घरमहाराष्ट्रनारायण राणेंच्या मंत्रीपदाने सेनेच्या डोकेदुखीत वाढ

नारायण राणेंच्या मंत्रीपदाने सेनेच्या डोकेदुखीत वाढ

Subscribe

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्ष सोडून 16 वर्षे झाली तरी शिवसेनेचे हाडवैरी असलेल्या नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेश थोपविण्यासाठी शिवसेनेने जंग जंग पछाडल्यावरही नारायण राणे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. राणेंसह भिवंडीतील बहुजन नेते कपिल पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन मोदी-शहा यांनी कोकणातील आपला जनाधार पक्का करताना ओबीसी मतपेटीची सांगड घालत शिवसेनेची मुंबई- ठाण्यातील डोकेदुखी वाढवली आहे.

नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चर्चा बराच काळ सुरू होती. बुधवारी संध्याकाळी या चर्चेला राणेंची मंत्रीपदी वर्णी लागल्याने पूर्णविराम मिळाला असला तरी आता सेनेची खरी डोकेदुखी सुरू झाली आहे. नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू नये यासाठी एका केंद्रीय मंत्र्याकरवी मोदींना साकडे घालण्यासाठी मुंबईतून तब्बल 16 वेळा फोन करण्यात आले. या मंत्र्यांकडून डाळ शिजत नाही हे लक्षात येताच गृहमंत्री अमित शहा यांनाही नऊ फोन करण्यात आले. यातील शेवटचा फोन स्वीकारुन गृहमंत्री शहा यांनी हे शक्य नसल्याचे शिवसेनेला स्पष्टपणे सुनावले. राणेंना मंत्रीपद देतानाही त्यांच्या ज्येष्ठतेचा, अनुभवाचा आब राखत आणि उपयुक्ततेचे भान ठेवताना त्यांना पंतप्रधान मोदींसमोर अल्पपरिचय कार्यक्रमावेळी पहिल्या रांगेत बसवण्यात तर आलेच शिवाय शपथ देताना पहिल्या क्रमांकावरही शपथ देण्यात आली. भाजपसाठी आणि विशेषतः अमित शहांच्या ‘मिशन महाराष्ट्र’साठी राणेंना विशेष महत्व देण्यात आले आहे.

- Advertisement -

कोकण आणि कोकणी माणूस हा शिवसेनेचा ‘विकपॉईंट’ असल्याने तीन दशके मुंबई महापालिकेवर सेनेचा भगवा आहे. तिथे भाजपचा झेंडा फडकावून महापौर बसवण्याचे मनसुबे भाजप आखत आहे. त्यासाठी भाजपला राणे फॅक्टर उपयोगी ठरु शकतो. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या परिसरातील मतदारांवर आजही राणे प्रभाव पाडू शकतात, असा विश्वास भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला वाटतोय. त्यातच सेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज स्थानिक उमेदवार मुंबई-ठाण्यातील कोणत्याही भाजप नेत्यांपेक्षा राणेवर विश्वास ठेवून भाजपात येऊ शकतात. हीच शिवसेनेची डोकेदुखी तर आहेच त्याचवेळी सेनेच्या वेगवेगळ्या डावपेचांचा कसा सामना करायचा याचे तंत्रही राणे नेमके जाणतात. केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले राणे आपले दिल्लीतील वजन वापरुन चिपी विमानतळ गणपतीपूर्वी सुरू करुन घेऊ शकले तर मात्र आगामी पालिका निवडणुकीपूर्वी राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या रुपात बसूनही शिवसेनेच्या कटकटीत वाढच होणार आहे.

नारायण राणेंना सन्मानाने केंद्रीय मंत्रीपदी बसवताना भाजप श्रेष्ठींनी ठाकरे कुटुंबियांवर पातळी सोडून टीका न करण्याचे निर्देश राणे परिवारातील सदस्यांना दिले आहेत. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंवर नितेश राणे यांनी वादग्रस्त ट्विट केल्यावर त्यांची दखल दिल्लीतील भाजप श्रेष्ठींनी घेऊन आमदार नितेश राणे यांना ट्विट मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करण्याच्या थेट सूचना दिल्या. त्यामुळेच राज्यात ठाकरे-राणे यांना जोडत बदलती समीकरणे मांडायला मोदी-शहा यांनी सुरुवात केली आहे. याला कोणत्याही एका बाजूने सहकार्य मिळाले नाहीतर दुसरा पर्यायही भाजपकडे तयार असल्याचे एका ज्येष्ठ केंद्रीय नेत्याने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -