोक सुरेश भालेराव (वय 46, रा. देवळाली कॅम्प भगूर रोड) असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर अनोळखी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने सहा संशयित आरोपांना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

..अन् कटाचे बिंग फुटले

बँक खात्यात विम्याचे चार कोटी 10 लाख रुपये होते. ही बाब अन्य एका महिलेला समजली. तिने मृत अशोक भालेरावच्या भावाला ही माहिती दिल्यानंतर या कटाचे बिंग फुटले. त्याने पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी वेगाने तपास करत सहा संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या. संशयित मंगेश सावकारकडून पोलिसांनी एक पिस्टल व सहा जिवंत काडतुसे जप्त केले आहेत.

- Advertisement -
घटनाक्रम 

मृत अशोक भालेराव व संशयित सहा जणांनी 2017 मध्ये भालेरावच्या नावावर चार कोटी रुपयांचा विमा काढला. विम्याची रक्कम हडप करण्यासाठी भालेरावच्या मृत्यूचा बनाव करत त्याच्या नावे असलेल्या चार कोटींचा विमा लाटण्यासाठी संशयित महिला चारुशिला अशोक भालेराव हिला वारस लावले. भालेरावच्या जागी दुसर्‍या व्यक्तीला मृत दाखवण्याचा कट होता. मात्र, दुसरा व्यक्ती मिळत नसल्याने संशयित आरोपींनी भालेरावचाच खून करत विम्याची रक्कम हडपली. चारुशिला भालेराव उर्फ रजनी उके या महिलेच्या बँक खात्यात विम्याचे चार कोटी 10 लाख रुपये आले होते. मात्र, हे खाते मंगेश सावकारच ऑपरेट करत होता. इतर संशयितांना ऑनलाईन, फोन पे द्वारे 10 ते 20 लाख रुपये वाटप केले होते. महिलेला 46 लाख रुपये देण्यात आले होते. उर्वरीत सर्व रक्कम मंगेशच्या ताब्यात होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -