घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीतील संभाव्य फुटीने भाजपा-शिंदे गटात अस्वस्थता, सत्तासमीकरण बदलणार!

राष्ट्रवादीतील संभाव्य फुटीने भाजपा-शिंदे गटात अस्वस्थता, सत्तासमीकरण बदलणार!

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition leader Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत संभाव्य फूट पडणार असल्याच्या चर्चेने भाजपा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात अस्वस्थता पसरली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे डोळे लावून मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाजपा आणि शिंदे गटातील आमदारांना अजित पवार खरेच भाजपमध्ये आले तर आपले काय? अशी चिंता सतावू लागली आहे.

कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ’पक्ष’ म्हणून आम्ही भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP chief Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच शरद पवारांची भेट घेतली, त्यावेळी शरद पवार यांनी हे वक्तव्य केले. आता अजित पवारांनी भाजपाला साथ देण्याचा निर्णय घेतला तर, सत्तेचे समीकरण बिघडणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थिर असताना अजित पवारांना सोबत घेण्याची घाई करू नये, असे भाजपा आणि शिंदे गटातील आमदारांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात अजित पवार हे नॉट-रिचेबल होते. तेव्हापासून ते भाजपासोबत जाणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षात फूट पडू शकते यांची कल्पना उद्धव ठाकरे यांना दिल्यानंतर अजित पवार यांच्या बंडाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. खुद्द अजित पवार यांनी आपण अमित शाह यांची भेट घेतली नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशातच भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांकडून अजित पवार आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागत आहे, असे विधान करून अजितदादांविषयी संभ्रम आणखी वाढवला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून राज्यात सत्ता परिवर्तन केले. सत्ता बदलानंतर जवळपास 40-42 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रिमंडळ विस्तार होऊन 18 जणांना कॅबिनेट मंत्री बनविण्यात आले. तेव्हापासून भाजपा आणि शिंदे गटातील इच्छुकांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. पण आता विस्तार बाजूला राहिला आणि अजित पवार यांच्या भाजपासोबत जाण्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपातील काही नेतेही हवालदिल झाले आहेत. अजित पवारांनी भाजपाशी हातमिळवणी केली तर, त्यांना आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या आमदारांना सत्तेत वाटा द्यावा लागले. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांना नाईलाजाने सत्तात्याग करावा लागू शकतो. विधानसभा निवडणुकीला जेमतेम वर्ष-दीड वर्ष शिल्लक असताना अजित पवारांसाठी सत्तेवर पाणी सोडण्याची बहुतांश आमदारांची तयारी नाही. या पार्श्वभूमीवर भाजपाला स्वकीयांची नाराजी पत्करून अजित पवारांना सत्तेत बसवावे लागेल.

- Advertisement -

शरद पवार यांनी कुणी काहीही निर्णय घेतला तरी आपण महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजित पवार दोन तृतीयांश आमदार सोबत घेऊन बाहेर पडण्यात यशस्वी होतील किंवा कसे, याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. आजच्या घडीला 15 ते 16 आमदार अजित पवारांना साथ देऊ शकतात, असा अंदाज आहे. त्यात धनंजय मुंडे (परळी), आदिती तटकरे (श्रीवर्धन), अनिल पाटील (अमळनेर), दिलीप बनकर (निफाड), माणिकराव कोकाटे (सिन्नर), अण्णा बनसोडे (पिंपरी), संजय बनसोडे (उदगीर), सुनील भुसारा (विक्रमगड), यशवंत माने (मोहोळ), नितीन पवार (कळवण), बाबासाहेब पाटील (अहमदपूर), सुनील शेळके (मावळ), संदीप क्षीरसागर (बीड) या विधानसभा आमदारांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -