घरमहाराष्ट्रभाजप बॅकफूटवर

भाजप बॅकफूटवर

Subscribe

सत्तास्थापनेसाठी शिवसेनेशी चर्चा; पण फडणवीसच मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला बहुमत मिळाले. पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या ताठर भूमिकेमुळे सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना भाजप आता बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. निकालानंतर १३ दिवसांनी सरकार स्थापनेसाठी चर्चेला आम्ही तयार आहोत पण शिवसेनेकडून सत्ता स्थापनेबाबत कोणताही प्रस्ताव आम्हाला मिळालेला नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कोेअर कमिटीच्या बैठकीनंतर सांगितले. देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनतील, असेही ते सांगायला विसरले नाहीत.

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मंगळवारी मुख्यमंत्र्यांचे निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेनेकडून सरकार स्थापनेबाबत कुठलाही प्रस्ताव अद्याप मिळालेला नाही. आता ते लवकरात लवकर प्रस्ताव देतील अशी अपेक्षा आहे. शिवसेनेसाठी भाजपची दारे २४ तास खुली आहेत. आम्ही शिवसेनेची वाट पाहू.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, याचा पुनरुच्चार पाटील यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत आणि संपूर्ण भाजपा मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे आहेत. तसेच राज्यामध्ये येत्या काही काळात भाजपा- शिवसेना महायुतीचे सरकार स्थापन होईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यात महायुतीला जनादेश मिळाला आहे. त्या जनादेशाच आदर करून आम्ही सरकार स्थापन करू, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीला चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन आदी नेते उपस्थित होते.

शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपदावरही चर्चेला तयारी-मुनगंटीवार
कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते. मुख्यमंत्रीपदासह कोणत्याही मुद्यावर शिवसेनेसोबत आम्ही चर्चेला तयार आहोत, असे सांगितले. मतदारांचा महाजनादेश महायुतीबरोबर आहे. आम्ही शिवसेनेची वाट पाहू. सरकार आमचेच बनणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच आमचे सरकार बनेल. शिवसेनेला प्रस्ताव दिला आहे, प्रस्ताव काय आहे हे जाहीरपणे सांगायचे नाही हे आमच्यात ठरले आहे. सरकार आमचेच येणार हे मात्र नक्की मी सांगू शकतो. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच सरकार बनणार आहे. त्यात किंतु आणि परंतु असे काहीही नसणार आहे, असेही त्यांनी बैठकीनंतर सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -