घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र..आणि नशीब पालटल! मेरिट अन् वेटिंग लिस्टमध्ये नाव नसतानाही हा तरुण झाला...

..आणि नशीब पालटल! मेरिट अन् वेटिंग लिस्टमध्ये नाव नसतानाही हा तरुण झाला ‘पोलीस’

Subscribe

नाशिक : नशीब बलवत्तर असल्यावर नशिबाचे फेरेही फिरू शकतात, असा अद्भूत अनुभव चांदवड तालुक्यातील ऊसवाड येथील २७ वर्षीय संकेत अरुण बिडकर या तरुणास आला. नाशिक ग्रामीण पोलीस भरतीत चालक पदासाठी संकेतने अर्ज भरला खरा; मात्र या जागेवर अन्य उमेदवारांची निवड झाली. संकेतचा नंबर प्रतीक्षा यादीतही नव्हता. परंतु, असा चमत्कार घडला की, ज्याची निवड झाली, त्याने ऐनवेळेला काम करण्यास असहमती दर्शवली. तर प्रतीक्षा यादीतील दोघांनीही ही नोकरी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्या पाठोपाठ असलेल्या संकेतची निवड पोलीस शिपाई चालक पदासाठी झाली. काही दिवसांपूर्वीच्या हालचालींमुळे अतिशय खचून गेलेल्या संकेतच्या आयुष्यात या अद्भूत घडामोडींमुळे नवी उमेद मिळाली आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस दलातील 164 पोलीस शिपाई आणि 15 पोलीस शिपाई चालक पदांसाठी 2 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरतीप्रक्रिया पार पडली. यामध्ये 21 हजार 49 उमेदवारांच्या भरती प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले होते. यात पुरुष उमेदवार 18 हजार 935, महिला 2 हजार 114 आणि तृतीयपंथी तीन उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 14 हजार 326 उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून मैदानी चाचणी दिली. त्यातील 12 हजार 266 उमेदवार शारीरिक मोजमापे व कागदपत्रे पडताळणीत पात्र ठरले होते. लेखी परीक्षेच्या निकालानंतर १६४ पोलीस शिपाई व १५ पोलीस शिपाई चालक पदासाठी उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षायादी प्रसिद्ध करण्यात आली होती.

- Advertisement -

ऊसवाडच्या संकेतने नाशिक ग्रामीण पोलीस भरतीत पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज भरला होता. भरतीसाठी जीवाची बाजी लावली होती. दिवसरात्र फक्त पोलीस होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून तयारी करत होता. पोलीस भरतीमध्ये मैदानी आणि लेखी परीक्षा संकेत सोपी गेली होती. त्याला भरती होईल असे वाटत होते. मात्र, निकाल आणि प्रतिक्षायादीत त्याचे नाव न आल्याने तो निराश झाला होता. प्रतिक्षायादीतील एनटी-सी वर्गाच्या पहिल्या उमेदवारा मैदानी परीक्षेत ४७ आणि लेखी परीक्षेत ९३ असे एकूण १४० गुण मिळाले होते. दुसर्‍या उमेदवारास मैदानी परीक्षेत ४४ आणि लेखी परीक्षेत ९४ असे एकूण १३८ गुण मिळाले होते. तर संकेतला मैदानी परीक्षेत 45 आणि लेखी परीक्षेत ९३ गुण असे एकूण १३८ गुण मिळाले होते.

तीन उमेदवारांनी एनटी-सी वर्गातील चालकपदाची नोकरी नाकारल्याने ती जागा रिक्त झाली होती. ही बाब संकेतला समजली. त्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात येत वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करत संधी मिळावी, अशी विनंती केली. तसेच, त्याने पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडेसुद्धा संधी मिळण्याबाबत विनंती केली. पोलीस अधीक्षक उमाप यांनी त्याला संधी मिळण्याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्ताव महासंचालक कार्यालयाकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे संकेत आता पोलीस होणार आहे.

- Advertisement -

आत्महत्येचे विचार येत होते..

पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून जीवापड मेहनत घेतली होती. चांदवड तालुक्यातील ऊसवाडचा असल्याने धावण्यासह लेखी परीक्षेची भरपूर तयारी केली होती. एनटी-सी वर्गातून अर्ज भरला होता. पोलीस भरतीची परीक्षा झाली तेंव्हा वाटले होते यादी नाव येईल. पण यादीत नाव आले नाही. त्यानंतर प्रतिक्षायादी जाहीर झाली. त्यामध्येही नाव आले नाही. त्यामुळे खूप निराश झालो होतो. दरम्यान, निवड झालेल्या आणि प्रतिक्षायादीतील उमेदवारांनी पोलीस शिपाई चालक पदाची नोकरी नाकारल्याचे समजले. त्यामुळे पुन्हा जोमाने तयारी सुरु केली. आता नाहीतर परत कधीच नाही, अशी मनाशी खूणगाठ बांधून संधी मिळत असल्याची बाब वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. ही बाब पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांना समजताच त्यांनीही तात्काळ पोलीस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आणखी निराश झालो होतो. डी. एड. प्रवेश मिळाल्याने शिक्षण सुरु करायचे की वाट पाहत बसायचे, काही समजत नव्हते. सर्व नशीबावर सोडून दिले होते. अनेक पोलिसांशी संधी मिळेल का, याबाबत चर्चाही केली. अनेकांची चांगले सल्लेही दिले. काहींनी शिक्षणकडे लक्ष असेही सांगितले. त्यामुळे खचून गेलो होतो. आत्महत्येचे विचार डोक्यात येत होते. मात्र, पोलीस अधीक्षकांनी पाठविलेल्या प्रस्तावाची वाट पाहत होते. आता महासंचालक कार्यालयाकडून मान्यता मिळाल्याचे पोलिसांकडून समजल्याने धीर आला आहे, असे संकेत बिडकरने ‘माय महानगर’शी बोलताना सांगितले.

या कारणामुळे झाली होती जागा रिक्त

  • निवड झालेल्या उमेदवाराची नाशिक ग्रामीणमधील चालकपदासह शिपाईपदी निवड झाली होती. त्यामुळे त्या उमेदवाराने चालक पदाची नोकरी सोडली.
  • प्रतिक्षा यादीतील पहिल्या उमेदवाराची नाशिक ग्रामीण दलासह नवी मुंबई पोलीस दलात निवड झाली. त्यामुळे त्याने नवी मुंबईची निवड करत नाशिक ग्रामीण दलातील चालकपदाची नोकरी सोडली.
  • दुसर्‍या उमेदवाराची जन्मतारीख २९ जानेवारी १९९४ आणि संकेतची जन्मतारीख १५ ऑगस्ट २००० असल्याने दुसर्‍या उमेदवाराची वय अधिक असल्याने निवड करण्यात आली होती.
  • मात्र, दुसर्‍या उमेदवाराची नाशिक ग्रामीणमधील चालकपदासह शिपाईपदी निवड झाली. त्यामुळे त्या उमेदवाराने चालक पदाची नोकरी सोडली. त्यामुळे संकेतला संधी मिळाली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -