घरमहाराष्ट्रगायीचे पवित्र दूध प्या,मागण्या मान्य करा

गायीचे पवित्र दूध प्या,मागण्या मान्य करा

Subscribe

भाजपची मुख्यमंत्र्यांना विनंती

आम्ही पाठवलेले गायीचे पवित्र दूध प्या आणि न्याय बुद्धीने आमच्या मागण्या मान्य करा, अशी विनंती भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी निवेदनासमवेत दूध देण्यात आले. भाजपच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा दिवसभर सुरू होती.

गायीच्या दुधाला प्रति लिटर १० रुपये अनुदान, दूध भुकटीकरिता प्रति किलो ५० रुपये अनुदान आणि सरकारकडून ३० रुपये प्रति लिटरने दुधाची खरेदी करावी, अशा विविध मागण्या भाजपने केल्या आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटनेने देखील याच मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी स्वाभिमानीच्यावतीने राज्यभर दूध संकलन बंद करण्यात येणार आहे.

- Advertisement -

रयतच्यावतीने १ ऑगस्टला दुधाने आंघोळ घालण्यात येणार आहे. या आंदोलनात आता भाजपने उडी घेतली आहे. भाजपच्यावतीने एक ऑगस्ट रोजी दूध एल्गार आंदोलन होणार आहे. याबाबत सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी निवेदन दिले. पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकार्‍यांनी निवेदनासमेवत दूध दिले. हे दूध प्या आणि आमच्या मागण्या मान्य करा, अशी विनंती त्यांनी सरकारला केली.

भाजपच्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये १ कोटी ४० लाख लिटर गायी, म्हशींचे दूध उत्पादित होते. त्यापैकी ३५ लाख लिटर दुधाची सहकारी संघाकडून खरेदी केली जाते. ९० लाख लिटर दूध खासगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते. १५ लाख लिटर दूध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो. सरकारी योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दूध खरेदी केले जाते.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात दुधाच्या विक्रीमध्ये ३० टक्क्यांपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. सध्या खासगी संस्था व सहकारी संघाकडून दूध १५ ते १६ रुपये दराने खरेदी केले जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. यामुळे दुधाला प्रति लिटर दहा रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -