घरमहाराष्ट्रअजब न्याय वर्तुळाचा

अजब न्याय वर्तुळाचा

Subscribe

भाजप-शिवसेना ः घटस्फोट ते पुन्हा संसार

बरोबर 5 वर्षांपूर्वी 25 सप्टेंबर 2014 रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना भाजपची युती तुटली असून 2014 ची आगामी विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढेल, अशी घोषणा केली होती. त्यामुळे 1989 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर केलेली युती अखेर विधानसभेच्या तोंडावर तोडली. दोन्ही पक्षांनी सुरू केलेला 25 वर्षांचा संसार मोडून घटस्फोट घेतला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 25 सप्टेंबर रोजी नवरात्रीला सुरूवात होणार असताना घटस्थापनेच्या दिवशीच नैसर्गिक मित्र असलेल्या शिवसेना आणि भाजपने काडीमोड घेतला होता.

मे 2014 च्या लोकसभेतील अभूतपूर्व यशानंतर मोदी लाटेवर स्वार होत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले तर भाजपने राज्यातून 23 खासदार दिल्लीत पाठवले. पण विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने परंपरागत न्यायानुसार आपणच मोठे भाऊ असल्याचे सांगत भाजपपुढे जागावाटपाचा प्रस्ताव ठेवला. ऐन पितृपक्षातच शिवसेनेचे नेते आणि भाजपचे चाणक्य वांद्य्रातील सोफीटेल हॉटेल, भाजपचे प्रभारी ओम माथूर यांच्या मुंबईतील निवासस्थानी चर्चा, बैठका करीत होते. युती करताना शिवसेना 151, भाजप 130 आणि मित्रपक्ष 7 जागा असा प्रस्ताव ठेवला. मात्र महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या चार पक्षांनी 7 जागांना नकार दर्शवित किमान 18 जागा मिळाव्यात, अशी मागणी करीत युतीत खोडा घातला. त्यात भाजपने शिवसेनेपेक्षा 21 जागा कमी घेणे दिल्लीतील नेत्यांना अमान्य असल्याने युती तुटल्याची घोषणा भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केली.

- Advertisement -

त्यावेळी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत खडसेंसोबत विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस हेदेखील होते. युतीची घोषणा करण्यासाठी दिल्लीतून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येणार होते. मात्र शिवसेनेच्या नेत्यांशी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी फिसकटल्यामुळे शहा यांनी मुंबई दौरा रद्द केला होता.

आता बरोबर 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा शिवसेना भाजपची युती होणार का, कधी घोषणा होईल, शिवसेनेला किती जागा मिळतील या चर्चांना उत आला आहे. शनिवारीच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील, असे सांगितले. लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेसोबत युती करताना आगामी विधानसभा निवडणुकीतही युती होईल तेव्हा जागांचे समसमान वाटप, मंत्रिमंडळात समान खाते वाटप आणि मुख्यमंत्री पदही निम्मे निम्मे म्हणजे अडीच अडीच वर्षे याबाबत आमचे ठरल्याचे शिवसेनेचे सर्वच नेते सांगत आहेत. तर भाजपकडून जागावाटप फिप्टी फिप्टी देणे शक्य नाही, समसमान खातेवाटपही नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला ही तर दूरची गोष्ट, असा पवित्रा भाजपच्या सर्वच नेत्यांनी घेतलाय.

- Advertisement -

फार फार तर आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास आमची तयारी असून, भाजपचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदरात त्यांच्या मनाप्रमाणे काही पडेल याबाबत मातोश्रीच साशंक आहे. शिवसेनेने फिप्टी फिप्टीचा नाद सोडून 144 वरुन 135, 120 पर्यंत बोलणी सुरु असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. शेवटी शेवटी शिवसेनेला 115, भाजप 163 आणि मित्रपक्षांना 10 जागा देण्यावर एकमत होईल, अशी शक्यता भाजपच्या कोअर टीममधील एका नेत्याने व्यक्त केली. त्यामुळे कोणत्याही स्थितीत शिवसेनेला 144 जागा मिळणार नाहीत, असा दावाही या नेत्याने केला.

त्यामुळे मागील निवडणुकीत भाजपला 130 जागा देणार्‍या शिवसेनेच्या पदरात तेवढ्याही जागा यावेळी नसतील. लोकसभेप्रमाणे भाजपच युतीमध्ये मोठा भाऊ असेल आणि भाजप 160 ते 165 जागा लढवेल. त्यामुळे 2014 मध्ये 151 जागांची मागणी भाजपवर लादणार्‍या शिवसेनेवर काळानेच सुड उगवला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण ज्या अमित शहांनी 2014 मध्ये युती तुटल्यावर मुंबई दौरा रद्द केला होता तेच उद्या रविवारी मुंबई भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांना काश्मीरमधून ३७० कलम हद्दपार केल्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे या दौर्‍यात युतीबाबत बोलणी पुढे सरकतील, अशी आशा दोन्ही पक्षातील नेत्यांना आहे.

येत्या 29 सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होत असून रविवारीच घटस्थापना आहे. त्यामुळे रविवारी घटस्थापनेला युतीची घोषणा होईल आणि पुन्हा राज्यात सत्तेत येण्यासाठी शिवसेना-भाजप तयारीला लागलेले दिसतील. 2014 च्या घटस्थापनेला शिवसेना आणि भाजपचा घटस्फोट झाला होता. आता 2019 साली घटस्थापनेलाच पुन्हा राजकीय संसार सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे घटस्फोट ते पुन्हा संसार असे एक वर्तुळ पाच वर्षांत पूर्ण झालेले सर्वांनाच पहायला मिळेल.

काँग्रेस-राष्ट्रवादीचीः आघाडीची ट्रॅकवर गाडी
2014 मध्ये शिवसेना आणि भाजप युतीचा घटस्फोट झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्येही बिघाडी झाली होती. त्यामुळे राज्यातील चारही महत्त्वाचे पक्ष वेगवेगळे लढल्याने भाजप 122 आमदारांसहीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला तर दुसर्‍या क्रमांकावर शिवसेना 63 आमदारांसहीत आला. तर तिसर्‍या क्रमांकावर काँग्रेसची घसरण होत 42 आमदार निवडून आले तर राष्ट्रवादी काँग्रेस 41 आमदारांमुळे चौथ्या क्रमांकावर राहिला. मात्र आता मागील पाच वर्षात मोदी लाटेमुळे आणि फडणवीसांच्या निष्कलंक कार्यगौरवामुळे भाजपची घोडदौड सुरुच आहे. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील दोन डझन आजी आणि माजी आमदार भाजप आणि शिवसेनेच्या गळाला लागलेत. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून त्यांच्या पहिल्या याद्या तयार आहेत. आघाडीमध्ये काँग्रेस 125, राष्ट्रवादी 125 तर समविचारी मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यावर दोन्ही काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे. त्यामुळेच 2014 ला जी चूक काँग्रेसने केली ती टाळत युतीच्या पुन्हा राजकीय संसाराप्रमाणे आघाडीत बिघाडी करण्यापेक्षा आघाडीची गाडी ट्रॅकवर आली आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसचेही वर्तुळ पूर्ण झाले आहे.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -