राष्ट्रगीत सुरू असतानाच भारत-चीन युद्धातील सैनिकाचा मृत्यू

नाशिक : सातपूरला मौले हॉलच्या पाठीमागील संदीप नगरात एका खासगी शाळेत आझादी का अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित माजी स्वातंत्र्य सैनिक चंद्रभान मालुंजकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सातपूर मधील एका खासगी शाळेत आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ माजी स्वातंत्र्य सैनिक चंद्रभान मालुंजकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, राष्ट्रगीत सुरू असतानाच अस्वस्थ वाटून लागल्याने मालुंजकर हे भोवळ येऊन पडले. राष्ट्रभक्ती अंगी भिनलेल्या या ८१ वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाने कार्यक्रमापूर्वी प्रभातफेरी अन् विविध राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. मात्र, राष्ट्रगीता दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांसह विविध मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. सर्वांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने परिसरासह संपूर्ण नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली गेली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुली, जावई असा परिवार आहे.

भारत चीन युद्धात सहभाग

चंद्रभान मालुंजकर यांचा १९६२ साली भारत आणि चीन यांच्यात झालेल्या युद्धात सहभाग होता. तरुण वयापासूनच त्यांना देशसेवेचे वेड होते. निवृत्तीनंतर अनेक वर्षे ते भारतीय जनता पक्षाचे संघटक म्हणून काम पाहात होते. अत्यंत शीस्तप्रीय आणि धार्मिक पगडा असलेले मालुंजकर यांना राष्ट्रगीता दरम्यानच मृत्यूने कवटाळले.