सर्वत्र मद्यप्रेमींची झुंबड आशा निराशेचा खेळ!

तळीरामांच्या हाती दंडुक्याचा प्रसाद

सोमवारपासून दारुची दुकाने उघडणार म्हणून धुंदीत असलेल्या तळीरामांच्या मद्याच्या पेल्यात मात्र प्रत्यक्षात साखरेचा खडा पडला. केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, अबकारी विभाग यांच्यात असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे राज्यात अनेक ठिकाणी वाईन शॉप खुली झालीच नाही. मुंबई, पुणे, नाशिकात जी काही मोजकी वाईन शॉप सोमवारी उघडली त्यांच्याबाहेर तळीरामांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पुण्यात आणि नाशिकामध्ये दारू खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. नाशिकमध्ये पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासमोरच हा प्रकार घडला. त्यामुळे नाशिकच्या जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुढील आदेश येईपर्यंत नाशिकमधील सर्व दारूची दुकाने बंद ठेवली आहेत. तर मुंबईत मोजकीच वाईन शॉप उघडल्याने आणि त्यांच्याबाहेर प्रचंड मोठी रांग लागल्याने धुंदीत असलेले अनेक तळीराम पुन्हा शुद्धीत आले.

सोमवारपासून दारूची दुकाने उघडणार अशी बातमी रविवारी धडकली. मात्र दारूची दुकाने उघडण्याबाबत परवानगी कोणी दिली, असा प्रश्न उपस्थित झाला. केंद्र सरकारने, राज्य सरकारांना त्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले असताना ही परवानगी राज्य सरकारने दिल्याचे उघड झाले. मात्र राज्य सरकारने दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी महामारी प्रतिबंधक कायद्यानुसार अंतिम निर्णय जिल्हाधिकार्‍यांचा असतो. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली का, असा गोंधळ उडाला होता. त्यातच अबकारी खात्याकडून दारूची दुकाने उघडण्याबाबत स्पष्ट काहीच करण्यात आलेले नव्हते. या सरकारी यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे आणि फक्त दोन तासांसाठीच दारुची दुकाने उघडी राहणार असल्याच्या अफवेमुळे मुंबईतील दारूची सर्व दुकाने उघडलीच नाहीत. त्यामुळे जी काही मोजकी दुकाने उघडण्यात आली होती. त्यांच्यासमोर एकच झुंबड उडाली होती.

सोमवारी राज्यातील दारूची दुकाने सुरु करण्यास सरकारने परवानगी दिल्याने मद्यपींमध्ये एक प्रकारचा उत्साह संचारला होता. आपल्याला दारू मिळावी यासाठी अनेकजण रविवारी रात्री अलार्म लावून झोपले होते. त्यामुळे पहाटेपासूनच अनेक दारूच्या दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. मात्र दारूची दुकाने सुरु करण्यासंदर्भातील आदेश दुकान मालकांना न मिळाल्याने त्यांनी दुकाने उघडली नाहीत. त्यामुळे दारूच्या दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे या रांगा दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लांब पसरल्या होत्या. दुपारनंतर काही ठिकाणी दुकाने उघडण्यात आली तर काही ठिकाणाची दुकाने सुरूच झाली नाहीत. त्यामुळे ज्या ठिकाणी दुकाने सुरु झाल्याची माहिती कळताच मद्यपींची तिकडे धाव घेतली.

कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील दारूचे दुकान सुरु असताना पूर्वेकडील तसेच नेहरूनगर, साकीनाका या परिसरातील दुकाने सुरु न झाल्याने येथील मद्यपींनी कुर्ला पश्चिमेला धाव घेतल्याने या स्टेशन परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत होती. त्याचप्रमाणे काही ठिकाणी दारूचे दुकान दुपारी दोन वाजता सुरु होतील, असे सांगत ४ वाजेपर्यंत दुकानेच सुरु करण्यात आली नाहीत. त्यामुळे अनेक मद्यपी सकाळपासून रांगेत ताटकळत उभे राहिले होते. पूर्व उपनगरातील घाटकोपर, भांडुप, मुलुंड, कुर्ला याठिकाणी वाईन शॉपच्यासमोर रांगा लागल्या होत्या. तर पश्चिम उपनगरातही माटुंगा, माहीम, वांद्रे, अंधेरी, मालाड तसेच शिवाजी पार्क, काळाचौकी, लालबाग, भायखळा, गिरगाव येथे दारूची दुकाने उघडल्याने तेथे मोठ्या प्रमाणात रांगा दिसत होत्या. लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावे यासाठी दुकानाबाहेर ठराविक अंतरावर रिंगण करण्यात आले होते.

या रिंगणात उभे राहिलेल्यांनाच दारूच्या बाटल्या दिल्या जात होत्या. काही ठिकाणी मद्यपींनी स्वत:च सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत दारू खरेदी केली. पण काही ठिकाणी मद्यपींनी सोशल डिस्टंसिंग न पाळल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे मालाड, डोंबिवलीतील मानपाडा आणि विष्णू नगर येथे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दुकाने उशिरा सुरु झाली असली तरी ती वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी असल्याने अनेकांची घोर निराशा झाली. त्यामुळे दारूच्या दुकानावर ‘थोडी खूशी, थोडे गम’चे वातावरण सायंकाळी ५ नंतर पाहायला मिळाले.

कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारली
राज्य सरकारने दारूची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई शहराच्या पोलिसांनी दारूची दुकाने सुरु करण्यास परवानगी नाकारल्याने या शहरामध्ये दारूची दुकाने उघडण्यात आली नाही. आमच्या भागात करोना आटोक्यात आणण्यात आला आहे. दारूची दुकाने उघडल्यास करोनाला रोखणे शक्य होणार नाही असे सांगत दारूची दुकाने उघडण्यास पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारली. डोंबिवलीमध्ये काही ठिकाणी दुकाने उघडण्यात आली, मात्र नागरिकांनी गर्दी केल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करत ही दुकाने बंद केल्याने मद्यपींची निराशा झाली.

दारूच्या दुकानांना परवानगी दिल्याने वैद्यकीय क्षेत्रात नाराजी
करोनाचा सामना करण्यासाठी व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असणे आवश्यक आहे. परंतु दारूची दुकाने उघडल्याने होणार्‍या गर्दीमुळे करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होईल तसेच दारूमुळे नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होईल. त्यामुळे अधिक लोकांना करोनाची लागण होईल तसेच करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढेल अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत होती.

दारूबरोबरच वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी रांगा
सोमवारी दारू खरेदीसाठी मुंबईत रांगा लागल्या असताना राज्य सरकारने परराज्यातील मजुरांना घरी जाण्याची परवानगी दिल्याने वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी डॉक्टरांच्या क्लिनिकबाहेर मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. परराज्यात जाणार्‍या मजुरांना वैद्यकीय प्रमाणपत्राबरोबरच पोलीस ठाण्यात अर्ज करायचा असल्याने अर्जासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी मुंबईत डॉक्टरांच्या क्लिनिक बाहेर रांगा लागल्या होत्या.

दारू बंदीचा निर्णय कायम
तिसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये दारूची दुकानं आणि अनावश्यक वस्तूच्या दुकानांवरील बंदी हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु सोलापूर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये अद्यापही दारू बंदीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. करोना व्हायरसचा संसर्ग अधिक फैलावू नये यासाठी प्रशासनाने पुढील निर्देश दिल्यानंतर येथील दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहेत. नागपूरमध्ये शहरी भागात दारू विक्रीवरील बंदी कायम ठेवण्यात आली असून ग्रामीण भागात मात्र दारू विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.

आठ कॉटर रिचवणार
दोन महिन्यांची कसर काढण्यासाठी सात ते आठ कॉटर आज रिचवणार आहे. चार किलो मटन घेणार असून दोन किलो मटनाची भाजी करणार आहे. कांदा, लिंबू अन् मटनाची भाजी अगदी चुरुन मुरुन त्यावर ताव मारणार आहे. एवढे सगळे खाल्ल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी मी उठणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.