घरक्राइम"त्या" जागेवर आधीच केली होती दुसरी नियुक्ती; तरी निलंबित मुख्याध्यापकाकडे लाचेची मागणी

“त्या” जागेवर आधीच केली होती दुसरी नियुक्ती; तरी निलंबित मुख्याध्यापकाकडे लाचेची मागणी

Subscribe

नाशिक : महापालिकेतील शिक्षण विभागाच्या तात्कालीन प्रशासनाधिकारी सुनीता धनगरबाबत धक्कादायक खुलासा ‘माय महानगर’च्या हाती आला आहे. ज्या शाळेतील निलंबित मुख्यध्यापकाला कामावर रुजू करुन घेण्यासाठी धनगरने लाच मागितली होती, त्या शाळेत सहा महिन्यांपूर्वीच अन्य मुख्याध्यापिकेची नियुक्ती करण्याचा आदेश धनगरने काढला होता. म्हणजेच कामावर रुजू करून घेण्याऐवजी संबंधितांकडून केवळ पैसे उकळण्याचा उद्योग धनगरला करायचा होता हे यावरुन स्पष्ट होते.

महानगरपालिका हद्दीत शिक्षण विभागाचा कारभार हा नेहमी चर्चेत राहिला आहे. संस्थाचालक धार्जिणे धोरण, शिक्षकांची प्रलंबित देयके, शालार्थ संकेतांक शासकीय योजनांचा लाभ, पोषण आहार योजनेतील अनियमितता, गणवेश प्रकरण यांसाठी तात्कालीन प्रशासनाधिकारी धनगर नेहमीच वादग्रस्त ठरली. तिच्या वादग्रस्त कारभाराविषयी उपसंचालक कार्यालयाकडे तक्रारी प्राप्त होत्या. त्याचप्रमाणे विविध लोकप्रतिनिधींनीही तिला कारभार सुधारण्यासाठी वेळोवेळी तंबी दिलेली होती. परंतु, त्याचाही फारसा परिणाम धनगरवर झाला नव्हता. एका शाळेतील निलंबित करण्यात आलेल्या मुख्याध्यापकास कामावर रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी सुनीता धनगर व लिपिक नितीन जोशी याने ५५ हजारांची लाच मागितली होती. हे पत्र मिळाले असते तर निलंबित मुख्याध्यापक कामावर रूजू होऊ शकले असते. परंतु, पत्राच्या बदल्यात धनगरने ५० हजार तर जोशीने पाच हजार रुपये लाच मागितली.

- Advertisement -

मुख्याध्यापकाने धनगरच्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याबाबत तक्रार केली. त्यानुसार या विभागाने धनगर आणि जोशीला लाच घेताना रंगेहात पकडले. महत्वाचे म्हणजे आता ‘कहानी में व्टिस्ट’ आला आहे. संबंधित मुख्याध्यापकाला ज्या शाळेत रुजू करुन घेण्यासाठी धनगरने पैसे मागितले होते, त्या जागेवर गीतांजली मधुकर सोनवणे यांना नियुक्त करण्याचा आदेश धनगरने ६ डिसेंबर २०२२ ला पारित केला होता. म्हणजेच ज्या कामाची लाच मागितली जात होती, त्या जागेवर सहा महिन्यांपूर्वीच धनगरने अन्य व्यक्तीची नियुक्ती केली होती. मग धनगर कोणत्या आधारावर तक्रारदार निलंबित मुख्याध्यापकाकडून लाच मागत होती, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशी उघड झाली माहिती

संबंधित जागेवर निलंबित मुख्याध्यापकाला रुजू करण्याच्या सहा महिने आधीच धनगरने दुसर्‍या शिक्षिकेस मुख्याध्यापकपदावर नियुक्तीचे पत्र दिले होते, ही बाब माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीपकुमार यादव यांनी शोधून काढली. त्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अवलोकन अर्ज देऊन संबंधित मुख्याध्यापक नियुक्तीचा धनगरच्या स्वाक्षरीने निघालेला आदेश प्राप्त केला.

- Advertisement -

नियुक्ती झालेल्या मुख्याध्यापिकेची चौकशी?

धनगरच्या लाचखोरीवर आता सर्वदूर चर्चा होत आहे. ती पैसे घेतल्याशिवाय कामेच करत नव्हती, असेही बोलले जाते. तिने तक्रारदार निलंबित मुख्याध्यापकाला कामावर रुजू करुन घेण्यासाठी लाच मागितली होती. त्याचप्रमाणे या जागेवर आधी ज्यांची नियुक्ती झाली त्यांच्याकडूनही लाच घेतली होती का, याची चौकशी करण्याचे आव्हान आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, शिक्षण विभाग आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांसमोर आहे.

..तर मुख्याध्यापिकेची नियुक्ती होईल रद्द

निलंबित मुख्याध्यापकास जर सेवेत पुन्हा रुजू करुन घ्यायचे असेल तर प्रथमत: याच जागेवर सहा महिन्यांपूर्वी नियुक्त केलेल्या मुख्याध्यापिकेची नियुक्ती रद्द करावी लागेल. निलंबित मुख्याध्यापकाचा सेवाकार्यकाळ अधिक असल्याने नियमानुसार त्यांनाच या जागेवर काम करण्याची संधी दिली जाणे अपेक्षित आहे अन्यथा हे प्रकरण उच्च न्यायालयातही जाऊ शकते. एकाच जागेवर दोन जणांच्या नियुक्त्या करुन वाद कायमस्वरुपी पेटते ठेवण्यात काही अधिकार्‍यांचा हातखंडा असतो. त्यातीलच धनगर एक होती, हे या प्रकरणावरुन स्पष्ट होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -