घरताज्या घडामोडीखडसेंच्या समर्थकांची जळगाव मनपा बरखास्त करण्याची मागणी; भाजपला दुहेरी झटका?

खडसेंच्या समर्थकांची जळगाव मनपा बरखास्त करण्याची मागणी; भाजपला दुहेरी झटका?

Subscribe

राष्ट्रवादीच्या प्रवेशाबाबत मौन धारण केलेले भाजपवर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी आता त्यांच्यावर पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. या कायर्कर्त्यांनी भाजपची जळगाव महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी करताना खडसेंच्या निर्णयामागे आपण ठाम असल्याचे बॅनर शहरात झळकावले आहेत. कार्यकर्त्यांच्या या कृतीने भाजपत एकच खळबळ उडाली आहे. खडसेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करणार्‍यांशी संपर्क साधत प्रदेश भाजपच्या पदाधिकार्‍यांनी त्यांना समजावण्याची मोहीम सुरू केली आहे.

भाजपच्या उभारणीत सर्वाधिक मेहनत घेतलेल्या खडसेंची पक्षात पुरती कोंडी करण्यात आली होती. फडणवीसांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. भ्रष्टाचाराच्या आरोपातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना क्लिनचिट देऊनही खडसे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. पुढे राज्यसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्‍वासन देऊनही त्यांना ती देण्यात आली नाही. यामुळे नाराज झालेले खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतील, अशी चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात खडसे मात्र काहीही बोलत नव्हते.

- Advertisement -

आता खडसेंच्या कार्यकर्त्यांनीच यासाठी उचल घेतली असून, खडसे घेतील तो निर्णय आम्ही शिरसावंद्य मानू, असे असंख्य फलक त्यांनी जिल्हाभर लावायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे खडसे समर्थकांनी खडसेंच्या बॅनरवरुन भाजपचे कमळ गायब केले आहे. काही दिवसांपासून खडसेंच्या मुक्ताईनगरात कार्यकर्ते खडसेंच्या घरी डेरा टाकून आहेत. भाजपच्या ताब्यात असलेली जळगावची महानगरपालिका बरखास्त करावी, अशी मागणीही खडसेंचे समर्थक आणि मुक्ताईनगरचे कार्यकर्ते करू लागले आहेत. यासाठी भ्रष्टाचाराची असंख्य प्रकरणे त्यांनी पुढे केली आहेत. दुसरीकडे काही कार्यकर्त्यांनी आपल्या गाड्यांवर स्टिकर्स लावून खडसेंप्रती आपली निष्ठा दाखवून दिली आहे.

…तर सर्वात मोठी फूट

खडसे यांनी पक्ष सोडला तर भाजपसाठी ती मोठी नामुष्की ठरण्याची शक्यता आहे. पक्षाचे अनेक पदाधिकारी, काही माजी आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे सदस्य पक्षाला सोडचिठ्ठी देतील, अशी भीती भाजपला आहे. राज्यातील ही फूट पक्षासाठी सर्वात मोठी फूट ठरण्याची शक्यता असल्याने प्रदेश पदाधिकारी खडसेंच्या एकेका समर्थकाला गाठण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती खडसे समर्थक कार्यकर्त्याने या प्रतिनिधीला दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -