घरमहाराष्ट्रडाकीया पैसा लाया !

डाकीया पैसा लाया !

Subscribe

पोस्टमनच्या माध्यमातून खेडोपाडी एटीएम

‘डाकीया डाक लाया,’ असे वर्णन केले जाणारे पोस्टमन यापुढे चक्क पैसेही घेऊन येणार आहेत. त्यामुळे खेड्यातून काही किलोमीटरचा प्रवास करून तालुक्याच्या, शहराच्या ठिकाणी येऊन एटीएमच्या रांगेत उभे राहण्याचे कष्ट यापुढे कोणालाही सोसावे लागणार नाहीत. देशभऱात मोठा विस्तार असणार्‍या भारतीय पोस्ट विभागाने ग्राहकांना घरपोच एटीएमची सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आधार कार्डच्या अनुषंगाने पेमेंट सिस्टिमच्या माध्यमातून घरपोच सुविधा मिळणार आहे. त्यामुळे खेडोपाडी राहणार्‍या ग्राहकांना त्यांच्या घरातच एटीएमची सुविधा उपलब्ध होणार आहे. महत्वाचे म्हणजे कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना ही सुविधा वापरता येणार आहे. पोस्टाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमामुळे ही सेवा ग्राहकांना मिळणार आहे.

शहरांमध्ये अवघ्या काही पावलावर एटीएमची सुविधा असते. मात्र खेडोपाडी अनेक किलोमीटर प्रवास करून ग्राहकांना पैसे काढण्यासाठी शहरात यावे लागते. अशा ग्राहकांसाठी आधार कार्ड अनुषंगाने पेमेंट सिस्टिम ही पोस्टाच्या माध्यमातून अतिशय उपयुक्त ठरेल अशा विश्वास महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरीश अग्रवाल यांनी व्यक्त केला. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया आणि भारतीय पोस्ट यांच्या संयुक्त पुढाकारातून ही सुविधा पुरविण्यात येणार आहे. मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक संलग्न कोणत्याही बँकेचे खाते असणार्‍या ग्राहकांना एटीएमसारखे पैसे वापरण्याची सुविधा या सेवेच्या माध्यमातून मिळेल. सध्या पोस्टमनकडे असणार्‍या हॅण्ड हेल्ड डिव्हाईसच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. आपल्याला हवी असलेली रक्कम पोस्टमनला सांगावी लागणार आहे. त्यानुसार प्रत्येक बँकेच्या प्रत्येक दिवसाच्या कमाल पैसे काढण्याच्या मर्यादेनुसार ती रक्कम अदा करण्यात येईल.

- Advertisement -

पोस्टमन हॅण्डहेल्ड डिव्हाईस घेऊन घरोघरी ही पैसे देण्याची व्यवस्था करेल. पण या प्रत्येक घरपोच सेवेच्या व्यवहारासाठी ग्राहकांना २५ रूपये आकारण्यात येतील. तर पोस्टाच्या कार्यालयात मात्र या व्यवहारावर कोणताही शुल्क आकारण्यात येणार नाही. त्यामुळे पोस्टाच्या नजीकच्या शाखेत गेल्यास ग्राहकांना व्यवहार कोणत्याही शुल्काशिवाय करता येणार आहे. पोस्टमनच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट केले तर मात्र १५ रूपये आकारण्यात येतील. देशभरात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची सेवा १ लाख ३६ हजार पोस्टाच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तर पोस्टाच्या संपूर्ण भारतातील नेटवर्कमध्ये १ लाख ९५ हजार पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक आहेत.

घरपोच एटीएम सेवा कशी वापराल?
आपला आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक हा ज्या बँकेच्या खात्याशी संलग्न असेल अशा खात्याच्या माध्यमातून हे पैसे घरपोच मिळण्याची सुविधा असेल. त्यासाठी आपल्या भागातील पोस्टमनला आपल्याला हवी असलेली रक्कम सांगावी लागेल. किंवा 155299 या क्रमांकावर संपर्क करून ही सुविधेची अपॉईंटमेंट घेता येईल. या अपॉईंटमेंटचा ग्राहकाला एसएमएस मिळेल. ग्राहकाच्या घरी पोस्टमन आल्यानंतर पोस्टमनच्या हॅण्डहेल्ड डिव्हाईसवर ग्राहकाला आपल्या बोटाचा ठसा द्यावा लागेल. त्यानंतर ग्राहकाला आपल्या मोबाईलवर ओटीपी एसएमएसच्या माध्यमातून मिळेल. ओटीपी नंबर मशीनमध्ये फीड केल्यानंतर या संपुर्ण व्यवहाराचा एसएमएस आणि पावती ग्राहकाला मिळेल. व्यवहार यशस्वीरीत्या पुर्ण झाल्यानंतर ग्राहकाला पैसे अदा करण्यात येतील.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -