घरताज्या घडामोडीपुढचा राजीनामा कोणत्या मंत्र्यांचा ? सांगत अधिवेशन ठप्प पाडण्याचे चंद्रकांत पाटलांचे संकेत

पुढचा राजीनामा कोणत्या मंत्र्यांचा ? सांगत अधिवेशन ठप्प पाडण्याचे चंद्रकांत पाटलांचे संकेत

Subscribe

नवाब मलिक यांच्याकडून सर्व खाती काढून घेण्यात आली आहेत. त्यामुळेच नवाब मलिक हे आता फक्त टेक्निकल पद्धतीने मंत्री उरले आहेत. आता अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी करत सोमवारपासून अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाचा मुद्दा ठोस आश्वासन मिळेपर्यंत सभागृहात लावून धरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच एमआयएमच्या शिवसेनेसोबतच्या युतीच्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिक टेक्निकली मंत्री 

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात केंद्रीय हरित लवादाकडूनच गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या दापोलीच्या रिसॉर्टवर ऑन पेपर गोष्टी अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी येत्या सोमवारपासून अधिवेशनात लावून धरणार आहोत. जोवर अनिल परब राजीनामा देणार नाहीत, तोवर सदनाचे कामकाज चालू देणार नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. नवाब मलिक यांच्याकडून राष्ट्रवादीने खाती काढून घेतली आहेत. त्यामुळेच तांत्रिकदृष्ट्या फक्त ते मंत्री राहिले आहेत, त्याला काही अर्थ नसल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी २ हजार कोटी

राज्यातील मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, एससी एसटी पदोन्नती यासारख्या अनेक विषयांच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारविरोधात लोकांच्या मनात असंतोष आहे. इतकच काय तर शिवसेनेला कमी निधी वाटपामुळे आमदारांमध्येही असंतोषाचे वातावरण असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवसेनेच्या या नाराज २५ आमदारांची मनधरणी करण्यासाठी बैठका झाल्या. कारण या आमदारांनी निधी मिळत नसल्याने नाराजीचा सूर व्यक्त केला. अखेर २ हजार कोटी या आमदारांची नाराजी घालवण्यासाठी देण्यात आल्याचे ठरले. आमदारांच्या बाबतीत रावसाहेब दानवे जे बोलले ते अगदी योग्य आहे. त्यामुळे आगामी काळात तसेच घडतानाही दिसेल असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

एमआयएमच्या शिवसेनेच्या युतीसोबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, अशा युतीमुळे भाजपला काही विशेष फरक पडणार नाही. भ्रष्टाचाराविरोधात कर्दनकाळ म्हणून भाजपची ओळख आहे. त्यामुळेच अनेक लोक एकत्र येत हातात हात घालत आहेत. पण आमच्यासोबतही घटक पक्षांची मजबूत अशी एकी आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -