घरमहाराष्ट्रअखेर ‘रायगडा’वर रवींद्र चव्हाणांची स्वारी

अखेर ‘रायगडा’वर रवींद्र चव्हाणांची स्वारी

Subscribe

मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप, केसरकरांचा रामटेकवर मुक्काम, विखे-पाटील यांना रॉयलस्टोन

मंत्रीपदाची शपथ घेऊन १५ दिवस उलटल्यानंतर मंगळवारी १८ पैकी १६ मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप करण्यात आले. रायगड बंगल्यावरून भाजप आमदार आणि मंत्री रवींद्र चव्हाण तसेच शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांच्यात अप्रत्यक्षपणे रस्सीखेच सुरू होती. अखेर रवींद्र चव्हाण यांना रायगड बंगला दिल्यामुळे गोगावले यांनी नाराजीचा सूर आळवल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवणार्‍या मंत्र्यांच्या दृष्टीने ’नकोसा’ असलेला रामटेक बंगला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना मिळाला आहे, तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पेडर रोडवरील रॉयल स्टोन बंगला वितरीत करण्यात आला आहे.

बहुप्रतीक्षित एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार ९ ऑगस्टला पार पडला. या विस्तारात शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी ९ जणांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर १४ ऑगस्टला मंत्र्यांना खात्यांचे वाटप करण्यात आले. आता मंगळवारी सरकारी बंगला आणि मंत्रालयातील दालनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मंत्र्यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी यासंदर्भातील आदेश जारी केले.

- Advertisement -

शिवसेना भाजप आणि काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात म्हणजे १९९५ आणि १९९९ मध्ये रामटेक हा बंगला तत्कालीन उपमुख्यमंत्री अनुक्रमे गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ यांनी आपल्याकडे ठेवला होता, मात्र त्यानंतर तेलगी घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर भुजबळ मंत्रीपदावरून पायउतार झाले तरी २००२-०३ नंतर मंत्री नसताना भुजबळ यांचा मुक्काम रामटेकवर होता. २००४ ते २०१४ अशी सलग १० वर्षे भुजबळ रामटेकवर होते, मात्र २०१४ नंतर रामटेक मुक्कामी जाणार्‍या मंत्र्यांचे राजकीय ग्रह फिरू लागले.

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये महसूलमंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांना रामटेक बंगला मिळाला होता, मात्र जमीन घोटाळ्याच्या आरोपात त्यांना मंत्रीपद सोडावे लागले. पुढे कृषीमंत्री असताना पांडुरंग फुंडकर यांनी याच बंगल्यात शेवटचा श्वास घेतला. तेव्हापासून रामटेक बंगल्याबद्दल मंत्र्यांमध्ये अनेक समज आहेत. २०१९ मध्ये ठाकरे सरकारमध्ये छगन भुजबळ पुन्हा रामटेकवर मुक्कामी होते. आता हा बंगला दीपक केसरकर यांना मिळाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, फडणवीस सरकारमध्ये वित्तमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना पूर्वी देवगिरी हा बंगला होता. आता देवगिरी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठेवून घेतल्याने मुनगंटीवार यांना पर्णकुटी हा बंगला मिळाला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांना मंत्रालयासमोरील रत्नसिंधू या बंगल्यातून मुक्काम हलवावा लागला आहे. त्यांना मलबार हिलवरील मुक्तगिरी बंगला मिळाला आहे.

अन्य मंत्र्यांना वितरीत झालेले शासकीय बंगले पुढीलप्रमाणे: चंद्रकांत पाटील (बी १ सिंहगड), डॉ. विजयकुमार गावित (चित्रकूट), गिरीश महाजन (सेवासदन ), गुलाबराव पाटील (जेतवन), संजय राठोड (शिवनेरी), सुरेश खाडे (ज्ञानेश्वरी), संदिपान भुमरे (बी २ रत्नसिंधू ), रवींद्र चव्हाण (अ ६, रायगड ), अब्दुल सत्तार (बी ७, पन्हाळगड), अतुल सावे ( अ ३ शिवगड), शंभूराज देसाई (बी ४, पावनगड ), मंगल प्रभात लोढा (बी ५, विजयदुर्ग)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -