बारसू आंदोलकांनी शासनाशी चर्चा करावी, उद्योग मंत्री उदय सामंतांचे आवाहन

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून आंदोलकांशी संवाद साधला. तर आंदोलकांनी प्रशासनाशी याबाबतची चर्चा करावी, असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

Barsu protestors should discuss with government, Industries Minister Uday Samant appeals

रत्नागिरीतील बारसू येथे उभारण्यात येणाऱ्या रिफायनरी प्रकल्पावरून कोकणात वातावरण तापलेले आहे. रिफायनरीचा प्रकल्प बारसूमध्ये करण्यात येऊ नये यासाठी बारसू सोलगावातील ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलकांची आज (ता. 07 मे) उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तर त्यांनी या प्रकल्पाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधत प्रश्न उपस्थित केले. यानंतर त्यांच्या दौऱ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून आंदोलकांशी संवाद साधला. तर आंदोलकांनी प्रशासनाशी याबाबतची चर्चा करावी, असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला विचारले प्रश्न, म्हणाले…

यावेळी बोलताना ते म्हणाले की, बारसूतील आंदोलकांना भेटण्यासाठी ज्यावेळी महाराष्ट्रातील नेते मंडळी त्याठिकाणी जातात. तर बाहेरून काही लोकं त्याठिकाणी आणण्याची आवश्यकता नाही. तिथल्या स्थानिकांना भेटलं पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. तसेच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी जे सांगितले त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. तर तिथल्या स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प पुढे जाणार नाही, हे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. तर आज उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या मुद्द्यांची महाराष्ट्र शासनाकडून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

उद्धव ठाकरेंचा वेळ मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात गेला
आजच्या उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेबाबत भाष्य करताना उदय सामंत म्हणाले की, “आपण संपूर्ण जर दौरा बघितला, तर ग्रामस्थांच्याबाबत बोलण्यापेक्षा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात वेळ गेला. म्हणून या फेसबूक लाईव्हच्याद्वारे मला एवढच सांगायचंय की सर्वच नेते मंडळींची इच्छा आहे की तिथल्या ग्रामस्ठांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाची मांडणी झाली पाहिजे. लोकांवर कुठेही पोलिसांचा दबाव येणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. या सगळ्याच गोष्टींवर महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. या संदर्भातील खरी माहिती जनतेच्या समोर आहे. त्यामुळे तेथील जनतेच्या मनात ज्या काही शंका असतील, त्या शंका दूर करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. कुठेही बळाचा वापर करून प्रकल्प पुढे नेण्यासाठी सरकार प्रयत्न करणार नाही. महाराष्ट्र शासन तुमच्यासोबत बोलण्यासाठी तयार आहे. तुमच्या शंका दूर करण्याला बंधनकारक आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाशी चर्चा करावी,” असे आवाहन उदय सामंत यांच्याकडून यावेळी करण्यात आले.